संघर्षाचे एक तपस्वी पर्व :शांताबाई दाणी
डॉक्टर शांताताई दाणी एक समाजशील व्यक्तिमत्व खडकाळी येथे सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या डॉक्टर शांता, यांचा जन्म 1 जानेवारी 1918 रोजी झाला. वडिलांचे नाव धनाजी तर आईचे नाव फुंदाबाई. वडील चौथी पास तर आई निरक्षर. शांताच्या आईला खूप त्रास होता आणि खूप कष्टही करत होती त्यामुळे त्यांच्या आईच्या मनात होते की , आपण शिकलो असतो तर एवढे कष्ट करावे लागले नसते म्हणून त्यांनी शांताला शिकण्याची खूणगाठ मनाशी बांधली व शांतला मिशनच्या शाळेत घातले. नाशिक मधील शिक्षण झाल्यानंतर त्यांना पुण्याच्या गव्हर्मेंट वूमन ट्रेनिंग कॉलेजला दाणी मास्तरांमुळे प्रवेश मिळाला. बाबासाहेबांना घडवण्यात केळुस्कर गुरुजींचा जितका मोलाचा वाटा तितकाच मोलाचा वाटा दाणीमास्तरांचा ताईंना घडविण्यात आहे. दोन वर्षाचे ट्रेनिंग करून ताई मॅडम झाल्या. त्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील विंचूर गावाला नोकरीला लागल्या. डॉक्टर लोंढे यांच्या आग्रहास्तव नोकरी सोडून त्यांनी शिक्षण पूर्ण करण्याचे ठरवले. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या हंप्राठा महाविद्यालयात प्रवेश घेतला. होस्टेलमध्ये राहून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. अतिशय हलाखीच्या परिस्थितीवर मात करून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यात डॉक्टर लोंढे , डॉक्टर चेरियन यांचे मोठे योगदान होते. कॉलेज काळातच ताईंचा व दादासाहेब गायकवाड यांचा संपर्क आला. 1943 -44 या शैक्षणिक वर्षात कॉलेजच्या ओपनिंग ऍड्रेस साठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलवण्यात आले होते .कुलकर्णी हे संस्थेचे संस्थापक होते ते पुरोगामी व नवविचारांचे समर्थक होते. त्यांनी आपल्या संस्थेत जातीयतेला अजिबात थारा दिला नाही. कॉलेजमधील डॉक्टर बाबासाहेबांच्या भाषणाने ताई खूपच प्रभावी झाल्या आणि त्यांच्या आयुष्याला वेगळीच दिशा मिळाली. चळवळीचे वारे वाहू लागले त्यामुळे त्यांनी बीए च्या वर्गात शिकत असताना देखील शिक्षण सोडून त्या सत्याग्रहात सहभागी झाल्या आणि त्यांना बीए ची पदवी मिळवता आली नाही. सन 1956 मध्ये स्वतः बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा ताईंना दिली. ताई समाजकारण व राजकारणात गुरफटून गेल्याने त्यांना शिक्षणाची वाट सोडावी लागली. कुणाल प्राथमिक शाळा, रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय, मुलांचे वस्तीगृह, मुलांचे तक्षशिला विद्यालय ,मुलींचे वस्तीगृह अशा या ताईंच्या कार्याचा विस्तार झाला. त्यांनी तळागाळातील मुलींपर्यंत शिक्षण पोहोचावे यासाठी खूप प्रयत्न केले आणि त्यांना त्यात यशही आले. यासाठी त्यांना त्यांची मैत्रीण सरिता उजागरे यांची खूप मदत झाली. उजागरे बाईंनी रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयाचा पाया तळमळीने घातला. नवनवे प्रकल्प राबवले. इमारत नसली तरी शाळेतील नवे उपक्रम बघण्यासाठी बाहेरून मोठी माणसे येत होती व शाळेला देणगी देत होती. त्यामध्ये पु. ल. देशपांडे, तात्यासाहेब शिरवाडकर, श्री दादासाहेब रूपवते, अशोक टिळे ,नामदार मधुकरराव चौधरी ,नामदार रासू गवई आदी मान्यवरांनी शाळेला भेट दिली. 1987 मध्ये ताईंना सावित्रीबाई फुले पारितोषिक देण्यात आला. तात्या साहेबांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला तेव्हा नाशिककरांनी मोठा सत्कार समारंभ ठेवला. तेव्हा तात्या म्हणाले , ” मला फक्त एकच हार घालावा आणि तो फक्त शांताताई” यांनीच घालावा असे तात्यासाहेब म्हटल्यानंतर ताईंना खूप भरून आले. त्यांना डॉक्टर लोंढे यांनी लेडीज सायकल घेऊन दिली होती. नाशकातील पहिली सायकल चालवणारी मुलगी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एक विश्वासू सहकारी म्हणून दादासाहेब गायकवाड ओळखले जात होते, त्याचप्रमाणे दादासाहेब गायकवाड यांचा विश्वासू सहकारी म्हणून शांताताई यांना ओळखले जात. शांताताई दलित चळवळीचा 1945 नंतरचा एक चालता बोलता इतिहास .त्यांचे जीवन अतिशय स्वच्छ साधे आणि प्रभावी होते. त्यांच्या नसानसात बाबासाहेब भिनले गेले होते ..शाळेतील मुलांना आशीर्वाद देताना त्यांचे एकच वाक्य ठरलेले असे ते म्हणजे,”” खूप शिका आणि डॉक्टर आंबेडकर बना “चळवळीला त्यांनी आपले आयुष्य अर्पण केले. त्यांच्या संसारात दोन-तीनशे मुली होत्या. बालावाडीत चिल्लीपिल्ली होती. त्यांचा संसार नेहमी भरलेला असायचा. आमच्या संस्थेच्या बाबतीत हे मोठे सदभाग्य आहे की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई ,दादासाहेब गायकवाड यांचे आशीर्वाद आणि शांताताई दानी यांचे कर्तुत्व या त्रिवेणी संगमातून ही संस्था आकाराला आली. शांता ताई सारखी जबरदस्त कार्यकर्ते एखाद्या संस्थेला किंवा कार्याला लाभणं ही त्या कार्याच्या यशाची निर्मिती होय. सन 1968 मध्ये शांताताई दाणी विधानसभेवर निवडून आल्या व त्या आमदार झाल्या. सतत काम करत राहणे हा त्यांचा ध्येय असे. काही व्यक्तींचे जीवनच मुळी साधने सारखे असते .त्यांची कार्य साधना त्या सतत प्रचलित एकेक कृती ,कार्य ,चळवळ, मोर्चा, धरणे, निदर्शने, सत्याग्रह हीच त्यांची कार्य साधना.” रमाकुटीर” हे लहान मोठ्या समाजकार्याचे स्फूर्ती स्थान होते .शांताबाई दाणी ही व्यक्ती नव्हे तर एक परिपूर्ण संस्था. डॉक्टर शांताताई दाणींचा चा वेगवेगळ्या संस्था कडून सतत त्यांच्या कार्याचे आणि त्यांच्या परिश्रमाची पावती म्हणून अनेक पुरस्कार लाभत गेले. सावित्रीबाई फुले आदर्श समाजसेविका, अहिल्याबाई होळकर आदी शासकीय मान सन्मान मिळाले होते. जागतिक मराठी परिषदेचे दिल्ली येथे राष्ट्रपती डॉक्टर शंकर दया शर्मा यांच्या हस्ते शांताबाई दाणी यांचा गौरव केला. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने त्यांना डिलीट ही सर्वोच्च ज्ञान पदवी देऊन सन्मानित केले. ताई जपान, मलेशिया, श्रीलंका या देशांना भेटी दिल्या. शांताताई दाणी शांतता आणि बौद्ध धर्म कार्यामध्ये सक्रिय होत्या. 1991 रमाबाई आंबेडकर कन्या शाळेच्या प्रवेशद्वाराशी चैतन्य स्तुपाची उभारणी केली. सर्व महाराष्ट्रात एकमेव असणारा असा स्तुप आहे. करारीपणाचे शिस्तप्रियतेचे निष्ठेचे असे एक लेन व्यक्तीला लाभलं की, त्या व्यक्तीचा उत्साह उमेद प्रसन्नता जिद्द आणि महत्त्वकांक्षा कधीही संपत नाही. नऊ ऑगस्ट 2002 रोजी शांताबाई दाणी यांचे निधन झाले. संघर्षाचे एक तपस्वी पर्व अस्ताला गेले.
सौ. उर्मिला मुकेश भदाणे
उपशिक्षिका— कुणाल प्राथमिक शाळा
रमा कुटीर, जुना आग्रा, रोड गडकरी चौक, नाशिक.