नगरसेवक समदडिया : उपाययोजनेसाठी मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार
येवला ः प्रतिनिधी
धुळे- मालेगाव- मनमाड-येवला – नगर या महत्त्वाच्या महामार्गावर वाढत्या वाहतुकीमुळे दररोज कोंडी होत आहे. या सतत वाहतूक कोंडीचा मोठा फटका येवला शहरासह परिसरातील नागरिकांना बसत आहे. अवजड वाहनांमुळे ही परिस्थिती उद्भवल्याने धुळे-सोलापूरदरम्यान अवजड वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग सुरू करावा, अशी मागणी नगरसेवक तथा भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष समीर समदडिया यांनी केली आहे.
पूर्वेकडे नाशिक, पश्चिमेकडे छ. संभाजीनगर, दक्षिणेकडे अहिल्यानगर तर उत्तरेकडे मालेगाव-धुळे अशा चार जिल्ह्यांच्या मध्यवर्ती असलेल्या येवल्याला मागील काही महिन्यापासून वाहतूक कोंडीने त्रस्त केले आहे. चार-पाच राज्यातून जड मालवाहतूक वाहने या मार्गावरून धावतात. पुणे, अहिल्यानगर, शिर्डीपासून पुढे येवलामार्गे मालेगाव, धुळे या जिल्ह्यांसह कर्नाटक आणि मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांची सुसाट वाहने चालणार्या महामार्गालाच रुंदीकरण व काँक्रिटीकरणाच्या अभावामुळे अवकळा आली आहे. वाहनांची संख्या चारपट वाढली. त्या तुलनेत रस्ता तोकडा ठरत असल्याने वाहतूक कोंडी, अपघात होत आहे. मुळात इंदूर-धुळे-सोलापूर या मार्गाने अवजड वाहतूक नियमित सुरू होती. मात्र, कन्नड घाटात कामकाज सुरू असल्याने ही पूर्ण वाहतूक मालेगाव-येवला मार्गाने वळविली आहे. सोबतच नांदगाव ते शिऊर बंगला या मार्गाने वाहने जाऊन पुढे छत्रपती संभाजीनगरमार्गे सोलापूर महामार्गाला लागून पुढे जात होती; परंतु हाही महामार्ग बंद केला आहे. धुळे-सोलापूरदरम्यान एकाच वेळी दोन महामार्ग बंद असल्याने संपूर्ण वाहतुकीचा ताण धुळे-मालेगाव-येवला-अहिल्यानगर या मार्गावर पडला आहे. वाहनांची वाढती संख्या, जड वाहतूक यामुळे या मार्गावर दररोज तासन्तास वाहनांच्या रांगा लागत आहेत. यावर उपाय म्हणून वाहतूक तज्ज्ञ, नागरिक व सामाजिक संघटनांनी पर्यायी मार्ग सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे नागरिकांची होणारी कोंडी आणि ससेहोलपट टाळण्यासाठी कन्नड घाट व नांदगाव शिवूर बंगला हा मार्ग तात्पुरत्या स्वरूपात अवजड वाहनांसाठी सुरू करण्याची गरज आहे. रस्त्याचे काम सुरू असले तरी एकेरी वाहतूक शक्य असल्याने त्या भागातून छोटे मोठे ट्रक व कंटेनर वाहतूक सुरू करण्याची
गरज आहे.
Alternative routes should be introduced to address traffic congestion.