नाशिक : प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यात रब्बी हंगामात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात असून शेतकऱ्यांकडून विविध खतांच्या ग्रेडचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. अशावेळी अधिकृत खत विक्रेते यांचे मार्फत शेतकऱ्यांना अनाधिकृत व विना परवाना कमी दरात बनावट द्रवरूप खते उपलब्ध करून दिले जात असल्याचा संशय कृषी विभागास होता. त्यानुसार कृषी विभागाच्या पथकाने सापळा रचून धुळे तालुक्यातील मे.धनदाई अॅग्रो एजन्सी,बेहेड या खत विक्रेत्याकडे मे.एग्रो मित्रा न्युट्रीकेम प्रा.लि.सातपुर , नाशिक यांनी उत्पादीत केलेली द्रवरुप खते पाच लिटर कॅनमधील साठा कृषी विभागाच्या जिल्हा भरारी पथकाने जप्त केला .
विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या आदेशानुसार तसेच धुळे येथील जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शांताराम मालपुरे, धुळे, नाशिक विभागाचे
तंत्र अधिकारी (गु.नि) संजय शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक मनोज शिसोदे, मोहीम अधिकारी, प्रदिप निकम,
कृषि अधिकारी,पं.स. अभय कोर, कृषी अधिकारी
रमेश नेतनराव यांच्या सहकार्याने विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक,नितेंद्र पानपाटील यांनी ही कारवाई केली आहे. यावेळी पथकाने अनाधिकृत व विना परवाना खतांचा ६० लिटर साठा जप्त केला असून, त्याचे बाजार मूल्य सुमारे १८ हजार एवढे आहे. संशयित विनोद जयाजी तोरवणे, प्रोपरायटर,मे.धनदाई अॅग्रो एजन्सी,बेहेड ता.साक्री व मे.एग्रो मित्रा न्युट्रीकेम प्रा.लि.सातपुर , नाशिक विरुद्ध खत नियंत्रण आदेश १९८५ , अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ व पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितेंद्र पानपाटील यांच्या फिर्यादीवरून साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक मोहन वाघ यांनी आवाहन केले आहे की, शेतकरी बांधवांनी अनाधिकृत व विना परवाना खते खरेदी करू नयेत तसेच खते, बियाणे व किटकनाशके खरेदी करताना अधिकृत परवाना धारक कृषी सेवा केंद्रातून पक्की पावती घेऊन खरेदी करावीत. कुठेही अनधिकृत आढळून आल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ कृषी विभागाला द्यावी.