सातपूरच्या दोन्ही पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी

 

नाशिक : प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या सातपूरच्या दोन्ही पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी करण्यात आली असून, येथील पदभार सहायक निरीक्षकावर सोपविण्यात आला आहे. या दोन्ही निरीक्षकांवर आर्थिक व्यवहाराचे दावे झाल्याची जोरदार चर्चा आहे. त्यापैकी एका निरीक्षकाची मध्यंतरी खातेतंर्गत चौकशीही करण्यात आली आहे. बदली करताना चव्हाण यांना विशेष शाखेत तर सतीश घोटेकर यांना उपनगर पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले आहे. त्यामुळे अनेक शंका उपस्थित होत असल्याची चर्चा आहे.

पोलीस आयुक्तालयामार्फत प्रशासकीय कारणास्तव सातपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेंद्र चव्हाण आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश घोटेकर यांची बदली करण्यात येऊन येथील पोलीस ठाण्याचा कार्यभार सहायक निरीक्षकाकडे देण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक चव्हाण यांना विशेष शाखेत तर घोटेकर यांची बदली उपनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सहायक निरीक्षक राजू पठाण यांना प्रभारी करण्यात आले आहे. मध्यंतरी सातपूरच्या अशोकनगरमध्ये सावकारीच्या जाचाला कंटाळून दोन मुलांसह पित्याने आत्महत्या केली. त्यानंतर सावकारांविरोधात वातावरण तापले असताना या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या सावकारांवर काहीही कारवाई झाली नाही. त्यातील फरार झालेल्या सावकारांचा नंतर शोधही घेण्यात आला नाही. हे प्रकरण नंतर शांत झाले. या प्रकरणातच  पोलीस अधिकार्‍यांनी आर्थिक हितसंबध जोपासल्याची चर्चा होती. त्यातूनच या बदल्या झाल्याचे बोलले जात आहे. सातपूर पोलीस ठाण्याचा कारभार सद्या प्रभारी अधिकार्‍यांकडे आहे.  विशेष म्हणजे सातपूर परिसरात मोठी औद्योगिक वसाहत आहे. या भागात सातत्याने काही ना काही घडत असते. असे असताना पोलीस निरीक्षकही नसल्याने सातपूर पोलीस ठाण्याचा भार प्रभारींवर टाकण्यात आला आहे. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *