भारतीय रिझर्व्ह बँकेत संचालकपदावर कार्यरत असलेले सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ डॉ. आशुतोष रारावीकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेले भारताचे परकीय व्यापारी कर्ज : वैशिष्ट्ये, कल, धोरण व समस्या हे परकीय व्यापारी कर्जावरील पुस्तक अतिशय वाचनीय आहे. आर्थिक विषयावर दर्जेदार लिखाण मराठीत दुर्मिळ असते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांत प्रशंसा झालेले हे मूळ इंग्रजी पुस्तक आता वाचकांसाठी मराठीत उपलब्ध झाले ही विशेष आनंदाची बाब. व्यावसायिक, उद्योजक यांना व्यवसायाच्या विकासासाठी उपयुक्त असलेल्या परंतु तुलनेने कमी जागरूकता व माहिती असलेल्या या पर्यायी अर्थपुरवठ्याच्या स्रोतावर हे महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. अडीच दशकाहून अधिक काळ देशाच्या आर्थिक धोरणात योगदान देत असलेल्या, तसेच अर्थ मंत्रालयातही संचालकपद भूषवणार्या लेखकाने हे पुस्तक लिहिले असल्याने त्याला अनुभवाचे व त्यातून आलेल्या दृष्टीचे मोल आहे.
हे पुस्तक पाच प्रकरणात विभागले आहे. संकल्पनात्मक आराखडा, परकीय व्यापारी कर्जांची भारतातील वाटचाल, भारताच्या परकीय व्यापारी कर्जधोरणाची उत्क्रांती, अनुभवाधारित अभ्यास व भारताचे परकीय कर्ज व्यवस्थापन : समस्या आणि धोरणात्मक शिफारशी ही त्याची प्रमुख अंगे आहेत. संकल्पना आधी स्पष्ट करून भारताच्या परकीय कर्जाचा प्रवास प्रवाहीपणे सांगितला आहे. रिझर्व्ह बँकेने याबाबत वेळोवेळी धोरणे काय आखली, त्याची वाटचाल याबाबत विवेचन आहे. काही आर्थिक दिग्गजांचे अभ्यास व निष्कर्ष सांगून लेखकाने कर्जव्यवस्थापनातल्या समस्या लक्षात आणून धोरणात्मक शिफारशी केल्या आहेत.
परकीय व्यापारी कर्ज म्हणजे देशातील पात्र नागरिकांनी अधिकृत विदेशी नागरिक आणि घटकांकडून घेतलेली कर्जे होत. त्याचा लाभदायक वापर करून घेणे हे कौशल्यपूर्ण आहे. आंतरराष्ट्रीय व्याजदरातील तफावत उच्च पातळीत असताना देशांतर्गत कर्जाला परकीय व्यापारी कर्ज पूरक ठरू शकेल, असे लेखक म्हणतात. कर्जाचे लाभ व धोके हे संतुलितपणे मांडले आहेत. व्यावसायिक, कॉर्पोरेट, कार्यकारी अधिकारी, कंपनी अधिकारी, संशोधक, विद्यार्थी, धोरणकर्ते, अभ्यासक व जनसामान्यांना मार्गदर्शक असे हे सुबोध पुस्तक आहे. कर्ज व्यवस्थापनासाठी धोरणात्मक सूचना दिल्याने शासनालाही उपयुक्त आहे. देशाच्या विकासविषयक गरजा भागवणार्या महत्त्वाच्या अशा बाह्य कर्जाची कूळकथा अतिशय सुगम रूपात विश्लेषणातून मांडणारे हे पुस्तक असून, मुद्देसूद, सोपी व स्पष्ट मांडणी, चार्टचा वापर, दर्जेदार छपाई यामुळे ते अधिक आकर्षक झाले आहे. सुप्रसिद्ध लेखिका प्रा. डॉ. मंजूषा मुसमाडे यांचा सुरेख अनुवाद व नामवंत अर्थशास्त्रज्ञ डॉ. संतोष दास्ताने यांची उद्बोधक प्रस्तावना यामुळे या छोटेखानी ग्रंथाला विशेष बाज आला आहे. वाचकांना कमी शब्दांत महत्त्वपूर्ण ज्ञान देण्याचे अवघड काम लेखकाने केले आहे. साहित्यिक म्हणूनही प्रसिद्ध असलेल्या असलेल्या रारावीकर यांनी सामान्यांना समजेल अशा सोप्या शैलीत अर्थशास्त्र समजावून सांगितले आहे. आर्थिक साक्षरता ही काळाची गरज असल्याने प्रत्येकाने हे पुस्तक वाचावे.