मोठी दुर्घटना टळली; तीन जण जखमी
पंचवटी : प्रतिनिधी
शहरात शारदीय नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू असून, येणार्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने आजी- माजी लोकप्रतिनिधींसह भावी इच्छुक उमेदवारांसह विविध पक्षांच्या पदाधिकार्यांनी व सामाजिक कार्यकर्ते यांनी पंचवटी विभागात जागोजागी फलक व भव्यदिव्य अशा कमानी उभ्या केल्या आहेत. यातच बुधवारी (दि.24) दुपारच्या सुमारास मखमलाबाद रोडवरील ड्रिंम कॅसल चौकातील सिग्नलजवळील एका बाजूची कमान कोसळल्याची घटना घडली. यात दोन ते तीन जण जखमी झाले. सुदैवाने कमान कोसळली त्यावेळी फारशी वर्दळ नव्हती. अन्यथा मुंबईच्या घाटकोपर घटनेची पुनरावृत्ती झाली असती.
नाशिक शहरात सध्या नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंचवटी परिसरासह शहराच्या विविध भागांत आजी-माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार, विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जागोजागी फलक लावलेले आहेत.