अपेक्षित दर नसल्याने कांदा उत्पादकांमध्ये नाराजी
लासलगाव : वार्ताहर
बांगलादेश सरकारने कांद्याच्या आयातीवरील बंदी हटवल्यानंतर आशिया खंडातील सर्वांत मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात अल्पशी सुधारणा झाली आहे. मात्र ही दरवाढ शेतकर्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त नाही, त्यामुळे शेतकर्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.
बांगलादेशने काही विशिष्ट प्रमाणातच कांद्याच्या आयातीस परवानगी दिल्याचे सांगितले जात आहे, तसेच तेथील शेतकरी व व्यापार्यांनी साठविलेला कांदा काही प्रमाणात शिल्लक आहे. तो संपल्यानंतर भारतीय कांद्याच्या निर्यातीला गती येण्याची आशा निर्यातदार बाळगून आहेत.
सध्या 200 टन कांदा पाठवण्याची परवानगी मिळाली असली तरी, आगामी काळात मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होण्याची शक्यता आहे.
मात्र, जाणकारांच्या मते, जोपर्यंत केंद्र सरकार भारतीय निर्यातदारांना प्रोत्साहन देत नाही, तोपर्यंत कांद्याच्या दरात मोठी सुधारणा होणे कठीण आहे.
लासलगाव बाजार समितीत मंगळवारी 17 हजार 500 क्विंटल कांद्याची बम्पर आवक झाली. कांद्याला कमीत कमी 700 रुपये,जास्तीत जास्त 1801 रुपये, तर सरासरी 1640 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला, तर गेल्या आठवड्यात शनिवारी 8 हजार 624 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. बाजार भाव कमीत कमी 600 रुपये, जास्तीत जास्त 1725 रुपये, तर सरासरी 1575 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाले होते, म्हणजे सरासरी दरात फक्त 65 रुपये प्रति क्विंटल अशी अल्पशी वाढ झाली आहे.
बांगलादेशात 20 टक्के निर्यात
बांगलादेश हा भारतीय कांद्याचा सर्वांत मोठा खरेदीदार आहे. भारत दरवर्षी जेवढा एकूण कांदा निर्यात करतो, त्यातील 20 टक्के कांदा एकट्या बांगलादेशमध्ये जातो. या वर्षी बांगलादेशमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. त्यामुळे फेब्रुवारीपासून निर्यातीत अडचणी आल्या होत्या. नंतर कांद्याची आयात त्यांच्याकडून थांबविली गेली. आता कांदा संपुष्टात येऊ लागल्याने बांंगलादेशने आयातीला परवानगी दिली असली तरी निर्यात वेग पकडण्यास 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागणार आहे.
सध्या कांद्याला मिळणार्या बाजारभावातून कांदा उत्पादन करण्यासाठी झालेला खर्चही फिटत नाही. परिणामी, कांदा उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहे. यंदा महाराष्ट्रासह इतर कांदा उत्पादक राज्यांत कांद्याचे भरघोस उत्पादन झालेले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यातीस प्रोत्साहन देणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून भारतीय कांद्याची निर्यात वाढेल व शेतकर्यांच्या पदरात दोन पैसे अधिकचे पडतील.
– संतोष पानगव्हाणे, कांदा उत्पादक, लासलगावबांगलादेशने कांद्याची आयात बंदी हटवल्यानंतर लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात अल्पशी वाढ झाली आहे, तसेच बांगलादेशने काही विशिष्ट प्रमाणातच आयातीस परवानगी दिली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जोपर्यंत केंद्र सरकार भारतीय निर्यातदारांना प्रोत्साहन देत नाही, तोपर्यंत कांद्याच्या दरात मोठी सुधारणा होणे कठीण आहे.
– अफजल शेख, कांदा निर्यातदार, लासलगाव
विविध विषयांवर चर्चा; थकबाकी वसुलीसाठी धोरण राबविण्याचा निर्णय देवळा ः प्रतिनिधी वाजगाव येथील ग्रामसभेत गावात…
जानोरी ग्रामसभेत ठराव; तसा शिक्षक दिल्यास हजर न करून घेण्याचा पवित्रा दिंडोरी : प्रतिनिधी जिल्हा…
वंचित दोनशे शेतकर्यांचा इशारा; कंपनी प्रतिनिधींनी सर्वेक्षण केले नाही कंधाणे : वार्ताहर कंधाणे येथील खरीप…
शासनाच्या बंदीनंतरही सर्वत्र प्लास्टिकच्या फुलांचाच बोलबाला नाशिक ः प्रतिनिधीअवघ्या आठ दिवसांवर आलेल्या गणेश चतुर्थीसाठी बाजारपेठ…
गणेशोत्सवातील राजकीय उत्सव नाशिक : प्रतिनिधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने इच्छुकांकडून गणेशोत्सवाचा मुहूर्त…
आज जागतिक मच्छर दिन नाशिक : देवयानी सोनार जिल्ह्यात जानेवारी ते जुलै 2025 या सात…