नाशिक : प्रतिनिधी
आदिवासी विकास विभागाकडून आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना सामाजिक-भावनिक शिक्षण देण्यासाठी स्लॅम आउट लाउड आणि गर्ल राइजिंग या संस्थांच्या मदतीने ‘अभिव्यक्ती’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्थानिक पातळीवर कला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात राज्यातील 70 आश्रमशाळांमधील सुमारे 2 हजार 500विद्यार्थ्यांचा सहभागी झाले होते. या मेळाव्याने आश्रमशाळेतील शिक्षणाला नवा आयाम मिळाला आहे.
’अभिव्यक्ती’ कला मेळाव्यात आदिवासी विद्यार्थ्यांनी स्वत:च्या लिहिलेल्या कवितांद्वारे, नाटकांद्वारे आणि चित्रकलेद्वारे भावनिक जाणीव, हवामान बदल आणि सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकला. या मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सहानुभूती, संवाद क्षमता आणि आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाल्याचे समाधानकारक चित्र आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या भावनांचे मूल स्वरात मांडलेले मूळ काव्य सादर केले. त्यांनी आदिवासी समाजाच्या दृष्टिकोनातून हवामान बदलाचे चित्रीकरण केले. विद्यार्थ्यांनी स्वत: कार्यक्रमाचे संचालन केले.
दरम्यान, कलेवर आधारित सामाजिक-भावनिक शिक्षण व्यक्तिगत विकास आणि शैक्षणिक सुधारणांसाठी एक शक्तिशाली माध्यम असल्याचे स्लॅम आउट लाउडच्या संचालक नेहा राठी यांनी सांगितले. तर ‘अभिव्यक्ती’ मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना स्वत:ला व्यक्त करण्याची संधी मिळाली. हे शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने महत्वाचे असल्याचे गर्ल राइजिंगचे संचालक रिचा हिंगोरणी यांनी सांगितले.
‘अभिव्यक्ती’ कला मेळाव्यांच्या माध्यमातून आश्रमशाळांमधील प्रवेशित आदिवासी विद्यार्थ्यांनी हक्काचे व्यासपीठ मिळाले. कला सादरीकरणाद्वारे विद्यार्थ्यांनी भावना व्यक्त केल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वर्तनात बदल होऊन ते बोलके होत आहे.
-लीना बनसोड, आयुक्त (आदिवासी विकास विभाग)