सिन्नर:
सिन्नर तालुक्यातील दुसंगवाडी येथील शेतातजनावरांना चारा म्हणून साठवून
ठेवलेला सोयाबीनचा भुसा वीज पडून लागलेल्या आगीत खाक झाल्याची घटना रविवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली.
दुसंगवाडी शिवारात गट नंबर 139 मध्ये सेवानिवृत्त शिक्षक दगडू बाबुराव ढमाले यांचे शेत आहे. भागात वादळ सुरू होते. यादरम्यान आकाशात विजा देखील कडाडत होत्या. एक वाजेच्या सुमारास वीज पडल्याचा आवाज होऊन श्री ढमाले यांच्या शेतात साठवून ठेवलेल्या भुसाच्या गंजीने अचानक पेट घेतला. वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते. वादळात आग विझविण्यासाठी कोणी पुढे झाले नाही, शिवाय परिसरातील वीजपुरवठा देखील खंडित झाला होता. सिन्नर येथील नगरपालिकेच्या अग्निशमन दलास मदतीची विनंती केली. सिन्नर येथून आलेल्या बंबाने आग विझवली. मात्र तोपर्यंत चारा, बांबूचा ढिगारा, ड्रीपच्या नळ्या जाळून खाक झाल्या होत्या. या घटनेत श्री ढमाले यांचे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.