स्वामी समर्थनगरात अल्टो कारवर हल्ला

ज्ञात टवाळखोरांकडून तोडफोड; परिसरात भीतीचे वातावरण

सिडको : विशेष प्रतिनिधी
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेंट लॉरेन्स स्कूल जवळील स्वामी समर्थनगर येथे उभी असलेल्या एका अल्टो कारची अज्ञात टवाळखोरांनी मध्यरात्रीच्या सुमारास धारदार शस्त्राने तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. सिडको परिसरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असून, गुरुवारी पहाटे एका महिला पोलीस कर्मचार्‍याच्या पतीच्या चारचाकी वाहनावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे.
संभाजी कडवे हे स्वामी समर्थनगरमधील गंगासागर रोहाऊसमध्ये राहतात. त्यांच्या घरासमोर त्यांची एमएच 15 बीडी 3071 या क्रमांकाची चारचाकी गाडी पार्क करण्यात आली होती. गुरुवारी मध्यरात्री 2 ते 4 वाजण्याच्या सुमारास चेतन तिडके आणि कमलेश तिडके यांनी त्यांच्या वाहनावर कोयत्याने हल्ला केला.
या हल्ल्यात गाडीच्या समोरील आणि पाठीमागील काचा पूर्णपणे फोडण्यात आल्या. या घटनेची माहिती मिळताच सिडको पोलीस घटनास्थळी दाखल झाले.दरम्यान, संभाजी कडवे यांनी सिडको पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून चेतन तिडके आणि कमलेश तिडके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून, लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी सांगितले. दरम्यान, चेतन तिडके आणि कमलेश तिडके यांच्यावर यापूर्वीही काही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस गस्त वाढवण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. रात्रीच्या सुमारास अशा प्रकारच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण होत असून, पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *