चोरट्यांनी एटीएम मशीनच पळवून नेले
मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला
लासलगाव प्रतिनिधी
लासलगाव विंचुर रोड वर असलेल्या एक्सिस बँकेचे एटीएम् मशिन अज्ञात चोरट्यांनी फोडून चक्क ते मशिनच एर्टिका गाडीतून पळवून नेल्याची घटना सोमवारी मध्यरात्री तीन वाजेच्या च्या सुमारास घडली.हा सर्व प्रकार सिसिटिव्हीत कैद झाला आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करून जलद गतीने सदर गाडीचा पाठलाग केला असता या अज्ञात चोरट्यांनी घाबरून एटीएम मशीन पोलिसांच्या गाडीच्या दिशेने फेकले व सदर चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले मात्र सदर एटीएम मशीन व त्यातील अंदाजे १५ लाख रुपये रोख रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या बाबत मिळालेल्या माहिती नुसार लासलगाव विंचुर रोड वर एक्सिस बँक असून त्या बँकेचे एटीएम मशीन बँकेच्या लगतच्या गाळ्यातच आहे.सोमवारी मध्यरात्री च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सदर एटीएम मशीन तोडले व त्यातील अंदाजे १५ लाख रुपये सह संपूर्ण मशीनच चोरट्यांनी सोबत आणलेल्या एर्टिका गाडी क्र एम एच १५ ए झेड ०५७ या गाडीतून पळवून नेले सदर घटनेचा प्रकार एटीएम च्या सीसीटीवी कॅमेरात कैद झाला तसेच ही घटना एक्सिस बँकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात कार्यान्वित असलेल्या प्रणालीच्या लक्षात आल्यानंतर बँकेच्या प्रशासकीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सदर घटनेची माहिती लासलगाव पोलिस ठाण्यात फोनद्वारे कळवली,या माहितीच्या आधारे लासलगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी तातडीने नाकाबंदी केली व जलद गतीने तपास चक्र सुरू करून पोलिस नाईक योगेश शिंदे,पोलिस कर्मचारी सुजित बारगळ यांनी एका खाजगी गाडीद्वारे या चोरट्यांचा पाठलाग केला असता चोरट्यांनी एटीएम् मशिन नाशिक औरंगाबाद रोड वरील बोकङदरे शिवारात पोलिसांच्या खाजगी गाडीच्या दिशेने फेकुन सदर चोरटे पळुन जाण्यात यशस्वी झाले.सदर एटीएम मशीन सह अंदाजे १५ लाख रुपये रोख रकम पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला.
घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ,पोलिस कर्मचारी प्रदीप अजगे,कैलास महाजन,ए एस आय नंदकुमार देवडे,हवालदार देवा पानसरे,होमगार्ड पगारे घटनास्थळी दाखल झाले.या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.या घटनेनंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे,निफाड उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे यांनी घटनास्थळी भेट घेऊन माहिती घेतली