अवकाळी पावसाबरोबर आता गारपिटीचीही शक्यता

सिन्नर : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील विदर्भाबरोबरच कोकण वगळता उर्वरित भागात दोन ते तीन दिवस अवकाळीच्या तीव्रतेबरोबर गारपिटीची शक्यताही वाढली आहे, असा अंदाज सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.
तीन ते दहा मेच्या आठवडाभरासाठी दिलेला अवकाळी पावसाचा अंदाज कायम असून, आता 4 व 5 मे संपूर्ण विदर्भ, दि. 4 ते 7 मे नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, दि. 6 व 7 मे अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, दि. 7 मे संपूर्ण मराठवाडा आदी भागांत अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता आहे.
दोन दिवसांत कोकण 34 ते 35 अंश सेल्सिअस, मध्य
महाराष्ट्र 37 ते 42, मराठवाडा 41 ते 42 अंश सेल्सिअस, विदर्भ 42 ते 44 अंश सेल्सिअस तापमान असले तरी कमाल व किमान
तापमानेही सरासरी व काही ठिकाणी सरासरीच्या खाली आहे. त्यामुळे मे महिना असूनही, उष्णतेच्या दाहकतेेपासून ही सुसह्यताच समजावी.
छत्तीसगडदरम्यान घड्याळ काटा दिशेच्या विरुद्ध दिशेने फिरणार्‍या आवर्ती व अरबी
समुद्रात दीड किलोमीटर उंचीपर्यंत, घड्याळ काटा दिशेने फिरणार्‍या प्रत्यावर्ती, अशा दोन्हीही चक्रीय वार्‍यांच्या संगमातून, कोकण वगळता, संपूर्ण महाराष्ट्रात या दोन-तीन दिवसांसाठी गारपिटीची शक्यता निर्माण झाल्याचे जाणवते. संपूर्ण महाराष्ट्रात रात्रीचा उकाडा वा उष्णतेच्या लाटेची शक्यता कुठेही सध्या जाणवत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *