महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार हा प्रेक्षकांचा आशीर्वादच! अभिनेते अशोक सराफ यांची भावना

महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार हा प्रेक्षकांचा आशीर्वादच!
अभिनेते अशोक सराफ यांची भावना
नाशिक : अश्विनी पांडे

अभिनय क्षेत्रातील पन्नास वर्षांच्या कारकीर्दीतील अभिनयाची नोंद घेत मला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे जाहीर केले, त्याबद्दल मी राज्य शासनाचे व माझ्या अभिनयावर प्रेम करत मला भरभरून आशीर्वाद देणार्‍या मायबाप प्रेक्षकांचा मी आभारी आहे, अशा भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी दै. गांवकरीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केल्या.
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना काही दिवसांपूर्वीच राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला. त्यानिमित्त दै. गांवकरीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर मनमोकळा संवाद साधला.
अशोक सराफ म्हणाले, वयाच्या सातव्या वर्षापासून अभिनय करत आहे. 1967 सालच्या ययाती व देवयानी नाटकाने अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात झाली. सुदैवाने  आजपर्यंतच्या प्रवासात स्ट्रगल करावे लागले नाही.  जे काम करत  होतो  त्या कामाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत गेला. बहुसंख्य व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.  सगळ्याच भूमिका माझ्यासाठी जवळच्या
आहेत.
मालिकेत काम करण्याबद्दल ते म्हणाले, मालिकेत काम करायला नको वाटते कारण   मूळ कथानकापासून मालिका भरकटल्यावर प्रेक्षक दुरावला जातो,  पण  ओटीटीवर मर्यादित भाग असल्यामुळे प्रेक्षक खिळवून राहतात. ओटीटीवर वेगळी भूमिका करायला मिळाली तर मी निश्चितच करेल. मार्च नंतर काही चित्रपट देखील प्रेक्षकाच्या भेटीला येणार असल्याचे   त्यांनी सांगितले. सध्या मराठी चित्रपटाला कमी प्रतिसाद मिळतो  आणि चित्रपटातील विनोदाचा दर्जा खालावला असे म्हणले जाते  त्यावर  अशोक सराफ म्हणाले,  ऐकायला ओंगळवाणे वाटणारे शब्द आपल्याला आवडत नाही म्हणून दर्जा खालावला असे वाटते.  व्दिअर्थी विनोद करणे ही देखील एक कला आहे.पण द्विअर्थी विनोदाने प्रेक्षकांचे फार काळ मनोरंजन होत नाही.  निखळ विनोद करण कठीण आहे, निखळ विनोद जपला पाहिजे.प्रेक्षक चित्रपटाच्या कथेत समरस होतात, मराठी प्रेक्षक चोखंदळ आहे,  चित्रपटातील इतर गोष्टी बरोबर चित्रपटाची कथा चांगली असली तरच  मराठी चित्रपट यशस्वी होतो. अशा चित्रपटांना प्रेक्षक उंदड प्रतिसाद देतात.
प्रत्येक जण आपल्या अंगी असलेल्या कलेप्रमाणे अभिनय करत असतो.आपण केलेला अभिनय  बघताना आपल्याला समाधान वाटेल तर आपल्याला यश मिळू शकते म्हणून आपण व्यक्तीरेखा साकारता स्वता त्यात समरस व्हायला हवे तर यश नक्की मिळेल असा संदेश त्यांनी नवकलावंताना दिला.
त्यांनी मुख्य भूमिका मिळवून दाखवावी!
हिंदी चित्रपटात छोट्या भूमिका करण्याबद्दल नवीन मराठी कलावंताकडून कायम टिपणी केले जाते पण मला व्यक्तिरेखा छोटी असो वा मोठी अभिनय कसा केला जातो  हे महत्त्वाचे वाटते.   ज्यांना मी हिंदीत छोट्या भूमिका केल्या हे चुक वाटतंय त्यांनी  मुख्य  भूमिका मिळवून  दाखवावी. हिंदी  सिनेमात जी हिरोबद्दलची संकल्पना आहे, त्यात मराठी अभिनेते बसत नाहीत.म्हणून मराठी अभिनेत्यांना हिंदीत हिरोची भूमिका मिळत नाही असे परखड मत अशोक सराफ  यांनी व्यक्त केले.
मिम्स प्रचंड आवडतात…
माझ्या अनेक चित्रपटांतील संवाद, गाण्यावर वेगवेगळ्या प्रकारचे मिम्स तयार केले जातात.  कायम  ते मिम्स पाहतो, खूप आवडतात. अतिशय सुंदर आणि त्या गाण्याला संवादाला चपखल असे एडिटिंग असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *