नगराध्यक्षपदासाठी पंचरंगी, तर नगरसेवकपदासाठी चौरंगी लढती
प्रथमच होत असलेल्या ओझर नगरपरिषद निवडणुकीच्या माध्यमातून नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी सर्वच पक्षांनी स्वबळाचा नारा देत पॅनलच्या माध्यमातून आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी पंचरंगी, तर नगरसेवकपदासाठी चौरंगी परंतु अटीतटीच्या लढती होणार आहेत. त्यामुळे स्पर्धा वाढली असून, निवडणूक रंगतदार होणार हे निश्चित. आजी -माजी आमदारांसह सर्व पक्षांचे नेते वर्चस्वासाठी प्रयत्न करत आहेत.
निफाड तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार दिलीप बनकर, उबाठाचे माजी आमदार अनिल कदम, भाजपाचे युवा जिल्हाध्यक्ष यतिन कदम, शिवसेना शिंदे गटाचे दिंडोरी मतदारसंघाचे संघटक प्रदीप आहिरे यांची वर्चस्वासाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
ओझरचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिला राखीव आहे. नगराध्यक्षपदासाठी 7, तर नगरसेवकपदासाठी 116 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. नगराध्यक्षपदासाठी प्रज्ञा जाधव (राष्ट्रवादी अजित पवार गट), आरती घेगडमल (भाजप), जयश्री जाधव (उबाठा), श्वेता आहिरे (शिवसेना), मालती बंदरे (काँग्रेस), मंगल कुर्हाडे, मनीषा लोहकरे यांच्यात लढत होणार आहे. नगरपरिषद निवडणुकीतून शहराला पहिला नगराध्यक्ष व 27 नगरसेवक मिळणार आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष व नगरसेवक व्हायचंय मला! असं म्हणत उमेदवारांची मांदियाळी भरली आहे. ग्रामपंचायत असताना ओझरची सत्ता ही बहुतांश काळ कदम कुटुंबीयांच्याच हातात होती. माजी आमदार (कै.) रावसाहेब कदम, मंदाकिनी कदम, अनिल कदम, यतिन कदम यांच्याच गटाकडे ही सत्ता आलटून पालटून राहिली आहे. आमदार अनिल कदम सलग दोन टर्म आमदार असताना त्यांचे वर्चस्व होते. नंतर सलग दोन टर्म पराभूत झाल्याने कदम यांच्याकडून ही सत्ता त्यांचे चुलत बंधू यतिन कदम यांच्याकडे होती. 18 फेब्रुवारी 2021 रोजी ओझरला नगरपरिषदेची स्थापना झाली. त्यानंतर साडेचार वर्षांनी नगरपरिषदेची पहिलीच निवडणूक होत आहे. यतिन कदम भाजपचे जिल्हाध्यक्ष असल्याने त्यांना होमपीचवर नगरपरिषद भाजपकडेच असावी, यासाठी त्यांनी स्वबळाचा नारा देत नगराध्यक्ष व 27 नगरसेवक असे 28 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत.ओझरसारख्या आपल्या बालेकिल्ल्यात दोन टर्म विधानसभा निवडणुकीत मते कमी पडल्याने अनिल कदम हे ओझरवर ढिल्ली झालेली पकड मजबूत करण्यासाठी जोरदार प्रयत्नात असून, त्यांनीही 28 उमेदवार, तर आमदार दिलीप बनकर यांनीही 28 उमेदवार, शिवसेना शिंदे गटाचे प्रदीप आहिरे यांनी नगराध्यक्ष उमेदवारासह 22 उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. काँग्रेसचेही नगराध्यक्षासह 5 उमेदवार स्वतंत्र निवडणूक लढवित आहेत. अपक्ष 10 उमेदवारही नशीब अजमावत आहेत. विसर्जित ग्रामपंचायत निवडणुकीत यतिन कदम यांच्या गटाला 11 जागा, तर माजी आमदार अनिल कदम यांच्या गटाला 6 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे ओझर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जान्हवी यतिन कदम यांची निवड झाली होती. यतिन कदम गटाची सत्ता असताना त्यांनी गावात, उपनगरांत भूमिगत गटारीची कामे केली. ते करताना गावातील कामांत येणारे अतिक्रमण काढून रस्त्यांची रुंदी वाढवत रस्ते मोठे केले. एचएएलच्या सीएसआर निधीतून लोकोपयोगी
कामे करून घेतले.
कदम कुटुंबातच आलटून पालटून सत्ता
सन 2015 पूर्वी ग्रामपंचायतीची सत्ता अनिल कदम गडाकडे होती. म्हणजे कदम यांच्या घरातच ग्रामपंचायत सत्ता आलटून पालटून राहिली आहे. यतिन कदम यांच्याकडे असलेली सत्ता उलटवून टाकण्यासाठी नगरपरिषद करण्याचा घाट घातला गेला आणि डिसेंबरमध्ये 2020 मध्ये ओझर ग्रामपंचायतीला नगरपरिषदेचा दर्जा मिळाला असतानादेखील 31 डिसेंबर 2020 रोजी ओझर ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली. त्यासाठी 15 जानेवारीला मतदान झाले होते. 17 जागांपैकी यतिन कदम यांच्या नागरिक आघाडी गटाच्या 10 जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित 7 जागांवर झालेल्या निवडणुकीतही 7 पैकी 6 जागा जिंकत यतिन कदम गटाने ओझर ग्रामपंचायतीवर पुन्हा नागरी विकास आघाडीचा झेंडा फडकवला होता. परंतु, फेब्रुवारी 2021 मध्ये ओझर ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेमध्ये झाल्यावर सत्ता औटघटकेची राहिली.
प्रचारात सर्वच पक्ष अग्रेसर
भाजपाच्या पॅनलची प्रचाराची धुरा यतिन कदम सांभाळत आहेत, तर उबाठाच्या प्रचाराची धुरा अनिल कदम, राष्ट्रवादीची धुरा आमदार बनकर व मर्चंट बँकेचे राजेंद्र शिंदे, शिंदेसेना प्रचाराची धुरा प्रदीप आहिरे सांभाळत असून, सर्वच नेत्यांकडून प्रचारासाठी चौक सभा घेतल्या जात आहेत. आपली सत्ता आल्यानंतर शहराचा विकास कसा केला जाईल, घनकचरा व्यवस्थापन, पाणी आदी समस्या सोडविण्याचे आश्वासन देत आहेत. राष्ट्रवादीतर्फे ओझरमध्ये कोणकोणती कामे केली, याची माहिती प्रचाराच्या माध्यमातून देऊन पॅनलला निवडून देण्याचे आवाहन केले जात आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून एकत्रित यश मिळविले होते; परंतु यावेळी महायुतीमधील घटक पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवित असल्याकारणाने मतांची विभागणी होईल. माजी आमदार अनिल कदम, यतिन कदम यांच्यासाठी जशी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे, तसेच आमदार दिलीप बनकर यांच्यासाठीही प्रतिष्ठेची आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बनकर यांची प्रतिष्ठा व मतदारसंघातील वर्चस्व यासाठी बनकरदेखील प्रयत्नात आहे. बनकर यांचे स्वीय सहाय्यक प्रमोद कुटे हे प्रभाग क्रमांक 2 मधून नशीब आजमावत आहेत. माजी सरपंच राजेंद्र शिंदेे पॅनलचे नेतृत्व करत आहेत.
मूलभूत सुविधांची वानवाच
शहरातील 54 हजारपेक्षा अधिक लोकसंख्या आणि मुंबई-आग्रा महामार्गावरील विमानाचा कारखाना असलेल्या ओझर शहरात मूलभूत सुविधांची वानवा आहे. खेळाचे मैदान, बगिचा, रस्ते, पाणीपुरवठा, भुयारी गटारी, घनकचरा व्यवस्थापन, वसाहतीतील कचरा डेपो स्थलांतर, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका यांसारखे प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत. अनेक स्थानिक कामे रखडली आहेत. त्यामुळे हे मुद्दे निवडणुकीत प्रमुख विषय असून, त्यावर जोर दिला जात आहे.