,, अश्वमेध सुसाट, ‘100 प्लस’चं गणित बिघडलं!
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांत भाजपाचा अश्वमेध विरोधकांना रोखता आला नाही. वेगवेगळ्या महानगरपालिकांत काही अपवाद वगळता विरोधक संघटित नव्हते. ठाकरे बंधूंच्या युतीचे आव्हान मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि नाशिक वगळता नव्हतेच. केंद्र व राज्यातील सत्तेच्या बळावर स्थानिक नेते व कार्यकर्ते गळाला लावून भाजपाने विरोधकांना अनेक ठिकाणी नाउमेद केले. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत संपेपर्यंत विरोधी पक्षांत फूट पाडण्याचे काम भाजपाने मोठ्या कौशल्याने करुन ‘ऑपरेशन लोटस ’यशस्वी केले. भाजपाचा अश्वमेध इतक्या वेगात होता की, त्याला मुंबईत ठाकरे बंधूही अडवू शकले नाहीत. , तर इतर ठिकाणांची ची काय बात?
ग्राऊंड लेव्हलचा अंदाज आला नाही
नाशिकमध्ये ‘हंड्रेड प्लस’चा नारा देऊन भाजपाने शिंदेंसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांचा हात सोडून दिला होता. सहज 100 प्लस गाठू, असा विश्वास गिरीश महाजन यांना वाटत होता. सन २०१७ च्या निवडणुकीत भाजपाने स्वबळावर ६६ जागा जिंकल्या होत्या त्या महाजन यांच्या कौशल्यानेच. इतर पक्षांतील आजी नगरसेवक गळाला लावून भाजपाकडे २०१७ च्या निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवकांची संख्या शंभरच्या घरात गेलेली होती. त्यामु़ळे ‘100 प्लस’चं गणित सोपं झालं होतं. अश्वमेध सुसाट असल्याने नाशिकमध्ये १२२ पैकी ७२ जागा सहज मिळाल्या. सत्ता कायम राखता आली, तरी ‘100 प्लस’ टार्गेट गाठता आले नाही. विरोधक पराभवाचे आत्मपरीक्षण करत आहेत किंवा करतील. नाशिकमध्ये एकहाती सत्ता मिळूनही आत्मपरीक्षण करण्याची वेळ भाजपावर आली आहे. नाशिकमध्ये सर्वत्र आपल्याला अनुकूल वातावरण असल्याचं भाजपाला वाटत होते. पण, ग्राऊंड लेव्हलचा अंदाजही सर्वांत मोठ्या पक्षाला आला नाही.
मैत्रीपूर्ण लढती महागात
जागावाटपात घासाघीस करावी लागल्याने कोणाला किती देऊ? आणि कोणासाठी काय ठेवू? असे प्रश्न उपस्थित झाल्याने भाजपाने शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोकळे सोडून दिले आणि स्वबळावर मैत्रीपूर्ण लढतींचा निवडलेला सोपा मार्ग भाजपाला महागात पडला. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी नाशिकमध्ये युती करुन भाजपाला टफ फाईट दिली. शिंदे सेनेने २६ आणि राष्ट्रवादी काँगेसने चार जागा जिंकल्या. मैत्रीपूर्ण लढतीत ३० जागांवर भाजपाला पराभव पत्करावा लागला. या ३० जागा जिंकता आल्या असत्या, तर भाजपाला ७२+३०= १०२ जागा मिळाल्या असत्या.
येथे घोडं अडलं
मनसे आणि ठाकरेसेना या पक्षांना आधीच भगदाड पाडले असल्याने भाजपाने ठाकरे बंधू युतीची म्हणावी तशी दखल घेतली नाही. ठाकरे सेनेने १५ जागा जिंकल्या, तर मनसेच्या वाट्याला एक आली. १६याशिवाय ठाकरे युतीने पाठिंबा दिलेले इपक्ष मुकेश सहाणे यांना जमेस धरता १७ जागांवर भाजपाचा पराभव झाला. येथेही 100 प्लसचं घोडं अडलं. दुबई वॉर्ड म्ह़णून ओळखल्या जाणाऱ्या मुस्लिम बहुल १४ मध्ये भाजपाची ताकदच नाही. या येथे काँग्रेसने आपले अस्तित्व दाखवून देताना तीन मुस्लिम उमेदवार निवडून आणले. याठिकाणी एक जागा अजित पवारांच्या पक्षाने जिंकली. १४ शेजारी असलेल्या १५ मध्ये भाजपाला एकच जागा मिळाली. येथेही 100 प्लसचं घोडं अडलं
सुप्त नकारात्मकता
सर्वाधिक ७२ जागा मिळवून भाजपाने एकहाती सत्ता मिळवली असली, तरी थोडीफार नकारात्मकता होती. सन २०१७ साली नाशिक दत्तक घेण्याची घोषणा करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्नासनांची पूर्ती झाली नाही. टायर मेट्रो प्रकल्प कागदावरच राहिला, स्मार्ट सिटीची कामे झाली नाहीत, कामे होत असताना लोकांना त्रास सहन करावा लागला, गेल्या वर्षी पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांचा लोकांना बराच त्रास झाला इत्यादी कारणे सुप्त नकारात्मकतेत होती. त्यात तपोवनातील झाडे पाडण्याचा प्रश्न चिघळला. नाशिकमध्ये जी काही झाडे आहेत त्यांमुळे नाशिककरांना निदान शुध्द हवा मिळते. नाशिकची हवा दिल्ली, मुबईसारखी दूषित झालेली नाही. हेच नाशिकरांचे नशीब. झाडे तोडण्याचे समर्थन काहीअंशी अंगाशी आल्याने ७२ आकडा गाठतानाही दमछाक झाली, हे नाकारता येत नाही.
गदारोळ नजरेत भरला
आणखी एक बाब शून्य टक्के आयात शुल्क धोरण अंगाशी आले. शिवसेना-ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस-, शरद पवार, मनसे इत्यादी पक्षांतील स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांना भाजपात मुक्त प्रवेश दिला गेला. त्यामु़ळे निष्ठावंतांची कोंडी झाली. पक्षप्रवेशावरून जो गदारोळ झाला तो लोकांच्या नजरेत भरला. हाच का भाजपा? हा प्रश्न उपस्थित झाला. याचमुळे काही जागा विरोधकांच्या पारड्यात गेल्याने ‘100 प्लस’ च्या मार्गात अडथळे येत गेले.
____________________________
गौरवशाली इतिहास कामी येत नाही!
‘दत्तक नाशिक’वरून ठाकरे बंधूंची मुख्यमंत्र्यांवर टीका
नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची जाहीर सभा झाल्यानंतर ‘ठाकरेंचे मजबूत नाशिक कनेक्शन’ या मथळ्याखाली याच सदरात ऐतिहासिक मागोवा घेण्यात आला होता. इतिहास कितीही गौरवशाली असला, तरी वर्तमानात तो कामी येतोच असे काही नाही, हेच नाशिकमध्ये दिसून आले. ‘आमच्या हातात नाशिकची सत्ता द्या ‘, अशी साद ठाकरे बंधूंनी घातली खरी पण नाशिककरांनी जोरदार प्रतिसाद दिला नाही. पण, त्यांची भाषणे खान देऊन ऐकली होती. ठाकरे काय म्हणताहेत, याकडे अवघ्या महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचे लक्ष असते. नाशिकला दत्तक घेणारा पिता परत फिरकलाच नाही, तपोवनातील झाडांची छूटणी करण्याआधी भाजपाने आपल्याच कार्यकर्त्यांची छाटणी केली, असे म्हणत दुसऱ्यांची पोरं कडेवर कशाला घेता? असा सवाल भाजपाला केला होता. त्याचा थोडाफार परिणाम झाल्यानेच ‘100 प्लसचं सोप्पं वाटणारं गणित अवघड झालं. ठाकरे बंधूंना नंतर फडणवीस यांनी उत्तर देण्याचा जाहीर सभेतून प्रयत्न केला. नाशिक दत्तक घेतल्यानंतर मी नाशिकला येत गेलो, तर ते (ठाकरे बंधू) नाशिकला पर्यटक म्हणून येतात, असा टोला त्यांनी लगावला, दत्तक घोषणेनंतर मुख्यमंत्री म्हणून वेळ मिळाला नाही, असा दावा त्यांनी केला. पण, दत्तक नाशिकमध्ये केलेली कामे त्यांना सांगता आली नाहीत. त्याचा परिणाम काही प्रमाणात मतदारांवर झाला असेल, तर? ठाकरे बंधूंना मुंबईत संपविण्याचा आनंद भाजपाकडून साजरा केला जात असला, तरी परत उठून उभे राहण्याची ताकद त्यांच्यात आहे. राज ठाकरे यांनी निकालानंतर सोशल मीडियावर पोस्ट टाकून कार्यकर्त्यांना दिलासा दिला आहे.नाशिक ठाकरेंना पावणारे आहे, असे गेल्या रविवारी याच सदरात म्हटले होते. परंतु, काळाच्या ओघात आणि बदलत्या राजकीय परिस्थितीत ठाकरेंचे शिलेदार विखुरले गेले आहेत. सैनिक हाताशी राहिले नाहीत. आहे त्या ताकदीवर त्यांनी निकराची झुंज देण्याचा प्रयत्न करुन, एकाअपक्षासह १७ जागा जिंकून आपले अस्तित्व दाखवून दिले.
____________________________
हे पण वाचा