अमेरिकेचा मोठा शत्रू
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुमारे ७५ देशांवर लादलेल्या जबर आयात शुल्कामुळे अमेरिकेसह जगभरातील शेअर बाजार धडाधड कोसळले. आयात शुल्काचा धसका गुंतवणूकदारांनी घेतला. शेअर बाजार कोसळल्यानंतर आणि जगभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर ट्रम्प यांनी आपल्याच निर्णयाला ९० दिवसांची म्हणजे तीन महिने स्थगिती दिली. यामुळे गुंतवणूकदारांना एक दिलासा मिळाल्याने शेअर बाजारांत पुन्हा तेजी आली आहे. शेअर बाजार खाली आल्यानंतर ट्रम्प यांनी खरेदीची हीच संधी असल्याची प्रतिक्रिया दिली. म्हणजे भविष्यात शेअर बाजारात तेजी येण्याचे संकेत त्यांनी दिले. बाजार खाली आल्यानंतर गुंतवणूक सल्लागार गुंतवणूकदारांना चांगल्या शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला देतात. ट्रम्प यांनी एकप्रकारे तोच सल्ला दिला आहे. आयात शुल्क लादल्याने शेअर बाजारांत मोठी पडझड झाल्याची दखल त्यांनी घेतली असली, तरी अमेरिकेला श्रीमंत होण्याची हीच वेळ असल्याचे त्यांनी म्हटले होते. ट्रम्प यांच्या धोरणावर अमेरिकेत टीका व्हायला लागली. त्यांच्या विरोधात संपूर्ण अमेरिकेत निदर्शने करण्यात आली. याचीही दखल त्यांना घ्यावी लागल्याचे दिसत आहे. आयात शुल्क लादण्याचा निर्णय त्यांनी तूर्त स्थगित केला असला, तरी यातून त्यांनी चीनला वगळले. याचा अर्थ व्यापार युध्दात चीन हाच अमेरिकेचा सर्वांत मोठा शत्रू असल्याचे ट्रम्प यांनी अधोरेखित केले आहे. चीनने अमेरिकेला जशास तसे उत्तर दिले आहे. यामुळे चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापार युध्द आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. अमेरिकेच्या विरोधात चीनने आधीच जागतिक व्यापार संघटनेत तक्रार दाखल केली आहे. याची दखल अमेरिकेने घेतली नाही, तर चिनी वस्तूंवर तब्बल १२५ टक्के शुल्क टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. त्याचवेळी त्यांनी भारतासह ७५ देशांना दिलासा देताना नवीन परस्पर शुल्क (रेसिप्रोकल टेरिफ) ९० दिवसांसाठी स्थगित केले. चीनने जागतिक बाजारपेठेचा अनादर केल्यामुळे शुल्क १२५ टक्क्यांपर्यंत वाढवत आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिका आणि इतर देशांना लुटण्याचे दिवस आता संपलेत, हे चीनला लवकरच समजेल, असेही ते म्हणाले. ज्या ७५ देशांनी अमेरिकेच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी आणि वाटाघाटीसाठी बोलावले आहे आणि कोणत्याही प्रकारे अथवा स्वरूपात अमेरिकेला प्रत्युत्तर दिलेले नाही, त्या देशांसाठी परस्पर शुल्काला ९० दिवसांसाठी तात्पुरता विराम देण्याचा आणि या कालावधीत शुल्क १० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णयही घेतला. अमेरिकेशी व्यापार चर्चा, वाटाघाटी करणाऱ्या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. त्यामुळे भारतालाही दिलासा मिळाला. पण, अमेरिकेचा चीनशी तणाव वाढत आहे. चीननेही अमेरिकेतून आयात होणाऱ्या होणार्या वस्तूंवर वर ३४ टक्के शुल्क आकारण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर ८ एप्रिलपर्यंत जर चीनने अमेरिकन वस्तूंवर लावलेले ३४ टक्के शुल्क हटवले नाही तर अमेरिका चिनी वस्तूंवर ५० टक्के शुल्क आकारेल, अशी सक्त ताकीद ट्रम्प यांनी दिली होती. तथापि, आम्ही अमेरिकेचे ब्लॅकमेलिंग कदापि स्वीकारणार नाही. अमेरिकन शुल्काच्या विरोधात आम्ही शेवटपर्यंत लढू, असे प्रत्युत्तर चीनने दिले होते. नंतर, १० एप्रिलपासून अमेरिकन वस्तूंवरील शुल्क ३४ टक्क्यांवरून ८४ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून आता ट्रम्प यांनी अमेरिकेत आयात होणाऱ्या चिनी वस्तूंवर तब्बल १२५ टक्के कर लादला आहे. यातून अमेरिकन लोकांना चिनी वस्तू महागात पडतील, तर चिनी लोकांना अमेरिकेन वस्तू महाग पडतील. यातून दोन्ही देशांतील लोकांच्या खिशाला झळ पोहचणार आहे. जशास तसे उत्तर दिल्याचा फटका दोन्ही देशातील नागरिकांना सहन करावा लागणार आहे. चीन आणि अमेरिका परस्पर शुल्क वाढवत आहे. पण, उभयांत चर्चा काही होत नाही. अमेरिकेशी चर्चा करण्याची तयारी चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने दर्शविली. मात्र त्याआधी एकमेकांचा आदर राखत समान वागणूक द्यायला हवी, असे आवाहनही चीनने केले आहे. दुसरीकडे ट्रम्प यांनी चीनशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे स्मार्ट व्यक्ती आहेत आणि आम्ही चांगली डील करू. जिनपिंग हे जगातील सर्वात चतुर व्यक्तींपैकी एक असल्याचेही ते म्हणाले. आपण थेट जिनपिंग यांच्यासोबत चर्चा करण्यास तयार आहोत. कोणत्याही क्षणी एक फोन येईल आणि त्यानंतर ही शर्यत संपुष्टात येईल, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. याचा अर्थ चर्चेतून काहीतरी तोडगा निघण्याची अपेक्षा दोन्ही देशांना आहे. गेल्या वर्षी दोन्ही देशांत मिळून एकूण ५८५ अब्ज डॉलरचा व्यापार झाला. पण यात अमेरिकेतून चीनमध्ये होणाऱ्या निर्यातीचे मूल्य १४५ अब्ज डॉलर इतके आहे. याउलट चीनकडून अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीचे मूल्य ४४० अब्ज डॉलर इतके आहे. म्हणजे २९५ अब्ज डॉलरचे आधिक्य (सरप्लस) चीनकडे आहे. तितकीच तूट (डेफिसिट) अमेरिकेकडे आहे. यावरुनच ट्रम्प यांनी चीनवर १२५ टक्क्यांपर्यंत शुल्क लादले असल्याचे दिसून येत आहे. चीन आणि अमेरिकेत सुरू असलेल्या या व्यापार युद्धाचा फटका अप्रत्यक्षपणे भारताला बसण्याची भीती माहिती व तंत्रतज्ञान विभागाचे केंद्रीय सचिव एस. कृष्णन यांनी व्यक्त केली आहे. चीनवर निर्बंध लादल्यामुळे भारतातून अनेक कंपन्यांची निर्यात वाढून त्यातून भारताला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण, त्यापाठोपाठ भारताला फटकाही बसू शकतो, असे कृष्णन म्हणाले आहेत. या परिस्थितीत लगेचच भारतीय मालाला किंवा उत्पादकांना चिंता करण्यासारखी परिस्थिती नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ही फक्त एक शक्यता आहे. आपण सर्व प्रकारच्या शक्यतांसाठी तयार असायला हवे. त्यासाठी केंद्र सरकार या सर्व घडामोडींचा सविस्तर आढावा घेत आहे. आपण सध्या इतरांच्या तुलनेत चांगल्या स्थितीत आहोत. केंद्र सरकार सध्या सर्व संबंधितांशी, उत्पादक कंपन्यांशी यासंदर्भात चर्चा करत आहे. उत्पादक कंपन्यांमध्येही सध्या या सगळ्या घडामोडींबाबत चिंतेचे वातावरण नाही, असे म्हणत त्यांनी भारतीय कंपन्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पण, अमेरिका आणि चीनलाही व्यापार युध्दाचा भारतापेक्षा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे. याचा विचार करुन दोन्ही देश सावध झाले आहेत. दोन्ही देश चर्चेतून मार्ग काढण्याची शक्यता अधिक आहे. तसे काही झाले, तर या व्यापार युध्दाची तीव्रता कमी होऊ शकेल.
सिन्नर : प्रतिनिधी सिन्नर शहराचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या यात्रेच्या निमित्ताने शहरातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील…
सिन्नर : भरत घोटेकर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या घरकुल लाभार्थ्यांना बांधकामांसाठी दिले जाणारे 1 लाख…
नाशिक : प्रतिनिधी वडाळा ते पाथर्डी रस्त्यावरील कलानगर चौकात बसथांब्याअभावी भरउन्हात विद्यार्थी व प्रवाशांना उभे…
धोकादायक वृक्षांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर सिडको : विशेष प्रतिनिधी शहरातील उच्चभ्रू लोकवस्ती म्हणून नामांकित असलेल्या…
शिंदे गावाजवळील बारदान गोडाऊनला भीषण आग नाशिकरोड : प्रतिनिधी शिंदे गावाजवळील बारदान गोडावूनला अचानक पहाटे…
एका संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात सिडको : विशेष प्रतिनिधी :सातपूर येथील रिक्षाचालकाचा टोळक्यांच्या हल्ल्यात खून…