सिडको : विशेष प्रतिनिधी
गेल्या आठ दिवसांपुर्वी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या जनावरांच्या चोरीचा गुन्हा गुन्हे शाखा युनिट-2 ने उघडकीस आणत दोन चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली अंदाजे 7 लाख रुपये किंमतीची चारचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे.
नाशिक शहरात वाढत असलेल्या जनावरांच्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट 2 चे अधिकारी व कर्मचारी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना, सपोउनि. सुहास क्षिरसागर यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, काही दिवसांपूर्वी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पांढर्या रंगाच्या स्विफ्ट गाडीतून शेळ्या व बोकड चोरी करण्यात आले होते. संबंधित आरोपी सध्या बालभारती, लेखानगर, इंदिरा गांधी वसाहत परिसरात फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर युनिट-2 च्या पथकाने तत्काळ कारवाई सुरु केली. सपोनि. हेमंत तोडकर (प्रभारी अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली सपोउनि. सुहास क्षिरसागर, प्रेमचंद गांगुर्डे, पोहवा संजय सानप, चंद्रकांत गवळी, पो.अं. प्रविण वानखेडे, चा.पो.अं. सुनील खैरनार आदींनी लेखानगर परिसरात सापळा रचून पांढर्या रंगाच्या स्विफ्ट गाडीसह दोन इसमांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आपली नावे तोहिद उर्फ अमन आतीष खाटीक, वय 23 वर्षे, रा. एन-9 पीजी, लेखानगर, सिडको व मनी बहादुर रामजस यादव, वय 38 वर्षे, रा. हनुमान चौक, शिवाजी चौक नाशिक अशी सांगितली. दोन्ही आरोपींनी पोलिसी तपासात गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी काही दिवसांपूर्वी अंबडगाव येथील एजन्सीच्या शेडलगत असलेल्या रस्त्यावरून शेळ्या व बोकड चोरून स्विफ्ट गाडीत टाकून चोरी केल्याची माहिती दिली. आरोपींच्या कबुलीच्या आधारावर गुन्ह्यात वापरलेली पांढर्या रंगाची स्विफ्ट गाडी (अंदाजे किंमत 7,00,000 रुपये) जप्त करण्यात आली.या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.