सहायक पोलिस निरीक्षकावर चाळीस हजारांची लाच मागितल्याने गुन्हा
नाशिक: प्रतिनिधी
गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात चाळीस हजार रुपयांची लाच मागितली म्हणून नाशिकरोड पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक निरीक्षक व सध्या शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंबरनाथ उल्हासनगर झोन चार मध्ये कार्यरत असलेले गणेश किसन शेळके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हे जमीन खरेदी विक्री खासगी एजंट म्हणून व्यवसाय करतात. तक्रारदार व त्याच्या मित्राविरुद्ध जमीन खरेदीदाराने केलेला तक्रार अर्ज शेळके यांच्याकडे चौकशी साठी होता. या तक्रार अर्जाची चौकशी करून तक्रारदार व त्याचा मित्र अशा दोघांवर गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात शेळके यांनी प्रत्येकी25 हजार याप्रमाणे 50 हजार रुपये लाच मागणी करून तडजोडी अंती प्रत्येकी20 हजार याप्रमाणे 40 हजार लाच स्वीकारण्याचे मान्य केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक नाना सूर्यवंशी, हवालदार दिनेश खैरनार, अविनाश पवार, विलास निकम यांच्या पथकाने ही कारवाई केली