सर्वच पक्षांतर्फे निवडणूक स्वबळावर लढविण्याची जय्यत तयारी

तीन ते चार पॅनलची शक्यता; बंडखोर अपक्षांची संख्या राहणार मोठी

नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या ओझर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपासह सर्वच पक्षांतर्फे निवडणूक स्वबळावर लढविण्याची जय्यत तयारी केली जात असून, वेगवेगळी रणनीती आखली जात आहे. आपापल्या पॅनलसाठी प्रत्येक प्रभागातून उमेदवार पारखण्याचे काम सुरू असून, उमेदवार निश्चित केले जात आहेत. त्यामुळे निवडणूक तिरंगी किंवा चौरंगी होण्याचे चित्र आज दिसत आहे. त्यामुळे निवडणूक रंगतदार होईल.
नगरपरिषद स्थापन होण्यापूर्वी सन 2015 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवेळी एकूण मतदार 31,479 होते. त्यापैकी 18,961 मतदारांनी मतदान केले होते. म्हणजे 57.21 टक्के मतदान झाले होते. निवडणुकीत यतिन कदम यांच्या गटाला 11 जागा तर माजी आमदार अनिल कदम यांच्या गटाला 6 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे ओझर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जान्हवी यतिन कदम यांची निवड झाली होती. यतिन कदम गटाची सत्ता असताना त्यांनी गावात, उपनगरांत भूमिगत गटारीची कामे केली. ते करताना गावातील कामात येणारे अतिक्रमण काढून रस्त्यांची रुंदी वाढवत रस्ते मोठे केले. एचएएलच्या सीएसआर निधीतून लोकोपयोगी कामे करून घेतले.
भाजपाने ओझर नगरपरिषद निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याचे जाहीर केले. महायुती होणार नाही हे लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंदे व शिंदेसेनेचे प्रदीप आहिरे, तसेच मनसेचे तापकिरे या राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांकडून स्वबळाचा नारा दिला आहे. महाविकास आघाडीमधील ‘उबाठा’ गटाचे माजी आमदार अनिल कदम यांचीही पॅनलसाठी जय्यत तयारी सुरू आहे. सर्वच पक्षांतर्फे उमेदवारांची चाचपणी करत उमेदवार निश्चित करण्याचे काम सुरू आहे. येत्या दोन-तीन दिवसांत राजकीय पक्षांकडून पॅनलच्या उमेदवारांची नावे घोषित होण्याची शक्यता असून, उमेदवारी अर्ज दाखल
केले जातील.
नगरपरिषद निवडणूक जिंकण्यासाठी उबाठा गटाचे माजी आमदार अनिल कदम व भाजपाचे यतिन कदम यांनी काही दिवसांपूर्वीच तयारी सुरू करून बैठका घेऊन पॅनलचे उमेदवार निश्चित करून एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. यतिन कदम यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला धक्का देत शिवसेना ठाकरे पक्षाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या शीतल कडाळे आणि त्यांचे शिलेदार गटप्रमुख आणि माजी उपसरपंच प्रकाश महाले यांना भाजपात प्रवेश घडवून आणला. शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते माजी पंचायत समिती सदस्य, माजी उपसरपंच प्रदीप अहिरे हेही काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे गटात दाखल झाले आहेत. त्यांचा या निवडणुकीत भाजपा व शिंदेगटाला किती फायदा होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेत

सन 2015 पूर्वी ग्रामपंचायतीची सत्ता अनिल कदम गटाकडे होती. कदम यांच्या घरातच दोन टर्म ग्रामपंचायत सत्ता आलटून- पालटून राहिली आहे. यतिन कदम यांच्याकडे असलेली सत्ता उलटवून टाकण्यासाठी नगरपरिषद करण्याचा घाट घातला गेला.
डिसेंबरमध्ये 2020 मध्ये ओझर ग्रामपंचायतीला नगरपरिषदेचा दर्जा मिळाला असतानादेखील 31 डिसेंबर 2020 रोजी ओझर ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली. त्यासाठी 15 जानेवारीला मतदान झाले होते.
नगरपरिषद झाल्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाने ओझर ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे यतिन कदम यांच्या नागरिक आघाडी गट व बसपाच्या एक उमेदवारासह अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
त्यामुळे ग्रामपंचायत सदस्याच्या 17 जागांपैकी यतिन कदम यांच्या नागरिक आघाडी गटाच्या 10 जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित 7 जागांवर झालेल्या निवडणुकीतही 7 पैकी 6 जागा जिंकत यतिन कदम गटाने ओझर ग्रामपंचायतीवर पुन्हा नागरिक विकास आघाडीचा झेंडा फडकवला होता. परंतु,
फेब्रुवारी 2021 मध्ये ओझर ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेमध्ये झाल्यानंतर निवडून आलेले सर्व सदस्य औटघटकेचे ठरले होते.

वेगवेगळे पॅनल

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर गटातर्फे, शिंदेसेनेतर्फे, मनसेतर्फे पॅनलचे उमेदवार निश्चित करण्याचे काम सुरू असून, आता भाजपाचे यतिनकदम यांचे पॅनल विरुद्ध उबाठाचे अनिल कदम, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार दिलीप बनकर गटाचे ओमकोचे चेअरमन राजेंद्र शिंदे, शिंदेसेनेचे प्रदीप आहिरे व मनसे यांचे वेगवेगळे पॅनल असण्याची जोरदार चर्चा आहे. ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर होईल, असे सांगितले जात आहे.

विविध समस्या

ओझरमध्ये मूलभूत सुविधा अद्यापही कमी आहेत. खेळाचे मैदान, बगिचा, रस्ते, पाणीपुरवठा, भुयारी गटारी, कचरा व्यवस्थापन, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, मोकाट जनावरांचा प्रश्न यांसारखे प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत. अनेक स्थानिक कामे रखडली आहेत. त्यामुळे हे मुद्दे प्रमुख विषय ठरणार आहेत. ओझरच्या बाणगंगा नदीकिनारी असलेला ओझरच्या कचरा डेपोचा स्थलांतराचा प्रश्न सुटलेला नाही. त्या कचरा डेपोमुळे सुटणार्‍या दुर्गंधीमुळे आजूबाजूला राहणार्‍या रहिवाशांना त्रास होतो. त्यासाठी फवारणी केली जाते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *