अभोण्यात घंटागाड्या बंदमुळे कचर्‍यांचे ढीग

येथील कचरा समस्या नागरिकांच्या पाचवीला पुजली आहे. कचरा व्यवस्थापनासाठी जागेचा प्रश्न अद्याप न सुटल्याने ग्रामस्थ वैतागले आहेत. गावचा निघणारा कचरा उचलायला ग्रामपालिकेची दोन वाहने आहेत. त्यापैकी एकही वाहन गावात येत नसल्याने सर्व कचरा पोत्यांमध्ये भरून गावातच कुठेतरी फेकण्याची व पेटविण्याची वेळ सफाई कर्मचार्‍यांवर आली आहे. परिणामी, दुर्गंधीयुक्त वायू प्रदूषणाचा फटका बसत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
आठवडे बाजार संपल्यावर गावभर प्लास्टिक कागदांचा पसारा अन् कचर्‍याचे प्रमाण वाढत आहे. त्यातच शिळे अन्न प्लास्टिक कागदांमध्ये गुंडाळून कचर्‍यात व रस्त्यावर फेकणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. तर काही लोक प्लास्टिक पिशव्यांमध्ये शिळे अन्न भरून मुक्या जनावरांपुढे टाकतात. कचर्‍याच्या ढिगार्‍यांतून अन्न शोधताना मोकाट जनावरे प्लास्टिक कागद खात असल्याने बहुसंख्य गायींचे आरोग्य बिघडले आहे. पोटात प्लास्टिक कागद व इतर घातक कचर्‍यामुळे पोट फुगून मृत्यूच्या दारात पोहोचल्या आहेत. गावच्या गायरान जमिनीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे बोलले जाते. तर गावठाणच्या जागा गिळंकृत झाल्याने कचरा व्यवस्थापनासाठी आमच्याकडे खड्डा खोदायला जागा नाही, असे कारण प्रशासनाने सांगणे भूषणावह नक्कीच नाही. वरिष्ठ अधिकारी लक्ष घालून मेहनत घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे हा प्रकार म्हणजे अनागोंदी – विकाऊ – भ्रष्ट गैरकारभाराचा कलंकित नमुना म्हणावा लागेल, असे बोलले जात आहे.
अभोणा ग्रामपालिका पदाधिकार्‍यांचा पंचवार्षिक कार्यकाल लवकरच संपेल, पण कचरा समस्येचे निराकरण झाले नाही. त्यामुळे प्रशासन, पदाधिकार्‍यांबद्दल समाजमन कलुषित बनले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *