बांगलादेश बॉर्डर बंदचा कांदा निर्यातीला मोठा फटका

शेतकरी अडचणीत; केंद्राने निर्यात सुरळीत करण्यासाठी प्रयत्न गरजेचे

लासलगाव : वार्ताहर
गेल्या तीन महिन्यांपासून बांगलादेश सरकारने भारतीय कांद्याच्या आयातीवर घातलेल्या बंदीमुळे भारतातून होणारी कांदा निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. याचा थेट फटका देशातील कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापार्‍यांना बसत असून, निर्यातीवरील अवलंबित्वामुळे कांद्याचे बाजारभावही कोसळत आहेत.
भारतातून होणार्‍या एकूण कांदा निर्यातीपैकी जवळपास 40 टक्क्यांहून अधिक हिस्सा एकट्या बांगलादेशकडून खरेदी होतो. 2024-25 या आर्थिक वर्षात 4.80 लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात केवळ बांगलादेशात झाली होती, ज्यातून देशाला 1724 कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले होते.
भारतातून बांगलादेशमध्ये दोन नंबर गुणवत्ता असलेला कांदा मोठ्या प्रमाणात निर्यात होत असतो. त्यामुळे देशातून 40 टक्के एवढा मोठ्या प्रमाणात कांदा एकट्या बांगलादेशमध्ये विकला जातो. मात्र, बांगलादेश सरकारकडून भारतीय कांद्याची कोंडी केल्याने देशामध्ये मुबलक कांदा उपलब्ध आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा प्रचंड झाल्याने कांद्याचे दरही 1200 ते 1500 रुपये प्रतिक्विंटलच्या घरामध्ये अडकलेले आहे.
बांगलादेशकडून अघोषितपणे आयात थांबवण्यात आल्याने महाराष्ट्रातील विशेषतः लासलगाव, नाशिक, पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर भागातील कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
यंदा रब्बी हंगामात देशभरात कांद्याचे बंपर उत्पादन झालेले असताना निर्यात बाजार बंद झाल्याने स्थानिक बाजारात पुरवठा वाढत असून, भावही परवडण्यासारखे नसल्याचे शेतकरी बोलत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने बांगलादेशमधील निर्यात सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत व्यापारी आणि शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *