मतदान केंद्रावर आशा कार्यकर्तींना व्हीलचेअर ओढण्याची सक्ती

मोबदल्याबाबत मात्र ‘आशा’ची झाली निराशा

नाशिक : प्रतिनिधी
मतदान केंद्रावर सकाळी 6 ते सायंकाळी 5.30 अशी ड्यूटी ‘आशा’ची मतदान केंद्रावर लावली होती. व्हीलचेअर ओढण्याची सक्ती करू नका, असे निवेदन देण्यात आले होते. मात्र, तरीही आशा कार्यकर्तींना व्हीलचेअर ओढण्याची सक्ती केली गेली. दिवसभर काम करून केंद्रप्रमुखांनी सह्या घेतल्या नाहीत. मोबदल्याबाबत आम्हाला माहिती नाही, असे सांगितले. त्यामुळे आशा निराश झाल्या आहेत. मोबदला न मिळाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा आशा गट प्रवर्तक संघटना आयटक राज्य अध्यक्ष राजू देसले यांनी दिला आहे.
विधानसभा निवडणुकीदरम्यान आशा कार्यकर्तींना मतदान केंद्रांवर ड्यूटी लावण्यात आली होती. त्यावेळी अनेक ठिकाणी अपंग मतदारांना व्हीलचेअरवरून मतदान कक्षापर्यंत नेण्याचे काम आशा कार्यकर्तींंकडून जबरदस्तीने करून घेतले गेले. पायर्‍या, चढ-उतार, तसेच लांब अंतर यामुळे महिला आशा कार्यकर्तींना मोठ्या शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागले होते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आशा कार्यकर्ती या आरोग्यविषयक मदतीसाठी नेमण्यात आलेल्या असून, व्हीलचेअर ओढणे किंवा जड शारीरिक कामे करणे हे त्यांच्या कामाचा भाग नाही. त्यामुळे अशा कामांसाठी योग्य त्या पुरुष कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात यावी आणि आशा कार्यकर्तींवर कोणतीही सक्ती करू नये, अशी मागणी संघटनेने केली आहे. मतदान केंद्रांवर सकाळपासून ड्यूटी बजावणार्‍या आशा कार्यकर्तींच्या मोबदला पत्रावर सही घेण्यात यावी, त्यांना नियमानुसार मोबदला मिळावा, तसेच नाशिक मनपा निवडणुकीत लावण्यात आलेल्या स्लीप वाटपाच्या कामाचाही योग्य मोबदला आशा कार्यकर्तींना देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, या सर्व मागण्यांची तातडीने दखल घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी विनंती आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *