अपहृत मुलीची उत्तरप्रदेशमध्ये यशस्वी सुटका

पंचवटी : वार्ताहर
मखमलाबाद येथून अपहरण केलेल्या मुलीची म्हसरुळ पोलिसांनी उत्तरप्रदेश येथून यशस्वी सुटका केली. अपहरणाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी व पीडीत मुलीला उत्तरप्रदेशमधून ताब्यात घेण्यात यश आले आहे.दिनांक 24 मार्च रोजी मखमलाबाद येथील शाळेतील विद्यार्थिनी आपल्या शाळेच्या कामासाठी 11.00 वाजता घरातून बाहेर पडली. परंतु ती संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत घरी परतली नाही. तिच्या कुटुंबीयांनी शाळा आणि आसपासच्या परिसरात शोध घेतला. पण ती मिळून आली नाही. यावरून म्हसरुळ पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवला गेला.
पोलीस उपनिरीक्षक गजानन जोशी यांच्या नेतृत्वात तपास सुरू करण्यात आला. तांत्रिक विश्लेषण व खब-यांच्या माहितीच्या आधारे आरोपीचा मागोवा घेण्यात आला. प्रथम त्याचा लखनऊ येथे शोध घेतला गेला. परंतु तो तिथे सापडला नाही. पुढील तपासात आरोपी व पीडीत मुलगी अयोध्या-लखनऊ रस्त्यावरील रसुलपूर स्टॉपवर सापडले. यावरून पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले आणि पीडीत मुलीला सुटका केली. मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
या तपास कार्यामध्ये सायबर पोलिस दलाच्या जया तारडे आणि भुषण देशमुख यांनीही महत्त्वाची माहिती दिली. या कारवाईमध्ये पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, सहा. पोलीस आयुक्त पदमजा बढे यांच्या मार्गदर्शनाखाली, वपोनि अतुल डहाके, पोउपनि गजानन जोशी, पोहवा राकेश शिंदे, प्रशांत वालझाडे, बाळासाहेब मुर्तडक, पोअ भाऊराव गवळी, प्रमोद गायकवाड, मपोअ मेघा वाघ आणि राजश्री दिघोळे आदींनी विशेष परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *