कुठलीही झाडे तोडली जाणार नाहीत ः उद्यान विभागाचा दावा
नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून तपोवनातील साधुग्राममध्ये कामाला सुरुवात होणार आहे. तपोवनातील 54 एकरच्या क्षेत्रात अठराशेहून अधिक झाडे आहेत. मात्र, यातील केवळ काटेरी झाडेझुडपे तोडली जाणार आहेत. आवश्यकतेनुसार काही झाडांच्या फांद्या छाटल्या जातील, असेे स्पष्टीकरण महापालिकेच्या उद्यान विभागाने दिले आहे. गेल्या वेळी साधुग्राममध्ये साधू-महंतांचे आखाडे होते, त्या परिसरात चारशेहून अधिक काटेरी बाभळीची झाडे उगवली असल्याने ती तोडावीच लागणार आहेत. त्याशिवाय साधुग्राममध्ये कोणतेही काम करणे अशक्य आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शहरात रस्ते, पूल, स्वच्छता, वाहतूक, पाणीपुरवठा आदींसह विविध कामे महापालिका प्रशासनाकडून केली जाणार आहेत. सिंहस्थाचे केंद्रस्थान असलेल्या साधुग्राममध्ये अद्याप कुठलेही काम सुरू झाले नसल्याचे चित्र आहे. परिणामी यावरून साधू-महंतांकडून नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, 2015 साली झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात साधुग्रामध्ये साधू-महंतांना टेंट उभारण्याची व्यवस्था करण्यात आली होती. याकरिता रस्ते तयार करण्याबरोबरच पथदीप, पाणीपुरवठा, स्वच्छतागृहाची व्यवस्था केली होती. आताही त्याच धर्तीवर साधुग्राममध्ये टेंट, रस्ते सुविधांसह इतर मूलभूत सुविधा महापालिका प्रशासनाला करायच्या आहेत. बारा वर्षांत 54 एकरवरील क्षेत्रात मोठ्या संख्येने झाडे वाढली आहेत. शिवाय मोठमोठे गवत तेथे वाढलेले आहे. यात सर्वाधिक काटेरी बाभळी आहे.
वृक्षतोडीला भाकपाची हरकत
नाशिक : प्रतिनिधी
तपोवन-पंचवटी परिसरातील साधुग्राम प्रकल्पासाठी नाशिक महानगरपालिकेकडून सुमारे 1700 झाडांची तोड, छाटणी आणि पुनर्रोपणाचा प्रस्ताव जाहीर झाला असून, त्यासंदर्भातील नोटीस 11 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध झाली होती. या जाहीरातीविरोधात भाकपाने अधिकृत हरकत नोंदवून पर्यावरणीय, कायदेशीर आणि सांस्कृतिक मुद्दे अधोरेखित केले.
तपोवन परिसरातील दाट हिरवाई, चिंच, कडुनिंब, जांभूळ यांसारख्या भारतीय प्रजातींचे वर्चस्व आणि अनेक प्रौढ वृक्ष हेरिटेज ट्री म्हणून घोषित होण्याची शक्यता नमूद करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणातील झाडतोडीमुळे नाशिकचे वाढते तापमान, हवेची गुणवत्ता, भूजलस्तर आणि एकूण हवामान सुरक्षा गंभीर धोक्यात येईल, असा स्पष्ट इशारा भाकपाने दिला आहे.
तपोवनचा पर्यावरणीय समतोल, सांस्कृतिक वारसा आणि नाशिकच्या दीर्घकालीन हिताच्या दृष्टीने झाडतोडीच्या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करण्याची मागणी भाकपाने ने केली आहे. यावेळी पक्षाचे शहर सचिव तल्हा शेख, जिल्हा कौन्सिल सदस्य . पद्माकर इंगळे, मीना आढाव आणि सुरेश गायकवाड आदी उपस्थित होते.
भाकपाच्या प्रमुख मागण्या
1700 झाडतोडीचा निर्णय तत्काळ स्थगित करावा. नागरिकांच्या हरकतींसाठी मुदतवाढ द्यावी. पर्यावरण व जैवविविधता तज्ज्ञांसह नागरिकांची संयुक्त साइट व्हिजिट घ्यावी. सर्व पर्यावरणीय अहवाल आणि पर्यायी जागांच्या मूल्यमापनाची माहिती सार्वजनिक करावी.