सशक्त भारतासाठी ‘आयुष’ उपयुक्त

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन

बुलढाणा :
शेगाव येथे बुधवारी (दि. 25) राष्ट्रीय आरोग्य मेळावा-2026 चा शुभारंभ झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या चार दिवसीय मेळाव्याचे उद्घाटन झाले. हा मेळावा केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालय व अखिल भारतीय
आयुर्वेद महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने विसावा भक्तनिवास संकुल (श्री संत गजानन महाराज संस्थान परिसर) येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामुळे आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी (आयुष) पद्धतींचा प्रसार आणि लोकांमध्ये आरोग्य जागृती वाढवणे, हे मुख्य उद्दिष्ट आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना सांगितले की, आयुर्वेद आणि योगशास्त्र ही भारतीय ज्ञानपरंपरा जगाला स्वस्थ आणि सुखी भविष्याची ग्वाही देते. मन आणि शरीराचे संतुलन साधून संतुलित जीवनशैली जगण्याचा मंत्र यातून मिळतो. आरोग्यं परमं सुखम ही आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. शरीर हे सर्व कर्तव्ये पूर्ण करण्याचे साधन असल्याने देशाला सशक्त करण्यासाठी नागरिकाचे आरोग्य उत्तम असणे आवश्यक आहे. यासाठी आयुष पद्धतींची भूमिका महत्त्वाची आहे.
औषधी वनस्पतींचे संवर्धन ही केवळ सरकारची जबाबदारी नाही. ती एक लोकचळवळ होणे गरजेचे आहे. औषधी वनस्पतींची लागवड केल्याने शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढते, मातीचे आरोग्य सुधारते आणि पर्यावरणाचे रक्षण होते. हे क्रांतिकारी पाऊल ठरू शकते. औषधी वनस्पतींच्या क्षेत्रविस्तारासाठी अधिक प्रयत्न व्हावेत, असेही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले.
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी भारतीय आहारपद्धतीत औषधी वनस्पतींचा पूर्वापार वापर असल्याचे सांगितले. पारंपरिक ज्ञानावर आधारित जीवनशैली आजार टाळण्यास मदत करते; परंतु आधुनिक आहारातील अनावश्यक पदार्थांमुळे आजार वाढले आहेत. आयुष पद्धतींचा प्रसार अधिक व्यापक व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *