मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला दादांच्या आठवणींना उजाळा; अर्थसंकल्पीय अधिवेशनात शोकप्रस्ताव
मुंबई :
अजित पवार हे सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहिलेले नेते होते. कधीतरी मुख्यमंत्री होईन, पण कायम उपमुख्यमंत्री राहीन, असे अजित पवार कायम म्हणायचे. अजितदादा हे महाराष्ट्राला न लाभलेले सर्वोत्तम मुख्यमंत्री होते, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत त्यांच्या भावना व्यक्त
केल्या.
राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला
सोमवारी (दि.23) सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी परंपरेप्रमाणे शोकप्रस्ताव मांडण्यात आला. या शोकप्रस्तावात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप आमदार राज पुरोहित यांच्या निधनावर शोकप्रस्ताव मांडला गेला. विधानसभेत शोकप्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देत भावनिक शब्दांत श्रद्धांजली वाहिली.
विधानसभेची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या निधनावर शोकप्रस्तावावर बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, की आज मनात वादळ आहे. अजित पवारांचा शोकप्रस्ताव मांडावा लागेल, याची कल्पनाही करवत नाही. सभागृहात उजव्या बाजूला पाहिलं की अजितदादा दिसायचे. कितीही उशिरापर्यंत कामकाज चालले तरी ते शेवटपर्यंत बसलेले असायचे, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, दुसरे ‘अजितदादा’ होणे शक्य नाही. दशकाहून अधिक काळाची मैत्री आठवत त्यांनी अजित पवारांच्या निधनाच्या एक दिवस आधी झालेल्या कॅबिनेट बैठकीची आठवण सांगितली. आम्ही पाऊण तास गप्पा मारल्या. पण ती शेवटची भेट ठरेल, याची पुसटशीही कल्पना नव्हती, असे ते म्हणाले. एक दशकापेक्षा अधिक काळ आमची मैत्री होती, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
महत्त्वाकांक्षी योजना; पायाभूत सुविधांमध्ये विशेष भर : राज्यपाल
मुंबई : प्रतिनिधी
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दोन्ही सभागृहांना संबोधित करताना सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना मांडल्या आणि विकसित महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार व्यक्त
केला.
आपल्या भाषणात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप स्पष्ट केला. महाराष्ट्र परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात आघाडीवर असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषत: विदर्भाच्या औद्योगिक प्रगतीसाठी मोठी पावले उचलण्यात येत असून विदर्भात स्टील कॉरिडॉर उभारण्याची घोषणा त्यांनी केली. गडचिरोली जिल्ह्यात स्टील हब विकसित करण्याचे काम सुरू असल्याचे सांगत विकसित महाराष्ट्रासाठी व्यापक योजना आखल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढवण्यावर सरकारचा विशेष भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जानेवारी 2026 मध्ये स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत 18 देशांतील कंपन्यांसोबत जवळपास 30 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले असून या करारांमुळे सुमारे 40 लाख रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर 2026 ते 2030 या कालावधीसाठी नवीन उद्योग आणि सेवा धोरण जाहीर करण्यात आले आहे. सेवा क्षेत्र आणि उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा विस्तार वाढवणपर्यंत नेण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे राज्यातील कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम होईल.
लाडकी बहीण योजनेचे श्रेय अजित पवारांचे!
निवडणुकीआधी लाडकी बहीण योजना आणण्याचे ठरवले. या योजनेबाबत मंत्रिमंडळात चिंता व्यक्त झाली होती. पण, अजित पवारांनी आर्थिक नियोजन करून ती योजना त्यांनी प्रत्यक्षात आणली. विकास प्रकल्पांबाबत त्यांची दूरदृष्टी आणि निर्णयक्षमता अधोरेखित करताना ते म्हणाले, फाईलींचा ढीग त्यांच्या टेबलावर कधी दिसला नाही. अधिकारी थेट बोलावून घेत, योग्य ते निर्णय घेत. त्यांची पाठराखण करत. सन 2019 मधील राजकीय घडामोडींचा संदर्भ देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. वरिष्ठांनी नंतर भूमिका बदलली, अजित पवारांचा वक्तशीरपणा हा त्यांच्या स्वभावाचा अविभाज्य भाग होता, असे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, मंत्रालयात अधिकारी येण्याआधी अजितदादा पोहोचायचे. मंत्रालयाची सुरुवातच त्यांच्या उपस्थितीने व्हायची. कुठल्याही मुख्यमंत्र्याला अर्थमंत्री कसा पाहिजे, तर तो अजित पवारांसारखा पाहीजे. जो वास्तविकचा आरसा दाखवणारा पाहिजे.अजित पवारांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र बारामतीकडे लोटत जात होता. पण अजित पवारांसारख्या नेत्याचा अपघात होणे शक्य वाटत नाही. मनात आजही संशय आहे. याची कोणतीही चौकशी करा. पण सत्य महाराष्ट्राच्या समोर आले पाहिजे, अशी मागणी शिवसेना (उबाठा) नेते भास्कर जाधव यांनी केली. कारण रोहित पवार हे अजित पवार यांच्या अपघाताचा मुद्दा लावून धरत आहेत.
दादांसारखा विश्वासू मित्र : उद्धव ठाकरे
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावना व्यक्त करताना म्हटले की, माणसं असताना त्यांचं खरं महत्त्व कळत नाही. आम्ही अनपेक्षितपणे एकत्र सरकारमध्ये आलो. मला सरकार चालवण्याचा अनुभव नव्हता. मात्र, हळूहळू लक्षात आलं की दादांसारखा विश्वासू मित्र माझ्यासोबत आहे. आज तो मित्र मी गमावला आहे. विषयांचा सखोल अभ्यास करणारा नेता विरळच असतो. मोठ्या वृक्षाच्या सावलीतून बाहेर पडत त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली.
रोहित पवार सभागृहात ढसाढसा रडले
दिवंगत नेते अजित पवार यांच्या शोकप्रस्तावावेळी त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार भावुक झाल्याचे दिसले. अजित पवारांच्या आठवणी सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. आपल्या शर्टचं वरचं बटण उघडं असायचं, त्यावर ते बटण लावत जा, असं पवार म्हणायचे. पण चाळीस-पन्नास वषार्ंनंतर कधी दादांची वरती भेट होईल त्यावेळी आपण त्यांच्यासमोर हे बटण लावू. तोपर्यंत हे बटण तसंच खुलं असेल. त्यामुळे दादांची रोज आठवण येईल, असे रोहित पवार म्हणाले. अजितदादांच्या अपघाताला जो कुणी दोषी असेल त्याला तुरुंगात पाठवल्याशिवाय सोडणार नाही. अजितदादा पवार नावाचा जादूगार सबंध महाराष्ट्राला हसवत हसवत गेला. दादांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणातील मिश्कीलपणा गेला, असं पवार म्हणाले. यावेळी रोहित पवारांनी अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीला उजाळा देत त्यांच्याबद्दल अनेक घटना सांगितल्या. ते पुढे म्हणाले की, एक सांगतो, चाळीस-पन्नास वर्षांनंतर ज्यावेळी कधी तुमची भेट होईल, तेव्हा हा माझा लढा सुरू आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर मी ताठमानेने उभा राहीन. त्यावेळी काका माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणतील, लढलास बरं का! या गोष्टी ऐकण्यासाठी मी हा लढा सुरू ठेवलाय.
देवेंद्र फडणवीस झाले भावुक
अजितदादांसारखा सच्चा मित्र आणि सहप्रवाशाचा मृत्यू होणे, ही केवळ राजकीय हानी नाही. ही आपल्या सर्वांच्या अंत:करणाला वेदना देणारी गोष्ट आहे. काही गोष्टींवर काळ औषध असतो, असे म्हणतात. पण अजितदादांच्या निधनामुळे झालेल्या वेदना कधीही कमी होणार्या नाहीत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली.
अधिवेशनाच्या प्रथेप्रमाणे पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या सदस्य असलेल्या दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहण्यासाठी शोक प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजितदादांविषयी आपल्या भावना मांडल्या.
अचानकपणे दादा आपल्यातून निघून गेले. त्यामुळे अर्थसंकल्प मांडण्याच जबाबदारी माझ्यावर आली, असे फडणवीस यांनी म्हटले. कठोर निर्णय घ्यायचे असतील तर ते घ्यायला कधीही मागेपुढे न पाहणारे अजितदादा होते. खरंतर अशाप्रकारचा शोकप्रस्ताव मांडणं घटनात्मक जबाबादारी आहे. माझ्यासाठी हा भावनिक प्रसंग आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.आपण अनेकदा राजकीय नेत्यांच्या निधनानंतर पोकळी निर्माण झाली असे म्हणतो. पण प्रत्यक्षात ज्येष्ठ नेते जातात तेव्हा कमतरता जाणवते. पण अजितदादांसारखा माणूस आपल्यातून निघून जाते, तेव्हा पोकळी निर्माण होण्याची नेमकी व्याख्या लक्षात येते, असे मुख्यमंत्री म्हणाले.
एकनाथ शिंदे गहिवरले
दादा म्हणजे स्पष्टवक्तेपणा, वक्तशीरपणा पाळणारा नेता होता. दादा तुमचा हा निर्णय चुकलेला आहे, माघारी या. आज सभागृहात पाहताना ते डोळ्यासमोर दिसत आहेत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. यावेळी विधिमंडळाच्या सदस्य असलेल्या दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहण्यासाठी शोक प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी शिंदे बोलत होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अधिवेशनाचा पहिला दिवस. गेली 22-23 वर्षे काम करत असताना आजचा दिवस सर्वांसाठी प्रचंड दुःखाचा दिवस आहे. अजित पवारांच्या जाण्याने पोकळी कधीच भरू शकत नाही. अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करतो. आज त्यांची पावलोपावली उणीव भासत आहे. दादा आपल्यासोबत नाही हे मान्य होतं नाही. शब्द आणि वेळेला महत्त्व देणारा नेता आपण गमावला आहे. देवेंद्रजी आणि मी मित्र गमावला आहे, अशा भावना शिंदे यांनी व्यक्त
केल्या.