ऑनलाइन दोन हजारांचे कर्ज पडले महागात
तरुणीसोबत जे घडले ते भयानकच
शहापूर: साजिद शेख
जाहिरातीला भुलून २ हजारांचे कर्ज घेणे एका तरूणीचा चांगलेच महागात पडले आहे. सायबर भामट्याने या तरुणीचा मोबाईल हॅक करून तिची छायाचित्रे चोरली आणि कृत्रिम बुध्दीमत्तेच्या (एआय) मदतीने गैरवापर करून तिची अनेक अश्लील छायाचित्रे तयार केली होती. पीडितने कर्जाची परतफेड केली तरी ही संपादीत केलेली अश्लील छायाचित्रे तिच्या नातेवाकाईंना पाठवून तिची बदनामी केली.
पीडित तरूणी २० वर्षांची असून ती ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. तिला पैशांची आवश्यकता होती. दरम्यान २० जुलै रोजी ती इन्स्टाग्राम बघत असताना तिला एक जाहिरात दिसली. कमी मुदतीसाठी तात्काळ कर्ज दिले जाईल असा दावा या जाहिरातीत करण्यात आला होता. या तरूणीला एक आठवड्यासाठी पैसे हवे होते. त्यामुळे तिने त्या जाहिरातीवरील क्रमाकांवर संपर्क साधला.संबंधित व्यक्तीने तिला ‘कॅश लोन’ नावाचे एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार या तरूणीने हे ॲप डाऊनलोड केले. मात्र त्याच वेळी सायबर भामट्याने तिच्या मोबाईलमध्ये प्रवेश (ॲक्सेस) मिळवला होता. तरुणीने ॲप डाऊनलोड केल्यानंतर आपल्या कोटक बॅंकेच्या खात्याची माहिती आणि आपले आधार कार्ड अपलोड केले होते. त्यानंतर तिच्या खात्यात २ हजार ऐवजी १३०० रुपये पाठविण्यात आले. उर्वरित रक्कम कर आणि कमिशन असल्याचे सांगण्यात आले. परंतु किमान गरजेच्या वेळी १३०० रुपये मिळाल्याने तिने काही तक्रार केली नव्हती.या तरूणीने आठवड्याभरासाठीच २ हजारांचे कर्ज घेतले होते. परंतु त्याची मुदत संपण्याच्या आतच तिला वेगवेगळ्या क्रमांकावरून पैशांची परतफेड करण्यासाठी फोन येऊ लागले. लवकर पैसे भर अन्यथा तुझी अश्लील छायाचित्रे प्रसारित करू अशी तिला धमकी देण्यात आली होती. दोन तीन दिवसात पैसे परत करेन असे तिने सांगितले होते. मात्र तरी तिला धमक्यांचे फोन सुरू होते. सतत होणाऱ्या फोनच्या त्रासाला ती वैतागली. तिला ३१ जुलै रोजी मोबाईलवर एक युपीआय आयडी असलेला क्यू आर कोड पाठविण्यात आला. त्यावर तिने दोन वेळा प्रत्येकी १ हजार रुपये भरले. आता तरी या त्रासातून सुटका होईल, असे तिला वाटले होते.
सायबर भामट्यांनी या तरुणीच्या मोबाईलमधील संपर्क क्रमांक चोरले होते. तसेच तिच्या मोबाईल गॅलरीमधून तिची खासगी छायाचित्रे काढून घेतली होती. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून ही छायाचित्रे संपादीत (एडीट) करून अश्लील छायाचित्रात रुपांतरीत करण्यात आली होती. किमान २०० वेगवेगळी अश्लील छायाचित्रे तयार करण्यात आली. ही छायाचित्रे तिच्या जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाठविण्यात आली. हा प्रकार तिने वडिलांना सांगितला आणि त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ओशिवरा पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.