नवीन नाट्यगृहासोबत नवे रसिकही हवेत!

कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणार्‍या गोदावरी गौरव पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ रंगकर्मी आणि अभिनेते प्रशांत दामले यांनी नाशिक शहरात नवीन नाट्यगृह उभारण्याची मागणी महापौरांकडे केली. महापौरांनीही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पुढील दोन वर्षांत नाशिकमध्ये आधुनिक आणि सुसज्ज नाट्यगृह उभारले जाईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. वाढत्या लोकसंख्येच्या आणि विस्तारत चाललेल्या शहराच्या पाश्वर्र्भूमीवर नवीन नाट्यगृह उभारण्याची मागणी योग्यच आहे. मात्र, नाट्यगृह उभारण्याइतकेच महत्त्वाचे काम म्हणजे त्या नाट्यगृहात बसणारा आणि कलाकृतींचा आस्वाद घेणारा रसिक प्रेक्षक निर्माण करणे गरजेचे आहे.

नाशिक शहराला समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. साहित्य, नाटक, संगीत, कीर्तन, लोककला अशा विविध क्षेत्रांत या शहराने मोठे योगदान दिले आहे. अनेक नामवंत साहित्यिक, कलाकार आणि विचारवंत या शहराने घडवले. साहित्यिक, लेखक, कलावंतांनी आपल्या कार्यातून नाशिकच्या सांस्कृतिक विश्वाला एक वेगळी ओळख मिळवून दिली. या परंपरेमुळे नाशिकला सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहर म्हणून ओळख मिळाली. मात्र, काळाच्या ओघात आणि बदलत्या जीवनशैलीमुळे या सांस्कृतिक चळवळीसमोर काही नवी आव्हाने उभी
राहिली आहेत.
नाशिकची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. शहराचा विस्तारही मोठ्या प्रमाणावर होत आहे; परंतु त्या तुलनेत शहरातील नाट्यगृहांची संख्या कमी असल्याची वस्तुस्थिती आहे. मुंबई, पुणे किंवा ठाणे यांसारख्या शहरांच्या तुलनेत नाशिकमध्ये नाट्यगृहांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे प्रायोगिक नाटके, स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत मैफली, व्याख्याने किंवा इतर सांस्कृतिक उपक्रम यांना योग्य स्थळ मिळण्यात अनेकदा अडचणी निर्माण होतात. काही वेळा नाट्यगृह उपलब्ध नसल्यामुळे चांगले कार्यक्रम आयोजित करणे कठीण होते किंवा ते कार्यक्रम पुढे ढकलावे लागतात.
शहरात असलेली काही नाट्यगृहेही कालबाह्य होत चालली आहेत. त्याठिकाणी ध्वनिव्यवस्था, प्रकाशयोजना, आसनव्यवस्था किंवा पार्किंग यांसारख्या सुविधांचा अभाव असल्याची तक्रार रंगकर्मी आणि रसिकांकडून अनेकदा व्यक्त केली जाते. कालिदासबद्दल तर अनेकदा रंगकर्मींनी तक्रारी केल्या. प. सा.चे आधुनिकीकरण भविष्यात होण्याची अपेक्षा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सांस्कृतिक कार्यक्रमांची सादरीकरणेही अधिक दर्जेदार आणि आकर्षक होण्याची गरज आहे. त्यासाठी अत्याधुनिक सुविधा असलेली नाट्यगृहे आवश्यक आहेत. त्यामुळे नवीन नाट्यगृह उभारण्याचा प्रस्ताव निश्चितच स्वागतार्ह आहे. मात्र, नाट्यगृह उभारणे ही केवळ पायाभूत सुविधांची बाब नाही. त्या नाट्यगृहात येणारा प्रेक्षकवर्ग तयार करणे, हे त्याहून मोठे आव्हान आहे. नाशिकमध्ये दर महिन्याला अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाकवी कालिदास कलामंदिर, परशुराम साईखेडकर नाट्यगृह, मु. शं. औरंगाबादकर सभागृह, रावसाहेब थोरात सभागृह, गुरुदक्षिणा हॉल यांसारख्या ठिकाणी विविध कार्यक्रम होत असतात. संगीत, नाटक, व्याख्यानमाला, काव्यवाचन, सांस्कृतिक कार्यक्रम, संमेलने अशा अनेक उपक्रमांनी शहरातील सांस्कृतिक वातावरण सतत जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. या कार्यक्रमांना अपेक्षित प्रमाणात रसिक उपस्थित राहत नसल्याचे चित्र अनेकदा दिसते. काही कार्यक्रम तर अक्षरशः रिकाम्या खुर्च्यांसमोर सादर करावे लागतात. अनेकदा कलाकारांचे कुटुंबीय, आयोजक आणि काही मोजके रसिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडतो. अलीकडेच आयोजित करण्यात आलेल्या गोदावरी गौरव पुरस्कार सोहळ्यातही मान्यवर कलाकार उपस्थित असतानाही सभागृह पूर्ण भरले नव्हते. या कार्यक्रमात अभिनेते प्रशांत दामले यांच्यासह अभिनेते सयाजी शिंदे यांसारखे मान्यवर उपस्थित होते. तरीही रसिकांचा प्रतिसाद अपेक्षेइतका दिसला नाही. कामगार कल्याण नाट्य महोत्सवासारख्या उपक्रमातही अशीच परिस्थिती पाहायला मिळते. स्पर्धेत सहभागी होणार्‍या कलाकारांचे कुटुंबीय, परीक्षक आणि काही रसिक यांच्यापुरतेच प्रेक्षक मर्यादित राहतात. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, नाशिकमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची कमतरता नाही मात्र, त्या कार्यक्रमांकडे नव्या पिढीचा आणि नव्या रसिकांचा कल कमी होत असल्याचे दिसते. यामागे अनेक कारणे असू शकतात. बदलती जीवनशैली, व्यस्त दिनचर्या, नोकरीतील ताणतणाव, डिजिटल मनोरंजनाचे वाढते पर्याय, सामाजिक माध्यमांचा प्रभाव, अशा अनेक घटकांमुळे लोकांच्या मनोरंजनाच्या सवयी बदलल्या आहेत. घरबसल्या टीव्ही, मोबाइल किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर मनोरंजन सहज उपलब्ध होत असल्याने प्रत्यक्ष नाट्यगृहात जाऊन कार्यक्रम पाहण्याचा कल काही प्रमाणात कमी झाला आहे. जेव्हा दर्जेदार कलाकृती सादर केल्या जातात तेव्हा रसिक नक्कीच प्रतिसाद देतात, हेही तितकेच खरे आहे. काही कार्यक्रमांना होणारी उत्स्फूर्त गर्दी हे त्याचे उदाहरण आहे. विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शिकायला गेलो एक या नाटकाला व फोक अख्यान या कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती. यावरून असे दिसते की, दर्जेदार आशय, प्रभावी सादरीकरण आणि योग्य प्रसिद्धी असेल तर रसिक नक्कीच नाट्यगृहाकडे वळतात. म्हणूनच नवीन नाट्यगृह उभारताना केवळ इमारत उभारण्यापुरते मर्यादित न राहता सांस्कृतिक चळवळ बळकट करण्यावरही भर देणे आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालये, सांस्कृतिक संस्था आणि कलाकार यांनी मिळून नव्या पिढीत नाटक, साहित्य, संगीत यांविषयीची आवड निर्माण करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आयोजकांनीही आपल्या कार्यक्रमांची योग्य प्रसिद्धी करून ते अधिक आकर्षक आणि
दर्जेदार बनवण्यावर भर द्यायला हवा.
नाशिकला मिळालेला सांस्कृतिक वारसा हा शहराची मोठी ताकद आहे. या वारशाचे जतन करताना त्यात नव्या पिढीचा सहभाग वाढवणे गरजेचे आहे. रसिक आणि आयोजक या दोन्ही बाजूंनी सकारात्मक बदल घडल्यास नाशिकची सांस्कृतिक चळवळ अधिक सक्षम होईल. नवीन नाट्यगृह उभारणे हा त्यासाठीचा एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. मात्र, त्या नाट्यगृहात प्रेक्षकांची गर्दी व्हावी, त्याठिकाणी दर्जेदार कलाकृती सादर व्हाव्यात आणि सांस्कृतिक वातावरण अधिक समृद्ध व्हावे, यासाठी सर्वांनीच एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. नवीन नाट्यगृह उभारणे ही आनंदाची बाब आहेच, पण त्यासोबत नवे रसिक घडवणे हेच नाशिकच्या सांस्कृतिक भविष्यासाठी खरे महत्त्वाचे ठरणार आहे.

Along with a new theater, we also need new audiences!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *