भारत स्वतंत्र झाला केव्हा काश्मीर संस्थान भारतात विलीन झालेले नव्हते. राजा हरिसिंग यांना काश्मीरचे स्वतंत्र अस्तित्व ठेवायचे होते. परंतु, पाकिस्तानने हल्ला केल्यानंतर भारतात काश्मीरचे विलिनीकरण करण्याखेरीज त्यांच्याकडे पर्याय राहिलेला नव्हता. दुसरीकडे काश्मिरच्या निम्म्या भागावर पाकिस्तानने कब्जा केलेला होता. युध्दबंदी झाल्यानंतर काश्मीरचा काही भाग पाकिस्तानात आणि काही भाग भारतात राहिल्यापासून पाकव्याप्त काश्मीर आणि भारतव्याप्त काश्मीर उदयास आले. संपूर्ण काश्मीर आमचाच असल्याचा पाकिस्तानचा दावा असून, त्याच दाव्यातून काश्मिरी दहशतवाद जन्मास आला. अशा या काश्मीरमध्ये राहणार्या पंडितांचा सुरुवातीपासूनच छळ होत आलेला असल्याने त्यांना स्थलांतर करावे लागले. थोडक्यात काय, तर पंडितांवर अन्याय अत्याचार होऊ लागले. सन १९९० च्या सुमारास काश्मिरी दहशतवाद्यांनी उच्छाद मांडला होता. त्यात काश्मिरी पंडितांवर अत्याचार झाले. या अत्याचारांच्या घटनांवर आधारित ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट देशात प्रदर्शित झाला तेव्हा बरीच उलटसुलट चर्चा झाली. चित्रपट काढण्याचा उद्देश काय? हा चित्रपट नेमका कोणासाठी? या चित्रपटातून नेमके काय सांगायचे आहे? या चित्रपटाद्वारे कोणाला लक्ष्य करायचे? आणि कशाचा प्रचार करायचा? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. चित्रपटाचे समर्थन करण्यात आले आणि दुसरीकडे विरोधही झाला. हा सारा इतिहास फार जुना नाही. मात्र, या चित्रपटाचा वापर काही हेतूंसाठी करण्यात आला. विशिष्ट अशी पार्श्वभूमी असलेला आणि जन्मापासूनच चर्चेत असलेल्या हा चित्रपट ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ म्हणजेच आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) मध्ये समाविष्ट करण्यात आला. गोव्याची राजधानी पणजी येथे भरलेल्या महोत्सवातील ज्युरी (समीक्षक) नदव लॅपिड यांनी जाहीर भाष्य करुन भारतात ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट पुन्हा चर्चेत आणला आहे. “द काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही सर्वजण विचलित झालो आहोत. हा चित्रपट म्हणजे त्रस्त करणारा अनुभव आहे. हा चित्रपट आम्हाला व्हलगर (अश्लील) तसेच प्रपोगांडा (विशिष्ट उद्देशाने प्रचार करण्याच्या हेतूने बनवलेला) वाटला. इतक्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवणे योग्य नाही. मी माझ्या भावना या मंचावर मोकळेपणाने मांडू शकतो. ही चर्चा होणे गरजेचे आहे. मनात कोणतीही शंका न ठेवता ही चर्चा होणे कलेसाठी गरजेचे आहे,” असे विधान लॅपिड यांनी केले. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने या चित्रपटाची नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
कारण काय?
‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट अनेक कारणांनी भारतात चर्चेत होता आणि असल्याची चांगली माहिती असूनही लॅपिड यांना जाहीर मत व्यक्त करण्याची गरज होती काय? चित्रपट महोत्सवासाठी ज्युरी (समीक्षक-परीक्षक) म्हणून भारत सरकारने त्यांना इस्त्रायलमधील एक दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून त्यांना निमंत्रित केले होते. ज्या चित्रपटाचे सरकारनेच समर्थन केले होते, हे चांगले माहिती असूनही त्यांनी त्यावर मत व्यक्त करण्याची गरज होती काय? सर्वकाही माहिती असूनही त्यांनी जाणूनबुजून या चित्रपटावर मत व्यक्त केले, तर नाही ना? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. भारतात येऊन, भारतातच गाजलेल्या चित्रपटाविषयी नकारात्मक मत व्यक्त करुन त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते, कलावंत यांच्या भावनांना ठेच पोहोचविली. इतकेच नाही, तर भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्दर्शक, निर्माते आणि कलावंत यांची नाराजी ओढवून घेतली. काही अपवाद वगळता कोणीही त्यांच्या मताशी सहमती दर्शविली नाही. लॅपिड यांनी आपले वैयक्तिक मत मांडलेही असेल, याविषयी वाद नाही. मात्र, त्यांनी जाहीर मत व्यक्त करुन भारतात ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचा पुन्हा एकदा ‘प्रोमो’ केला. त्यांचे मत अनेकांना अमान्य होणारे असले, तरी ज्या चित्रपटावरील चर्चा कुठेतरी थांबली होती. ती नव्याने सुरू झाली आहे. काश्मीर, काश्मिरी पंडित हेही विषय नव्याने चर्चेत आले आहे. जम्मू-काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारे राज्यघटनेत ३७० वे कलम रद्द करण्यात आले असले, तरी काश्मीरचा प्रश्न काही सुटलेला नाही. हा प्रश्न लवकर सुटणारा नाही, याची जाणीव भारत आणि पाकिस्तान या दोन देशांना, काश्मिरी जनतेला आणि तेथील राजकीय पक्षांना, नेत्यांना आहे. एखाद्या वादग्रस्त विषयावर पाहुणा म्हणून आलेल्या व्यक्तीने वादग्रस्त विधान करणे उचित नव्हते. लॅपिड यांना भारताचा पाहुणचार नीट स्वीकारता आला नाही, तर त्यांनी त्यांचा ‘पाहुणचार’ करण्याची संधी या चित्रपटाच्या समर्थकांना नक्कीच करुन दिली आहे. इस्रायलमधील ज्यू आणि भारतातील काश्मिरी पंडित यांच्या समस्या, त्यांच्यावर झालेले अत्याचार काहीसे सारखेच आहेत, याची जाणीवही लॅपिड यांना राहिली नसल्याने त्यांच्यावर टीकेचा भडिमार होत आहे.
कान टोचले
‘द काश्मीर फाईल्स’ या नाजूक विषयाला हात घातल्याबद्दल लॅपिड यांचे अनेकांनी कान टोचले आहेत. परंतु, त्यांची हजेरी घेतली किंवा हजामत खर्या अर्थाने केली, ती त्यांच्याच देशाचे भारतातील भारतामधील राजदूत नाओर गिलॉन यांनी. त्यांनी लॅपिड यांची लाजच काढली. एका खुल्या पत्रात गिलॉन यांनी “मी तुम्हाला सर्वात शेवटची ओळख आधी सांगतो आणि म्हणजे लॅपिड यांना स्वत:ची लाज वाटली पाहिजे,” असे म्हणत गॅलिन यांनी लॅपिड यांना भारतीय संस्कृतीची आठवण करुन दिली. “भारतीय संस्कृतीमध्ये पाहुणे हे देवाप्रमाणे असतात असे म्हणतात. भारतामधील ‘इफ्फी’साठीच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणा म्हणून दिलेल्या आमंत्रणाचा मान तू ठेवला नाही. तू भारतीयांचा विश्वास, सन्मान आणि पाहुणचाराचा अपमान केला.” असेही म्हटले आहे. असंवेदनशीलपणे आणि पूर्वग्रह दूषित ठेऊन ऐतिहासिक घटनांबद्दल पूर्ण अभ्यास न करता बोलणे चुकीचे आहे, याची जाणीव करुन दिली. पॅलेस्टाईन प्रश्नावर इस्रायलबरोबर भारताचे राजनैतिक संबंध पूर्वी फार चांगले नव्हतेच. अलीकडच्या काळात संबंध चांगले झाले आहेत. हे संबंध बिघडू नयेत, याची दक्षता दोन्ही देश घेत आहेत. सांस्कृतिक संबंधाचा एक भाग म्हणून लॅपिड यांना निमंत्रित करण्यात आले होते. “भारत आणि इस्रायल या दोन्ही देशांमधील मैत्री आणि नाते संबंध फार मजबूत आहेत. हे संबंधांवर तुझ्या विधानांमुळे परिणाम होणार नाहीत. एक व्यक्ती म्हणून मला फार लाज वाटत आहे. त्यांनी दिलेल्या प्रेमाच्या मोबदल्यात आणि मैत्रीच्या बदल्यात आपण त्यांच्यावर जी टीका केली आहे त्यासाठी मी आपले आदरातिथ्य करणाऱ्या देशाची माफी मागू इच्छितो,” असे गिलॉन यांनी शेवटी म्हणत संबंध बिघडणार नाहीत, याची दखल घेतली आहे. त्यांनी संयमी आणि उपहासात्मक शब्दांत लॅपिड यांना फटकारले. तसे फटकार ‘द काश्मीर फाईल्स’ समर्थकांना लगावता आले नाहीत.