नगरपरिषद, पोलिसांची संयुक्त कार्यवाही
ओझर : वार्ताहर
येथील ओझर नगरपरिषद, ओझर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ओझर शहरासह परिसरात नायलॉन मांजा जप्ती व जनजागृती मोहीम राबविण्यात आली.
मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर ओझरच्या नगराध्यक्षा अनिता घेगडमल, ओझर नगरपरिषद मुख्याधिकारी किरण देशमुख, तसेच ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन कंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली मांजा विक्री दुकानांची तपासणी करत नायलॉन मांजा जप्ती व जनजागृती मोहीम प्रभावी राबवित ओझर शहरातील केजीएन कॉलनी, कोळीवाडा, भगतसिंगनगर, संभाजीनगर, आंबेडकरनगर तसेच इतर परिसरांमध्ये तपासणी करून नायलॉन मांजा जप्त केला. नायलॉन मांजामुळे होणारे अपघात, पक्षी व प्राण्यांचे होणारे नुकसान तसेच मानवी जीवितास निर्माण होणारा धोका लक्षात घेत सदर मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ओझर नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक प्रतीक उंबरे, पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे, पोलीस उपनिरीक्षक वाघरे, लेडीज कॉन्स्टेबल श्रीमती शिंदे, ओझर नगरपरिषद कर्मचारी नीलेश डेंगळे, मनोहर जाधव आदी सहभागी झाले होते.
यावेळी शहरातील लहान मुलांना नायलॉन मांजाबंदीचे महत्त्व समजावून सांगत जनजागृती केली, नायलॉन मांजा वापरास कायद्याने बंदी असून, त्याचा वापर केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला. ओझर नगरपरिषद व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे सदर मोहीम यशस्वी ठरली. भविष्यातही अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
Awareness campaign in Ozark by confiscating nylon nets