कोविडच्या संक्रमणाने संपूर्ण जगामध्ये थैमान घातलेले होते तेव्हा घराघरातून ऐकायला येणारे पर्वणीचे शब्द म्हणजे ”हॅलो, ऍम आय ऑडिबल?” संपूर्ण शिक्षक वर्गाने ऑनलाईन शिक्षणाचे सर्व धडे स्वतः शिकून घेऊन, गिरवून समस्त विद्यार्थीवर्गाला ज्ञानदानाचे अविरत कार्य केल्याचे सर्वांना माहित आहे. प्राथमिक शाळेपासून ते अगदी उच्च शिक्षणापर्यंत सगळी कडे ऑनलाइन शिक्षण पद्धती नाईलाजाने का होईना स्वीकारावी लागली आणि प्रत्येक नवीन ऑनलाईन मीटिंगची, तासाची आणि संभाषणाची सुरुवात ‘ऍम आय ऑडिबल?’ ने होऊ लागली. आणि समस्त शिक्षण व्यवस्थेला सार्थपणे पुढे नेण्याचे काम सर्वांनी अगदी न थकता आणि सर्वच तारांबळ सांभाळून केले गेले. शिक्षकांच्या या कार्याला पालकांचे अजोड परिश्रम देखील लाभले. शिक्षकांशिवाय कोणतेही ऑनलाइन वा ऑफलाईन तंत्रज्ञान अपुरेच आहे, हे गेल्या दोन वर्षातील कोविडच्या महामारीकाळात सिद्ध झाले आहे. शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी किती महत्वाचे कार्य करू शकतो, याची प्रचिती आली. परंतु शिक्षक दिनी किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी होणारे गौरवगाण सोडून इतर दिवशी याच या शिक्षकांची आठवण कुणाला येते का? शिक्षकांचा आवाज कुणापर्यंत पोहोचतो का? आज शिक्षक दिनाप्रसंगी ”ऍम आय ऑडिबल?” या शब्दांची तीव्रता आणि सार्थकता एका वेगळ्या अर्थाने समजून घेणे गरजेचे आहे.
स्वतः विद्यार्थ्यांसोबतच शिक्षणसंस्था, संस्थाचालक, संस्थामालक, पदाधिकारी, पालकवर्ग आणि शिक्षक हे सर्व जण मिळून एक शिक्षण व्यवस्था बनते आणि ती सुरळीत चालावी, चांगले विद्यार्थी घडावे, आणि परिणामी, समाजाचे आणि राष्ट्राचे भले व्हावे, यासाठी शासन व्यवस्था असते. या सर्वच घटकांनी आपापली जबाबदारी आणि कर्तव्ये योग्य ती सद्सदविवेक बुद्धी वापरून जर पार पाडली तर अपेक्षित असे कार्य होण्यास कसलेही अडथळे येत नाहीत. परंतु जरा डोळे उघडून पाहिलं तर आणि वास्तव समजून घेतलं तर कळेल कि, आपण कोणत्या दिशेने वाटचाल करत आहोत. शिक्षक कसाही असला तरी तो आपल्या रोजच्या आखून दिलेल्या चौकटी बाहेर जात नाही. जातहि असेल तर अशा धैर्यशील लोकांचं प्रमाण अगदी नगण्य आहे. शिक्षकांना त्यांचे अधिकार आणि हक्क या बाबत बरेचदा कोणतेही ज्ञान दिले जात नाही आणि ते देखील या गोष्टी माहित करून घेण्याच्या भानगडीत उगाच पडत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे विद्यार्थी केंद्रित असणे त्यांना या बाकी सर्व गोष्टीकडे दुय्यम म्हणून बघण्यास प्रवृत्त करतात. तसेच बऱ्याच शिक्षकांसाठी त्यांचा निव्वळ महिन्याचा पगार येतो हि समाधानाची गोष्ट असते. शिक्षण संस्था याचा गैरफायदा घेतात आणि मग शिक्षकांना पाहिजे तसे वापरून त्यांच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला जातो. अन्याय होणाऱ्या लोकांचा आवाज निघतो का आणि निघालाच तर तो टिकतो का? किंवा तो ऐकला जातो का? ऐकला तर अन्याय निवारणासाठी योग्य ती कार्यवाही केली जाते का? अशा अनेक प्रश्नांना आजच्या या शिक्षक दिनी उत्तरे शोधायला हवी, तीच खऱ्या अर्थाने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना आदरांजली राहील आणि त्यांच्या कार्याचा गौरव होईल. काही मोजक्या शिक्षकांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायासंदर्भात आवाज उठवण्याचा प्रयत्न करणे पुरेसे नाही. त्यासाठी एकता आणि समन्वय, संघटनात्मक लढाई, कायदेशीर कृती आणि खंबीरपणे उभे राहण्याची प्रवृत्ती यांची पण आवश्यकता आहे.
शिक्षकांशिवाय कोणतेही ऑनलाइन वा ऑफलाईन तंत्रज्ञान अपुरेच आहे हे गेल्या दोन वर्षातील कोविडच्या महामारीकाळात सिद्ध झाले आहे. शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी किती महत्वाचे कार्य करू शकतो, याची प्रचिती सर्वाना आली असेलच. तरीसुद्धा शिक्षकांना त्याचे योग्य ते हक्क अबाधित ठेऊन सन्मान देणे हे किती लोक, किती संस्था किंवा किती व्यवस्था करताहेत, याचा धांडोळा सर्वांनाच घ्यावा लागेल. इथे जर रणजित दिसले आणि दत्तात्रय वारे यांच्यासारख्या प्रतिभावान शिक्षकांना व्यवस्थेला बळी दिलं जात आहे, तेव्हा सामान्य शिक्षकांचा आवाज कसा ऐकला जाईल? म्हणून आजच्या शिक्षक दिनी ‘’ऍम आय ऑडिबल?’’ हे वाक्य कानावर पडत आहे. ते ऐकण्याचे सामर्थ्य, कुवतआणि मोठेपणा आज कुणाकडे राहिलेले दिसत नाही.
प्रत्येक वर्गात शिक्षकांचे फोटो लावण्यापेक्षा त्यांना विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करता येईल अशी व्यवस्था उभी करून ती टिकवणे उचित होईल. शिक्षक आनंदी आणि ज्ञानदानासाठी मुक्त असेल तर तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो. त्याचे कार्य अपेक्षित पद्धतीने करून सर्व मूल्यांची पेरणी करू शकतो आणि मुलांचे उज्वल भविष्य घडविण्यात हातभार लावू शकतो. डोक्यावर असलेले अपेक्षांचे ओझे पेलण्यासाठी मानसिक सामर्थ्य आणि सामाजिक व कौटुंबिक पाठबळ असेल तर शिक्षक विद्यार्थ्यांना लढ म्हणू शकतो. त्याला स्वतःलाच विनाकारण व्यवस्थेला बळी दिले जात असेल आणि प्रत्येक फ्रंटवर हक्कांसाठी लढावं लागत असेल तर कोणती कर्तव्ये त्याने समर्थपणे करावीत? किंवा त्याला संस्थेकडून, अधिकाऱ्यांकडून, शासनाकडून फायदा असेल तेव्हा आणि तसे नियम दाखवले जात असतील तर समाजात त्याचे असलेले स्थान अबाधित कसे राहील हा संशोधनाचा विषय होईल.
विद्यार्थी उद्याचा सजग नागरिक आणि देशाचे भवितव्य म्हणून घडावा यासाठी त्याला खरा मार्गदर्शक मिळावा, असे वाटत असेल शिक्षक अत्यंत महत्वाचा दुवा आहे. तो दुवाच जर दुर्लक्षित आणि उपेक्षित असेल तर प्रगतीची चाके उलट्या गतीने फिरायला वेळ लागणार नाही. शिक्षक दिन साजरा करण्याचा मूळ उद्देश सफल होण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्रात आलेली मरगळ झटकण्यासाठी फक्त एकच दिवस मान–सन्मान, पुरस्कार, समारंभ इ. न करता रोजच्या व्यवहारात शिक्षकांनी सुद्धा आपले वर्तन आणि गुणवत्ता यांचा मेळ घालून विद्यार्थ्यांना स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी होण्यासाठी प्रेरित करणे क्रमप्राप्त आहेच. समाजासोबत या सर्व परिस्थितीत शिक्षकांनीही जागृत होणे, एकमेकांना सर्व भेदभाव व चुरस बाजूला ठेऊन सहकार्य करणे, शिक्षण व्यवस्थेत होणाऱ्या भ्रष्टाचाराला खतपाणी न घालता संघटितपणे विरोध करणे आणि आळा घालणे, हक्क आणि कर्तव्याचे संतुलन ठेवणे, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी असलेल्या उपाययोजनांची कायदेशीर माहिती मिळवणे, इ. प्रत्येक बाबतीत स्वयंसिद्ध होणे आणि स्वतःचा आवाज ऐकायला शिकणे आज काळाची गरज आहे.
प्रा. योगेश क्षीरसागर, नाशिक
Mast