झोपडपट्टीच्या प्रभागाला समस्यांबरोबरच गुन्हेगारांचे ग्रहण

मूलभूत समस्यांसाठीही नागरिकांचा कंठशोष; उच्चभ्रू मंडळींचा कानाडोळा

                                              लक्ष्यवेध : प्रभाग-4

संमिश्र लोकवस्ती. बहुभाषिक मतदार. शहरातील चर्चित वाघाडी अन् फुलेनगर या झोपडपट्टीसह उच्चभ्रू वसाहती असा सम-विषमतेच्या हिंदोळ्यावर झुलणार्‍या पंचवटीतील प्रभाग 4 मध्ये रस्ते, पिण्याचे पाणी, ड्रेनेज, अस्वच्छता, आरोग्य, सांडपाण्याचे रस्त्यावर वाहणारे पाट, अशा एक ना अनेक समस्या आहेत. या नागरी समस्यांसह गुन्हेगारीच्या काळ्या अध्यायातील एक प्रकरण आहे. भाईंनाही संधी देणारा या प्रभागातील ’व्हाइट कॉलर’ नगरसेवकच आता गंभीर गुन्ह्यात मध्यवर्ती कारागृहात असल्याने येथील राजकीय समीकरणे नव्याने ’सेट’ करावी लागणार आहेत.
मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असलेला हा प्रभाग गेल्या अनेक वर्षांपासून विकासकामांपासून वंचितच राहिला आहे. फुलेनगर, वज्रेश्वरीनगर अशा झोपडपट्टीमधील नागरिक हे प्रभागातच असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाली, मजुरी करून भाजीपाला, तसेच लहान-मोठे व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवत असतात. या झोपडपट्टीत विशेषतः काही गुन्हेगारदेखील आश्रय घेताना दिसतात. हाणामार्‍या, लूटमार आदी प्रकारदेखील या झोपडपट्टीतील गुन्हेगारांकडून केले जातात. दिंडोरी रोड, पेठरोडच्या मधोमधच झोपडपट्टी असून, दिंडोरी रोडच्या बाजूला उच्चभ्रू वस्तीदेखील आहे. याच प्रभागातील पेठ रोडवर महापौर, आमदार, खासदार अन् मंत्रिपदी राहिलेल्या नेतेगणांनी वास्तव्य केले आहे आणि अजूनही करतात. याच पेठ रोड परिसरात घाणीचे साम्राज्य हे नित्याचेच झाले आहे. रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर नेहमीच झोपडपट्टीतील रहिवाशांचे कपडे भरदिवसा वाळत घालत असल्याने हा रस्ता रंगीबेरंगी दिसून येतो. बाजार समितीलगत ही झोपडपट्टी असल्याने बाजार समितीतील शेतकर्‍यांनाही याचा फटका मोठ्या प्रमाणात बसताना दिसतो. शेतकर्‍यांची होणारी लूटमार ही याच भागातील गुन्हेगार मंडळी करताना दिसतात.
उच्चभ्रू वस्तीत अनेक व्यापारी, नोकरदार असे नागरिक वास्तव्य करतात. त्यांनाही विविध समस्यांचा सामना करावा लागतो. अनेक भागांत पाणी नाही. मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत. प्रभागात अस्वच्छता असल्याने नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. प्रभागात मोकळे असे भूखंड नसल्याने विकासदेखील खुंटला जातो. दाटवस्ती असल्याने परिसरातील नागरिकांना सोयीसुविधांपासून वंचित राहावे लागते. प्रभागात काँक्रीटचे रस्ते करण्यात आले आहेत. समाजमंदिर बांधण्यात आले आहे. पण ते असून नसल्यासारखे आहे. प्रभागातील निमाणी बसस्थानक, दिंडोरी नाका कायम अतिक्रमणांच्या गर्तेत राहतो. त्यामुळे नागरिकांना प्रवास करताना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो. दिंडोरी नाका परिसरातून वणी, दिंडोरीकडे जाणार्‍या मार्गावर अनधिकृत वाहनांचा ठिय्या असतो. रस्त्यातील अतिक्रमण आणि अनधिकृत वाहनांचा थांबा याकडे मनपा आणि पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज नागरिक व्यक्त करतात.

विद्यमान नगरसेवक

                                                             सरिता सोनवणे

                                                            जगदीश पाटील

                                                             स्व. शांताबाई हिरे

                                                                  हेमंत शेट्टी

या आहेत समस्या
♦• नव्याने वाढणार्‍या वसाहतीत रस्ते नाहीत.
•पुरेसे पाणी मिळत नसल्याने नागरिकांचे हाल.
♦• सर्वांत मोठ्या असलेल्या फुलेनगर झोपडपट्टीत अपुरे शौचालय.
•♦• कॉलनी परिसरात अस्वच्छता.
•♦• अनधिकृत वस्तीत मोठ्या प्रमाणात वाढ.

प्रभागाचा परिसर
नामको कॅन्सर हॉस्पिटलमागील परिसर, शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समिती, सीडीओ मेरी, आदिवासी वसतिगृह परिसर, मेरी वसाहत, तारवालानगर, लामखेडे मळा, वज्रेश्वरी झोपडपट्टी, फुलेनगर, वैशालीनगर, भराडवाडी, सम्राटनगर, कालिकानगर, राहुलवाडी, महापालिका पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र, विद्युतनगरी, पंचवटी पोलीस ठाणे, महालक्ष्मी थिएटर परिसर, लोकसहकारनगर, आदित्यकुंज, संजयनगर, वाल्मीकनगर, मजूरवाडी, निमाणी, आर. पी. विद्यालय, सूर्या आर्केड, महापालिका इंदिरा गांधी दवाखाना, सुविधा हॉटेल आदी.

प्रभागातील विकासकामे
• ♦• फुलेनगरातील तीन पुतळे येथे भव्य सभागृह.
• ♦• झोपडपट्टी परिसरात शौचालय उभारणी.
• ♦• आरसीसी भूमिगत गटार योजना.
• ♦• जलवाहिनी.
•♦• प्रभागात कॉलनी परिसरात काँक्रीट रस्ते.

सन 2011 नुसार लोकसंख्या
• लोकसंख्या- 46,305
• अनुसूचित जाती- 9,672
• अनुसूचित जमाती- 9,215

इच्छुक उमेदवार
सागर लामखडे, मोनिका हिरे, राम खांदवे, अविदा शेळके, सतनाम राजपूत, राजू माने, संजय कांबळे, महेश शेळके, डॉ. विशाल घोलप, स्वप्नील ओढाणे, राजू जाधव, शंकर हिरे, सागर जाधव, मंदा ओढाणे, ज्योती गांगुर्डे, कविता कर्डक, महेंद्र भिकाजी बडवे, गायत्री राहुल कुलकर्णी, वास्तव दोंदे, साधना उगले, उत्तम उगले आदी.
खड्डे ठरताहेत जीवघेणे

नागरिक म्हणतात…

खड्डे ठरताहेत जीवघेणे

संपूर्ण प्रभागात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तुळजाभवानीनगर ते गुंजाळ मळा रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे झाले आहेत. संभाजी चौकात एवढे मोठे खड्डे आहेत की, रोज दुचाकी चालवताना मणका तुटेल की काय, अशी भीती वाटते. रस्ते राहिलेच नाहीत. त्यामुळे खड्डे हे फक्त जीवघेणे ठरत आहेत.
– विजय बाळासाहेब मांदळे

पाण्याची गंभीर समस्या
तारवालानगर भागात पाण्याची गंभीर समस्या आहे. संपूर्ण उन्हाळा नागरिकांनी टँकर विकत घेऊन काढला. शिवनगर भागात नवीन टाकी सुरू झाली, पण आम्हाला त्याचा काहीही उपयोग नाही. तारवालानगर वरच्या भागात असल्याने पाणी कमी दाबाने येते. विद्युतनगर टाकीवरून पुरवठा होता, तेव्हा आम्हाला पुरेसे पाणी मिळायचे.
– पार्थ विश्वास केतकर

उद्यान विकसित केले नाही
प्रभागातील बहुतांश रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना रोजच्या प्रवासाची गैरसोय होते. पावसाळ्यात ही परिस्थिती अजूनच बिकट होते. प्रभागात नाशिक महापालिकेच्या मालकीचे अनेक मोकळे भूखंड आहेत. त्याठिकाणी मुलांसाठी खेळण्यासाठी एकही व्यवस्थित उद्यान नाही. या जागा दुर्लक्षित असून, मनपाचे दुर्लक्ष झाले आहे.
– सौ. सारिका शाहजी आजबे

पाण्याचा तुटवडा अन् पथदीपांचा अभाव
नागरिकांना आजही पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या भेडसावत आहे. अनेक भागांत पाणीच येत नाही. आले तरी अस्वच्छ असते. यामुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागतो. नवीन वसाहतींत आणि काही मुख्य रस्त्यांवर पथदीप बसवण्यात आलेले नाहीत. अंधारामुळे रात्री नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना जाणे-येणे धोकादायक ठरते. झोपडपट्टीतील नागरिकांसाठी सुलभ शौचालयाची अवस्था खूप वाईट आहे.
– सौ. अविदा बिभीषण शेळके

सुलभ शौचालयांची अवस्था बिकट
फुलेनगर भागात सर्वांत मोठी झोपडपट्टी आहे. या भागातील सुलभ शौचालयांची अवस्था फारच बिकट आहे. त्यामुळे नागरिकांना रोजच घाणीचा सामना करावा लागतो.शौचालयांच्या आजूबाजूला घाणीचे साम्राज्य असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्यदेखील धोक्यात येते. मनपा प्रशासन याकडे थेट दुर्लक्ष करत आहे.
– बापू सपकाळ, फुलेनगर

नागरिकांना पक्क्या घरांची आशा
आझादनगर, गौंडवाडी येथील नागरिकांना पक्के घर देण्यात यावे यासाठी आम्ही वेळोवेळी मागणी केली आहे म्हाडा किंवा महापालिकेद्वारे काहीतरी त्यांची सोय करण्यात यावी. पावसाळ्यात खूप त्रास होतो.
– सूरज बोडके, मच्छी बाजार

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *