डॉ. संजय धुर्जड*
सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक.
9822457732
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती, ज्याला भीम जयंती म्हणूनही ओळखले जाते. दरवर्षी १४ एप्रिल रोजी “भारतीय संविधानाचे जनक” डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना सन्मानित करण्यासाठी साजरी केली जाते. सण १८९१ मध्ये जन्मलेले आंबेडकर हे केवळ भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकारच नव्हे तर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री, एक न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि समाजसुधारक होते.
त्यांनी आपले जीवन अस्पृश्यांवरील भेदभाव नष्ट करण्यासाठी आणि महिला आणि कामगारांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी समर्पित केले. त्यामुळे त्यांची जयंती ‘समता दिन’ म्हणूनही ओळखली जाते. बाबासाहेबांनी त्यांचे उभे आयुष्य सर्वसामान्य नागरिकांना समानता आणि न्याय्य हक्काची वागणूक देण्यासाठी खर्ची पडले. यावर्षी, बाबासाहबांची १३४वी जयंती असून यादिवशी संपूर्ण भारतभर सार्वजनिक सुट्टी जाहीर करून त्यांना मानवंदना देण्यात येते. देश-विदेशातील आंबेडकरीय अनुभयायी त्यांच्या आठवणींना उजाळणी देण्यासाठी त्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून, पोवाडे-भीमगिते लावून मिरवणुका काढतात, तर काही लोक सामुदायिक मेळाव्यांचे आयोजन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी असंख्य कार्यक्रमांचे आयोजन करून हा दिवस साजरा केला जातो.
बाबसाहेबांबद्दल आपण सर्वच जण जाणून आहोत. तरी मला वाटतं की अजून ही बऱ्याच लोकांना त्यांच्याविषयी बरेच काही जाणून घेणे आवश्यक आहे. आव या महापुरुषाला जातीपातीच्या समाजकारणात आणि राजकारणात अडवून त्यांच्या महतीला छोटे केले आहे, असे मला नेहमीच वाटते. प्रथम आपण त्यांच्याबद्दल माहीत असलेले काही प्रमुख पैलू बघूया…
१. संविधानाचे शिल्पकार: भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार म्हणून डॉ. आंबेडकरांची भूमिका महत्वाची आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाच्या तत्त्वांवर आधारित संविधान तयार करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची विशेष दखल घेतली गेली पाहिजे.
२. समानतेसाठी धर्मयुद्ध: सामाजिक भेदभावाविरूद्ध त्यांचे अथक धर्मयुद्ध आणि अत्याचारित जातींच्या हक्कांसाठी त्यांनी केलेले समर्थन भारतातील धोरणे आणि सामाजिक सुधारणांना आकार देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे. यासाठी धर्मांतर करण्याची गरज पडली तरीही त्यांनी त्याची तमा बाळगली नाही.
३. शिक्षणाचे पुरस्कर्ते: परिवर्तनाचे साधन म्हणून डॉ. आंबेडकरांचा शिक्षणावरील विश्वास लक्षात ठेवला जातो. सामाजिक आणि आर्थिक गतिशीलता प्राप्त करण्यासाठी ज्ञानाचा आधार घेण्यास त्यांनी लोकांना प्रोत्साहित केले. त्यांची हीच शिकवण आज समाजाला कळल्यामुळे आर्थिक आणि सामाजिक दृष्टीने मागास असलेला समाज आज मुख्य प्रवाहात येऊ पाहत आहे.
४. जगतमान्य विद्वत्ता: त्यांचे शैक्षणिक कार्य आणि अर्थशास्त्राच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान हे जागतिक पातळीवर मान्यता मिळवलेली आहे. त्यांच्या प्रभावशाली लेखनासह जात आणि विषमतेच्या समस्यांवर मांडलेली मते आज जगाला मार्गदर्शक ठरत आहे..
५. समानतेचे पालन: हा दिवस समतेचा उत्सव म्हणूनही ओळखला जातो. डॉ. आंबेडकरांच्या भेदभावमुक्त समाजाच्या दृष्टीला चालना देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. जातीधर्माच्या पलीकडील दृष्टा नेता म्हणून आज त्यांचे नाव आदराने घेतले जाते.
६. प्रगतीचे प्रेरणास्तोत्र: डॉ. आंबेडकरांचा वारसा प्रेरणेचा किरण म्हणून काम करतो. त्यांचा सर्वसमावेशक दृष्टिकोन आणि न्याय्य हक्कासाठीचा लढा, तसेच सम्यक समाजाच्या निर्मितीसाठीची त्यांची तळमळ ही प्रत्येक भारतीयाला प्रगती करण्यासाठी प्रवृत्त करतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या, तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले.
त्यासाठी त्यांनी वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले आहे. इ.स. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले. इ.स. १९९० मध्ये, त्यांना मरणोत्तर “भारतरत्न” हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात केला होता. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो. इ.स. २०१२ मध्ये, “द ग्रेटेस्ट इंडियन” नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची ‘सर्वश्रेष्ठ भारतीय’ म्हणून निवड करण्यात आली होती, हे विशेष.
बाबासाहेबांचे जीवन संघर्षपूर्ण राहिले होते. त्यांनी ठरवले असते तर शिक्षण पूर्ण झाल्यांनंतर ते वकिली करून आपला उदरनिर्वाह करू शकले असते. परंतु, तसे न करता, त्यानी देशसेवा यापेक्षाही समाजसेवेला वाहून घेतले. तत्कालीन, हिंदू समाजव्यवस्थेला बदलण्याचा त्यांचा प्रयत्न खूप रोमांचकारी आहे. माणसाला माणूस म्हणून जगू देण्याचा अधिकार बहाल करून देणे, हे त्यांचे मुख्य उद्देश होते. समाजातील दलित, पीडित, शोषित, मागास समजलेल्या जाती, तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा त्यांचा ध्यास त्यांना शांत बसू देत नव्हता.
याबाबत अनेक समकालीन नेत्यांशी त्यांचे वैचारिक मतभेद होत असे. त्यांना विरोधही होत होता. त्यांनी अशा घटकांना न्याय हक्कासाठी संघर्ष करण्यास प्रवृत्त केले, चळवळ उभी केली, स्वतः त्या चळवळीचे नेतृत्व केले. वेळ प्रसंगी त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामाही देऊ केला होता. यातच त्यांची सामाजिक समानतेची तळमळ लक्षात येते. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे त्यांचे त्रिसूत्री मंत्र आजही मागास आणि पीडित समाजाला प्रगती करण्यासाठी प्रेरणा देत असतात.
त्यांच्या जीवनपटातून काय शिकावे? काय घ्यावे? हा प्रश्न आपणाला पडत असेल ना? मलाही पडतात. सर्वप्रथम, आपण त्यांना एका विशिष्ठ समाज घटकाशी जे बांधून ठेवलेले आहे, त्यातून त्यांची मुक्तता करायला हवी. त्यांनी हिंदू धर्म त्यागून बौद्ध धर्माचा स्वीकार का केला असावा, यावर तुम्ही विचार केला तर, कदाचित तुम्ही त्यांच्याबद्दल असलेले समज गैरसमज काढू दूर करू शकता. तत्कालीन हिंदू बहुल समाजाने वर्णभेद, जातीभेद आणि व्यक्तिभेद संपवण्यास मान्यता दिली नाही. (करणे काहीही असो) परंतु, समाजाला, देशाला आणि मानवतेला खरोखर प्रगती करायची असेल, तर धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागेल, हे त्यांनी ओळखले.
मग असा, कुठला धर्म आहे, जो प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देतो? त्याचे उत्तर त्यांना बौद्ध धर्मात मिळाले, म्हणून त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. (विशेष म्हणजे बौद्ध धर्माचा भारतात उगम होऊन जगभरात पसरला असूनही याबद्दल समाजात आसक्ती होती) माझ्या अनुयायांना सन्मानाने जगता यावे म्हणून त्यांनी अनुयायांसह बौद्ध धर्मात प्रवेश करून, त्यांना नवबौद्ध असे संबोधून त्यांना भारतीय संविधानाच्या माध्यमातून न्यायिक आणि कायदेशीर हक्क दिले. बाबासाहेबांबद्दल खूप काही लिहू शकतो, परंतु, काही मर्यादा ओळखून आजच्या त्यांच्या या जयंती दिनी, त्यांच्या कार्याची दखल घेऊन, त्यांना आदरांजली वाहणे, हे आपले माणूस म्हणून परम कर्तव्य आहे, असे मला वाटते.
*
|