आज 17 नोव्हेंबर. आजच्याच दिवशी म्हणजे 17 नोव्हेंबर 2012 रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मराठी माणसांना पोरके करून कायमचे निघून गेले. आज त्यांची 13 वी पुण्यतिथी. त्यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी झाला. बाळासाहेबांना समाजकार्याचे बाळकडू आपल्या वडिलांकडून म्हणजे प्रबोधनकारांकडून लहानवयातच मिळाले. प्रबोधनकारांच्या प्रबोधनाचा, पुरोगामी विचारांचा व आक्रमक वृत्तीचा वारसा बाळासाहेबांमध्येही कळत नकळतपणे उतरला.
र्वप्रथम एक कलाकार, एक व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. 1950 साली ते फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम करत असतानाच बाळासाहेब ठाकरे विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी व्यंगचित्रकार तसेच जाहिरात डिझाइनचे कामही करत. याच काळात त्यांची आर. के. लक्ष्मण या विख्यात व्यंगचित्रकाराशी ओळख झाली. लवकरच या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. ही मैत्री शेवटपर्यंत टिकून राहिली. आर. के. लक्ष्मण आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांनी व्यंगचित्रकलेला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. आज व्यंगचित्रकार म्हटले की, याच दोघांची नावे समोर येतात. फ्री प्रेस जर्नलमध्ये काही काळ काम केल्यानंतर बाळासाहेबांनी स्वतःचे साप्ताहिक काढण्याचे ठरवले.
बाळासाहेब ठाकरे स्वतः व्यंगचित्रकार होते. त्यामुळे हे साप्ताहिक व्यंगचित्रात्मकच होते, हे वेगळे सांगायला नको. ऑगस्ट 1967 साली बाळासाहेबांनी ’मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. या साप्ताहिकाला मार्मिक हे नाव प्रबोधनकारांनी सुचवले. ऑगस्ट 1967 मध्ये महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते मार्मिकच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन झाले.
महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मराठी माणसाचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी सुरू करण्यात आलेले मार्मिक आजही तितक्याच जोमात सुरू आहे. बाळासाहेबांनी ज्या उद्देशाने हे साप्ताहिक सुरू केले होते तो उद्देश सफल झाला असेच म्हणावे लागेल. मराठी माणसांच्या मुंबईतच मराठी माणसांवर होणार्या अन्यायाला मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रातच मराठी माणसांची गळचेपी होऊ लागली. मराठीवर अन्याय होऊ लागला. हा अन्याय केवळ व्यंगचित्रांच्या फटकार्याने दूर होणार नाही. त्यासाठी आणखी संघटित प्रयत्न करायला हवेत, असा विचार बाळासाहेबांच्या मनात आला. बाळासाहेबांनी मराठी माणसांना एक करून मोठे संघटन उभारले. या संघटनेला कोणते नाव द्यायचे, असे बाळासाहेबांनी प्रबोधनकारांना विचारले. प्रबोधनकारांनी क्षणाचाही विलंब न करता नाव घेतले ’शिवसेना’. यानंतर बाळासाहेबांनी 19 जून 1966 रोजी शिवसेनेची अधिकृत स्थापना केली. 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण हे ब्रीद घेऊन स्थापन झालेल्या शिवसेनेत तरुणांचा भरणा सुरू झाला. गाव तिथे शाखा असा प्रवास करत अल्पावधीतच शिवसेना महाराष्ट्राभर पसरली. गावागावांत, खेड्यापाड्यांत शिवसेनेच्या शाखा स्थापन झाल्या. शिवसेनेचा पहिला मेळावा 30 ऑक्टोबर 1966 रोजी शिवतीर्थ मैदानावर झाला. या मेळाव्यापासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवतीर्थावरील (शिवाजी पार्क) मराठी माणसांची प्रचंड गर्दी असे समीकरणच तयार झाले. शिवतीर्थावर बाळासाहेबांचे भाषण ऐकण्यासाठी राज्यभरातून लोक येत. त्यांच्या वक्तृत्वाने उपस्थित जनसमुदाय भारावून जात. वक्तृत्वाबरोबरच भेदक लेखणी हेदेखील बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. बाळासाहेबांनी ’सामना’ सुरू केल्यावर या लेखणीची ताकद देशाला समजली. सामनामधील बाळासाहेबांच्या अग्रलेखांची वाट पूर्ण महाराष्ट्र पाहत असे. 1995 साली बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रभर झंझावती प्रचार केला. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी प्रचारसभा घेतल्या. त्यांच्या सभेला लाखोंची गर्दी होऊ लागली. आपल्या आक्रमक भाषणांनी सत्ताधारी पक्षाला त्यांनी सळो की पळो करून सोडले.
बाळासाहेबांमुळेच शिवसेना-भाजप युतीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. या सरकारने एक रुपयात झुणका-भाकर, वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती, झोपडपट्टीवासीयांना घरे, मुंबई-पुणे हायवे, मुंबईतील उड्डाणपूल, बॉम्बेचे मुंबई नामांतर असे अनेक लोकहिताचे निर्णय घेतले. या सर्व योजना प्रकल्पांची मूळ संकल्पना बाळासाहेबांचीच होती. आज मुंबई महाराष्ट्रात आहे, याचे सर्व श्रेय बाळासाहेबांना जाते.
बाळासाहेबांमुळेच मुंबई महाराष्ट्रात आणि मराठी माणूस मुंबईत दिमाखात राहू शकतो. बाळासाहेब नसते तर मुंबई परप्रांतीयांच्या घशात आणि मराठी माणूस मुंबईच्या बाहेर गेला असता. बाळासाहेबांनीच मराठी माणसाला स्वाभिमानाने जगायला शिकवले. बाळासाहेबांमुळेच मराठी माणूस आज ताठ मानेने जगत आहे. मराठी माणसांसाठी त्यांनी जे केले ते इतर कोणत्याही नेत्याला करता आले नाही. म्हणूनच मराठी माणूस कायम त्यांचा ऋणी राहील. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्रातील मराठी माणूस त्यांना अभिवादन करत आहे. मराठी माणसांच्या मनात स्वाभिमान जागृत करणार्या बाळासाहेबांना अभिवादन!