नेत्यांना वरिष्ठांच्या आदेशाची, तर कार्यकर्त्यांना नेत्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा
युती – आघाडी करून निवडणुका लढवायच्या की स्वबळावर, यासंदर्भात अजून नेत्यांच्या मनात किंतु-परंतु आहे. त्यातच नगरपालिका निवडणूक जाहीर झाली असून, पक्षश्रेष्ठींचेही यासंदर्भात स्पष्ट आदेश नसल्याने नेत्यांना त्यांच्या अंतिम आदेशाची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे नगराध्यक्षपदासाठी तसेच प्रत्येक प्रभागातून नगरसेवकपदाच्या उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवारांनाही नेत्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा लागून आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला तरी नेत्यांच्या भूमिकांमध्ये स्पष्टता नसल्याने सिन्नरला कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत.
ना. माणिकराव कोकाटे

खा. राजाभाऊ वाजे

उदय सांगळे
सिन्नर नगरपालिकेची एकहाती सत्ता संपादन करण्यासाठी राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, खासदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उबाठा गट आणि युवा नेते उदय सांगळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरसावली आहे. मात्र, तालुक्यातील नेत्यांना युती-आघाडी की स्वबळ, याबाबत वरिष्ठांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे इच्छुक उमेदवारांच्या नजरा आपल्या नेत्यांच्या भूमिकेकडे लागल्या असून, येत्या 5 दिवसांत नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिन्नरला मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडणार आहेत.सिन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, 10 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. दरम्यान, राज्यातील राजकीय परिस्थितीचा विचार करता सिन्नरला भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे सेनेची युती होणार किंवा नाही.त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट-शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसची आघाडी होणार का, याबाबत अनिश्चितता आहे. त्यातच उमेदवार निश्चितीसाठी अवघे काही दिवस नेत्यांकडे शिल्लक असल्यामुळे या चार-पाच दिवसांत मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडणार आहेत.नगराध्यक्षपदाचा सक्षम उमेदवार ठरवण्याबरोबरच प्रत्येक प्रभागात निवडून येण्याची क्षमता त्याचबरोबर जनतेत स्वच्छ प्रतिमा असलेला योग्य उमेदवार शोधताना तीनही प्रबळ नेत्यांचा कस लागणार आहे. याशिवाय, ज्या ज्या प्रभागात इच्छुकांची संख्या अधिक आहे, तेथे त्यांची मनधरणी करताना आणि नाराजांची फौज रोखताना नेत्यांची दमछाक होणार आहे.
जनतेतला नगराध्यक्ष अन् 30 नगरसेवक
सिन्नर शहरात एकूण 15 प्रभाग आहेत. त्यातून प्रत्येकी दोन याप्रमाणे 30 नगरसेवक निवडून येणार आहेत. याशिवाय, जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. गेल्या वेळी सिन्नरला राजाभाऊ वाजे आणि उदय सांगळे गटाचे 18 तर माणिकराव कोकाटे गटाचे 10 नगरसेवक निवडून आले होते. यावेळी तीनही नेत्यांनी वेगवेगळा मार्ग चोखाळल्याने नगरपालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे आणि नुकतेच भाजपात प्रवेश केलेल्या उदय सांगळे यांनी कंबर कसली आहे.
वाजे- कोकाटेंच्या भूमिकेकडे लक्ष
खासदार राजाभाऊ वाजे यांनी शिवसेनेच्या बैठकीत स्वबळाचा नारा दिला आहे. दुसरीकडे भाजपात प्रवेश केलेल्या उदय सांगळे यांनी सिन्नरला कमळ फुलवण्याचा निर्धार वरिष्ठांना बोलून दाखवला आहे. क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी मात्र निवडणुकीसंदर्भात अद्याप कुठलेही भाष्य केले नाही. जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे आणि कन्या सिमंतिनी कोकाटे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा घेत इच्छुकांचे अर्ज भरून घेण्यापलीकडे अजित पवार गटाने नेमकी भूमिका स्पष्ट केलेली नाही. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत एकमेकाला पूरक भूमिका घेणारे क्रीडामंत्री आणि खासदार आता नगरपालिका निवडणुकीत काय भूमिका घेतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे उदय सांगळे यांनी या जोडगोळीवर टीका करून आपले इरादे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत तीनही नेते आपापली ताकद अजमावणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.