सिन्नर नगरपरिषदेसाठी सरासरी 67.65 टक्के मतदान

मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नरला नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी किरकोळ धक्काबुक्की, शाब्दिक चकमक आणि तणावपूर्ण वातावरणात सरासरी 67.65 टक्के मतदान झाले. सिन्नर नगरपरिषदेसाठी एकूण 28 हजार 347 पुरुषांपैकी 19,610 व 26 हजार 30 स्त्रियांपैकी 17,184 स्त्रियांनी मतदानाचा हक्क बजावला. 54 हजार 387 मतदारांपैकी 36 हजार 794 इतके मतदान झाले.
15 प्रभागांतील 26 सदस्यपदासाठी आणि थेट नगराध्यक्षपदासाठी 99 उमेदवार रिंगणात होते. त्यांचे भवितव्य मतपेटीत सीलबंद झाले. दरम्यान, प्रभाग क्रमांक 4, 5, 12, 11 येथे सकाळपासूनच प्रतिस्पर्ध्यांमध्ये कुरबुरी सुरू होत्या. मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड झाल्याने एक कंट्रोल युनिट आणि दोन बॅलेट युनिट बदलावे लागले.
दरम्यान, सायंकाळी मतदान संपतेवेळी प्रभाग क्र. 11 मध्ये समर्थकांमध्ये धक्काबुक्की आणि झटापटी झाल्याची माहिती मिळाली. प्रभाग क्र. 1 आणि 11 या दोन प्रभागांत साडेपाच वाजेनंतरही मतदारांच्या काही प्रमाणात रांगा होत्या. प्रभाग 11 मध्ये राष्ट्रवादी व उबाठा समर्थक आमनेसामने आले. त्यातून केमीकल स्प्रे फवारल्यावरून तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेऊन गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सिन्नर नगरपरिषदेत थेट नगराध्यक्ष व 15 प्रभागांतील 30 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. मात्र, सदस्यपदाच्या 4 जागांसाठी स्थगिती मिळाल्याने थेट नगराध्यक्षपदासह 26 सदस्यपदासाठी शांततेत निवडणूक पार पडली. सकाळी साडेसात वाजता शहरातील 58 केंद्रांवर मतदानास प्रारंभ झाला. 58 केंद्रांवर 58 कंट्रोल युनिट आणि 112 बॅलेट युनिट ठेवण्यात आले होते. काही प्रभागांत किरकोळ तांत्रिक अडचण आल्याने एक कंट्रोल आणि दोन बॅलेट युनिट पंधरा मिनिटांत बदलून देण्यात आल्यानंतर मतदान सुरळीत सुरू झाले. निवडणुकीत मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी कार्यकर्त्यांकडून परिश्रम घेतले जात होते.
सकाळी साडेनऊ वाजता 2140 पुरुष व 1325 महिलांनी असे 3465 मतदान केले होते. 6.37 टक्के मतदान झाले. त्यानंतर सकाळी साडेअकरा वाजता 9929 म्हणजे 18.26 टक्के मतदान झाले होते. त्यानंतरच्या दुपारच्या दोन तासांत मतदानाची टक्केवारी वाढली. दुपारी दीड वाजेपर्यंत 18 हजार 82 मतदारांनी म्हणजे 33.25 टक्के मतदारांनी मतदान केले होते. दुपारी साडेतीन वाजता 26124 मतदारांनी मतदान केले होते. तेव्हा मतदानाची आकडेवारी 48.03 टक्के होती. त्यानंतर शेवटच्या दोन तासांत मतदानाची आकडेवारी वाढून ती 68 टक्के पर्यंत पोहोचली होती.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अभिजित नाईक व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी अभिजित कदम हे सर्व प्रभागांतील मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. दर दोन तासांनी मतदानाची आकडेवारी घेतली जात होती. वयोवृद्ध व आजारी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन येण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. मतदान केंद्राबाहेर मंडप टाकून त्यात मतदारांना मतदार यादीतील क्रमांक शोधून देण्याचे काम सुरु होते. पोलीस उपविभागीय अधिकारी के. के. पाटील, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे, भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असल्याचे दिसून येत होते.

प्रभाग 11 मध्ये केमिकल स्प्रे फवारल्याचा प्रकार

प्रभाग क्रमांक 11 मध्ये मतदान सुरू असताना सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास शिवसेना उबाठा गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. यादरम्यान दोन्ही गट एकमेकांच्या समोर उभे असताना उबाठा गटाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ जुने नाशिक येथून आलेल्या तरुणाने केमिकल चिली स्प्रे फवारल्यामुळे तो डोळ्यात उडून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार किरण गोजरे, निकिता दत्ता ढमाले (रा. संजीवनीनगर) यांच्यासह इतर पाच-सहा जण ही जखमी झाले. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. दरम्यान, अनिल वराडे उशिरा यासंदर्भात तक्रार देण्यासाठी पोलिसांत हजर झाले होते. केमिकल स्प्रे फवारणार्‍या गणेश दीपक शेलार (35) या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्यासह पोलीस कुमक घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी सौम्य लाठीचार्ज करत जमावाला पांगवले. केमिकल स्प्रे फवारणार्‍या तरुणाला ताब्यात घेतले.

यादीत 1365 दुबार नावे

सर्व 15 प्रभाग मिळून 1365 दुबार नावे निश्चित करण्यात आली होती. त्यावर काही नावांपुढे दोन स्टार टाकण्यात आले होते तर काही नावांच्या पुढे लाल अक्षरांमध्ये डुप्लिकेट असे लिहिण्यात आले होते. हमीपत्र लिहून घेऊन दोन स्टार असलेल्या मतदाराला त्याची पडताळणी करून केंद्राध्यक्ष यांनी मतदानाची परवानगी दिली. मात्र, लाल शेरा असलेल्या मतदारांना मतदानाला मुकावे लागले होते.

अफवा, तणाव आणि शाब्दिक बाचाबाची

सिन्नर येथे मतदान सुरू असताना अनेक अफवांचे पेव फुटत होते. एखाद्या घटनेच्या खात्रीनंतर सदर अफवा असल्याचे समजत होते. अनेक मतदान केंद्रांवर तणावपूर्ण शांतता दिसून येत होती. काही ठिकाणी शाब्दिक बाचाबाचीचे प्रकार दिसून आले. होरायझन शाळेत बोगस मतदान होत असल्याची तक्रारी झाल्यानंतर काहींनी पळ काढल्याची चर्चा होती. प्रभाग क्र. 12 मधील वाजे विद्यालय केंद्राच्या बाहेर आणि प्रभाग क्र. 11 च्या झापवाडी जि. प. शाळा (संजीवनी शाळेबाहेर) पैसे वाटले जात असल्याच्या कारणावरून दोन गट आमनेसामने येऊन शाब्दिक चकमकी व किरकोळ धक्काबुक्कीच्या घटना घडल्या.

मतदान सुरू होण्याआधीच बिघाड आला लक्षात

सकाळी साडेसात वाजता प्रत्येक मतदान केंद्रावर उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान यंत्रावर मॉक पोल घेतले जात असताना दोन ठिकाणी तर एका ठिकाणी कंट्रोल युनिटमध्ये बिघाड झाल्याचे स्पष्ट झाले. त्या ठिकाणी तातडीने यंत्रांमध्ये बदल करण्यात आला. केंद्र क्रमांक 1 मधील बूथ क्रमांक 1, केंद्र क्रमांक 13 मधील बूथ क्रमांक 3 मध्ये बॅलेट युनिट तर प्रभाग तेरामधील बूथ क्रमांक दोनवर कंट्रोल युनिट बदलण्यात आले होते. त्यानंतर दिवसभरात कुठेही मतदान यंत्रात बिघाड झाला नसल्याचे सांगण्यात आले.

उमेदवाराच्या यादीत मयत शेरा असल्याने हरकत

वाजे विद्यालयातील एका मतदान केंद्रात मतदानासाठी आलेल्या मतदाराला उमेदवाराच्या प्रतिनिधीने हरकत घेतली होती. सदर प्रतिनिधीकडे असलेल्या यादीमध्ये त्या मतदाराच्या नावापुढे मयत असा शेरा मानण्यात आलेला होता. मात्र, केंद्राध्यक्षांकडे असलेल्या यादीमध्ये असा शेरा नव्हता. अन्य उमेदवाराच्या प्रतिनिधींचीदेखील हरकत नसल्याने पुरावे पडताळून त्या मतदारास मतदान करू देण्यात आले.

उमेदवाराच्या नावाने दिल्या चिठ्ठ्या

काट्याची टक्कर असलेल्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये सकाळपासूनच शिवसेना उबाठा गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस समर्थकांमध्ये किरकोळ बाचाबाची सुरू होत्या. त्यातच काही प्रमाणात बोगस मतदान झाल्याची चर्चा आहे. शिवसेना उबाठा गटाच्या एका उमेदवाराने थेट आपल्या नावाचा उल्लेख असलेल्या संगणकीय चिठ्ठ्या मतदारांना दिल्याने त्या घेऊन मतदार मतदान केंद्रात पोहोचले. त्यामुळे हा आचारसंहितेचा भंग असल्याचे कारण देत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यावर आक्षेप घेतला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हळद लागण्याआधी बजावला मतदानाचा हक्क…

शहरातील गंगावेस भागात राहणार्‍या संस्कृती पाबळकर या तरुणीचा बुधवारी विवाह आहे. मंगळवारी तिच्या हळदीची लगबग सुरू असताना मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी ती मतदान केंद्रावर आली होती. आधी मतदान आणि मग हळदीचा कार्यक्रम, असे तिने सांगितले. ती मतदान केंद्रावर आल्यानंतर प्रभागातील सर्व उमेदवार स्वागताला पुढे आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *