खरंच फिट आहात का…?

*खरंच फिट आहात का…?*

डॉ. गौरव गांधी, नाव ऐकलं आहे का ? नसेल तर सांगतो. हे भारतातील नामांकित हृदय शल्य विशारद, अर्थात, हार्ट सर्जन. त्यांच्या पंधरा एक वर्षांच्या वाद्यकीय सेवेत १६,००० हुन अधिक हार्टचे ऑपरेशन करणारे, असे निष्णात सर्जन. गुजरात मधील जामनगर येथील एम.पी. शाह वैद्यकीय महाविद्यालयाच्या गुरू गोविंद सिंग जनरल हॉस्पिटल तसेच शारदा हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करणारे डॉ. गांधी, हे एक तरुण, तडफदार, हसरे, मनमिळाऊ आणि अत्यंत तंदुरुस्त असे सर्जन होते. सोळा हजार हार्ट ऑपरेशन करणारी व्यक्ती कशी असू शकते, याची तुम्ही कल्पना करू शकता. त्यांच्याबद्दल मी परवा सोशल मीडियावर वाचले, ते धक्कादायक बातमीच्या निमित्ताने. डॉ. गौरव गांधी यांचा वयाच्या ४१व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने अकस्मात मृत्यू झाला. बातमी धक्कादायक तर होतीच, तशीच ती मनाला चटका लावून जाणारी होती. मन सुन्न झाले. एकदम २० वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आपल्याच मुंबईतील निष्णात हृदयशल्य विशारद डॉ. नीतू मांडके यांच्याबाबतही असेच काहीसे घडले होते. वयाच्या ५५व्या वर्षी, हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचीही जीवणज्योत मालवली होती. ज्यांनी हिंदू हृदय साम्राटांचे हृद हातात धरले, त्यांनाच हृदयाच्या आजाराने ग्रासले, तर तुमच्या माझ्यासारख्याचे काय होणार, असा यक्ष प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही.

असं कळलं आहे की, डॉ. गौरव गांधी यांना रात्री दोन वाजेच्या सुमारास छातीत अस्वस्थता वाटू लागल्याने ते तात्काळ हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे गेल्यावर त्यांचा ई. सी.जी. (हृदयाचा आलेख) करण्यात आला. परंतु, त्यात काही निष्पन्न झाले नाही म्हणून कदाचित ऍसिडिटी चा त्रास असावा, असे समजून त्यांनी एक इंजेक्शन व काही गोळ्या घेतल्या. अर्धा तास थांबून आणखी काही वेगळा त्रास तर ना, याची खात्री करून ते पुन्हा घरी गेले. सकाळी त्यांच्या पत्नीने त्यांना बाथरूम मध्ये बेशुद्धावस्थेत बघितले, म्हणून त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तिथे पोहोचल्यावर समजले की त्यांचे हृदयाचे ठोके मंदावले असून, बीपी ड्रॉप झाला आहे. त्यांना लगेचच अतिदक्षता विभागात दाखल करून व्हेंटिलेटर द्वारे कृत्रिम श्वासोच्छ्वास देऊन त्यांचे प्राण वाचवण्याचे अथक प्रयत्न केले, तरीही डॉ. गांधी यांचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले नाही. मरणोत्तर शवविच्छेदन तपासणी (पोस्ट मॉर्टम) मध्येही हार्टचा प्रॉब्लेम असल्याचे ठोस पुरावे मिळाले नाही, असे तज्ञांचे मत झाले. (कारण हृदयात घडणारे बदल दिसण्यासाठी किमान सात तास लागतात). घटना अत्यंत दुःखद आहे, यात शंकाच नाही. देशाचा आणि मानवसेवा करणारा एक अनमोल हिरा आपण सर्वांनी गमावला आहे. या वयात अशा पद्धतीने कुणावर काळाने अशी झडप घालावी, हेही हृदयद्रावक आहेच. चालता फिरता व्यक्ती रात्रीतून होत्याच नव्हता होतो, यापेक्षा अधिक दुःखदायक घटना काय असू शकते. त्यांच्या पश्चात त्यांची आईवडील, पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे.

अधिक माहिती नुसार डॉ. गांधी हे शारीरिक आणि मानसिक रित्या खूपच फिट होते. त्यांना क्रिकेटची आवडच नव्हे तर ते स्वतः एक उत्तम क्रिकेटर होते. नियमित जिम करणारे होते. दिसायला स्मार्ट, गोरा वर्ण, चेहऱ्यावर वेगळे तेज. दिवसातील २४ पैकी किमान १४ तास अविरत काम करण्याची क्षमता, आपल्या कामावर प्रेम करणारी अशी ही व्यक्ती. त्यात गांधी म्हंटले की, शुद्ध शाकाहारी, कुठलेही व्यसन नाही, सिगारेट नाही, मद्य आणि मादक पदार्थांचा दूरवर कुठेही संबंध नाही. त्यांचे आरोग्य अगदी सुदृढ होते. हृदयविकारासाठी घातक असलेले कुठलेच रिस्क फॅक्टर्स नव्हते. ना बीपीचा त्रास, ना ही शुगर चा. स्थूलता नाही, वजन आटोक्यात होते, खाण्यापिण्यावर नियंत्रण, थोडक्यात काय तर आरोग्यावर संशय घेण्यासारखे असे काहीच नाही. यापूर्वी कुठला मोठा आजार नाही. नजीकच्या काळात कोविड झाल्याचेही कुठले संकेत नव्हते. आपल्या कामातून स्वतःला सिद्ध करत, कमी वयात यशस्वितेकडे वाटचाल करणारी व्यक्ती. भरपूर काम, भरपूर पैसा, म्हणून आर्थिक बाजू भक्कम होती. त्यामुळे त्याचीही कुठली काळजी नसणार, कुठले दडपण नाही. मग अशा व्यक्तीला हृदयाचा झटका येऊ शकतो का? असा बेसिक प्रश तुमच्याही मनात आलाच ना? माझ्याही आला. घटना तर घडून गेली, आता पुढे… !

जाणारी व्यक्ती तर जीवानिशी गेली, परंतु मागे राहिलेल्यांवर दुःखाचा डोंगरच कोसळला असणार आहे. आर्थिक बाजू सक्षम आणि भक्कम असली तरी त्या व्यक्तीच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. घरातली कर्ता पुरुष किव्हा बाप असण्याने एक शाश्वत जीवन जगता येतं. तरीही पुढील पिढी आपले जीवन जगणार, इतरांचा जीवनपट सुरूच राहणार. मागे राहिलेली मंडळींचे जीवन थोडे मागे, थोडे पुढे, थोडे कमी थोडे अधिक, थोडे तडजोडीचे थोडे जिद्दीने उभारी घेऊन व्यतीत होणार आहे, हेही तितकेच खरे आहे. जाणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत जे काही घडले, त्याचे विवेचन, विश्लेषण, निरीक्षण, अभ्यास केला नाही, आणि त्यातून आपण काही शिकलो नाही, किव्हा काही आकलन झाले नाही, कुठला निष्कर्ष काढून कुठला निर्णय घेऊ शकलो नाही, तर त्या व्यक्तीच्या जाण्याने आपल्या जीवनात कुठलाही बदल घडणे शक्य नाही. त्यातून काही आपल्या उर्वरित जीवनात नाविन्यपूर्ण घडेल अशी शक्यता दिसणार नाही. म्हणून, हा लेख लिहावसा वाटला. घडलेल्या घटनेतून आपण काही बोध घेतला नाही, तर जे डॉ. गांधी यांच्या बाबतीत झाले, ते आपल्या स्वतःच्या किव्हा आपल्या परिजनांच्या बाबतीत घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळीच सावध होऊन आपण आपल्या जीवनात योग्य तो बदल करून आपला जीव अधिक सुरक्षित केला, तरच आपल्याला माणूस म्हणून घेण्याचा अधिकार आहे, असे मला वाटते. अन्यथा, किड्या मुंग्या आणि प्राण्यांप्रमाणे जगण्यात आणि मरण्यात कसला आलाय शहाणपण ?

डॉ. गौरव गांधी यांच्या केस मध्ये, छातीचा त्रास जाणवला असला तरी, त्यांचा इ.सी.जी. नॉर्मल होता. त्यात हृदयविकार असल्याचा कुठलाच बदल झालेला नव्हता. असं होऊ शकतं का ? तर हो, असं हाऊ शकतं असं सायन्स पण म्हणतं. हृदयविकाराचे (हार्ट अटॅक) प्रमुख लक्षण म्हणजे छातीत डाव्या बाजूला वेदना होणे, छातीवर दाब किव्हा दडपण आल्यासारखे वाटणे, डाव्या हातात खांद्यात वेदना जाणवणे, अस्वस्थ वाटणे, घाम येणे, दम लागणे, जळजळ होणे, चक्कर येणे.. ई. स्पष्ट लक्षणे असलेल्या रुग्णांपैकी २० -३०% रुग्णांमध्ये पहिला ई. सी.जी. नॉर्मल असू शकतो, असे पुरावे वैद्यकीय शास्त्रात आहे. थोड्या वेळाने ई.सी.जी. रिपीट केला तर त्यात बदल दिसून येतो, म्हणून एका तापसणीवर जास्त अवलंबून राहू नये. त्याचप्रमाणे, हृदयविकार (हार्ट अटॅक) सदृश लक्षणे असणारे इतर आजार देखील आहेत. त्यामुळे फसगत होते. सामान्यपणे छातीचा त्रास झाला तर, पहिला संशय हार्ट अटॅक आणि दुसरा ऍसिडिटी (अम्लपित्त) असेल असे नेहमी वाटते. मग यात फरक कसा कळेल, याचा विचार डॉक्टरांनी केला पाहिजे. एखादी टेस्ट निगेटिव्ह असली तरी अधिक दृढ खात्री करण्यासाठी त्याला अनुसरून पुढील तपासण्या करणे गरजेचे असते. बऱ्याचदा, अशा घटना रात्रीच्या वेळी होतात. त्यामुळे तात्पुरता उपाय करून सकाळी काय ते बघू, असे म्हणत या घटनांना हलक्यात घेण्याची चुक झालेले अनेक प्रसंग मी बघितले आहे. आणि विशेष म्हणजे, अशाच प्रसंगी घात होतो.

डॉ. गांधींच्या अकाली आणि आकस्मिक जाण्याने अनेक प्रश्न ऐरणीवर आले आहेत. अनेक शंका, कुशंका मनात येणे साहजिक आहे. हे विश्व, हा निसर्ग, हे मानवी जीवन, आपले शरीर, त्यातील प्रत्येक अवयव, त्यांची कार्यपद्धती, जडणारे आजार आजारांना बरं करण्यासाठी विकसित शास्त्र, या वरील सर्वांबद्दलचे आपले ज्ञान किती मर्यादित आहे, हे जाणवते. आपल्याला वाटतं की मानवाने खूप प्रगती आणि विकास केलेला आहे, परंतु हा आपला भ्रम आहे. खूप काही गोष्टी आपल्या आकलनाच्या पलीकडल्या आहेत. जसा एखादा देश आणि त्या देशाचा न्याय आणि कायदा व्यवस्था असते, त्याचप्रकारे हा निसर्ग आहे, आणि याचे काही कायदे, नियम आहेत, आणि हा निसर्ग उचित न्याय करत असतो, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. (क्रमशः)

*डॉ. संजय धुर्जड.*
सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक.
9822457732

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *