गुरुवारी भव्य पालखी, धार्मिक उत्सव व महाप्रसाद
सिन्नर : प्रतिनिधी
शहराचे ऐतिहासिक व धार्मिक वैभव असलेल्या श्री महागणपती मंदिराच्या जीर्णोद्धार व उत्सवमूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी (दि. 22) शहरात भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराने अमृत महोत्सव पूर्ण केला आहे. शताब्दीकडे वाटचाल करत असून, यानिमित्ताने भव्य पालखी मिरवणूक व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल आहे, अशी माहिती लोखंडे परिवार व श्री महागणपती मंदिर समितीच्या वतीने देण्यात आली.
या वर्धापन दिनानिमित्त सकाळी 9 ते 12 या वेळेत श्रींची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. लोखंडे निवास (गणेश चौक) येथून पालखीला प्रारंभ होऊन श्री महागणपती मंदिर, भैरवनाथ महाराज पटांगणमार्गे मार्गक्रमण करत पुन्हा गणेश चौक येथे मिरवणुकीचा समारोप होणार आहे. या सोहळ्यात शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी होणार आहेत.
गणेश जयंतीचे औचित्य साधून दुपारी 12.30 ते 4 या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्यासाठी लोखंडे परिवार, श्री महागणपती मंदिर समिती व समस्त सिन्नरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
लाल रंग साजाची अनोखी परंपरा
या मंदिरातील गणपतीला शेंदूर न लावता दरवर्षी लाल रंगसाज चढवण्याची अनोखी परंपरा आहे. त्यामुळे मूर्तीचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. या महाकाय मूर्तीला 25 ते 30 फूट लांबीचा हार अर्पण करण्यात येतो. वर्धापन दिनानिमित्त मंदिर परिसरात विशेष सजावट व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.
मूर्तीचा ऐतिहासिक वारसा
या मंदिरातील 15 फूट उंच, चतुर्भुज श्री महागणपतीची भव्य मूर्ती भाविकांचे विशेष आकर्षण ठरली आहे. ही देखणी मूर्ती कै. रंगनाथ गंगाराम लोखंडे यांनी साकारली आहे. या मूर्तीची ख्याती देश-विदेशात पोहोचली असून, 1966 मध्ये ‘एअर इंडिया’च्या आंतरराष्ट्रीय कॅलेंडरवर या मूर्तीचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. तसेच प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या ‘पुजारीण’ चित्रपटात या गणपतीचे दर्शन घडले आहे.