पावसाच्या सरी झेलत वाजतगाजत आला बाप्पा!

शहरात विविध मंडळांसह घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना

नाशिक : प्रतिनिधी
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!! आला रे आला गणपती आला, असा जयघोष करत लाडक्या गणरायाचे बुधवारी (दि. 27) भक्तांनी मोठ्या जल्लोषात व मंगलमय वातावरणात स्वागत करत घरोघरी प्रतिष्ठापना केली. त्याचप्रमाणे विविध सरकारी, निमसरकारी कार्यालयांत गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांच्या बाप्पाचेही धूमधडाक्यात स्वागत करण्यात आले.

यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या संख्येत वाढ झाली आहे. दरवर्षीच बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता असते. यंदाही गणरायाचे जल्लोषात घरोघरी आगमन झाले. भक्तिभावाने पूजा, मंत्रोच्चार करत गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.गणेशमूर्ती खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी गर्दी झाली होती. बाप्पाच्या स्वागत मिरवणुका, नाशिक ढोल गजराने शहर दुमदुमून गेले होते. सकाळी 11.10 ते दुपारी 12.30 व दुपारी 3.45 ते सायंकाळी 6.45 या वेळेत प्रतिष्ठापनेचा मुहूर्त होता. मात्र, मुहूर्तानंतरही गणपतीची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने करण्यात आली. कोणतीही कसर राहू नये म्हणून भाविक प्रयत्न करत होते. शहरात दिवसभर गणरायाच्या नावाचा जयघोष सुरू होता. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शाडूच्या गणेशमूर्तींना भाविकांची पसंती
मिळत होती.

गणरायाच्या स्वागताला वरुणराजाची हजेरी

गेल्या काही दिवसांपासून शहरात पाऊस सुरू आहे. त्यातच गणरायाच्या स्वागताला वरुणराजानेही हजेरी लावली. यामुळे भक्तांना पावसातच गणरायाला घरी आणावे लागले. रस्त्यांवर दुकान थाटलेल्या विक्रेत्यांचे यामुळे चांगलेच हाल झाले.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानांत गर्दी

वाहनांप्रमाणे मोबाइल, फ्रीज, लॅपटॉप, टीव्ही यासारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानात खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. विक्रेत्यांकडून विविध गॅझेटवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली होती.

गणपती मंदिरांत भाविकांची गर्दी

शहरातील विविध परिसरात असलेल्या गणपती मंदिरांत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. शहरात बारा गणपतींची मंदिरे आहेत. नवश्या गणपती, चांदीचा गणपती, ढोल्या गणपती, साक्षी गणपती, इच्छापूर्ती गणपती, बाबा गणपती, या सर्वच मंदिरांत गणेशभक्तांनी दर्शनासाठी रांग लावली होती. या मंदिरांतही गणेश चतुर्थीनिमित्त गणपतीची विधिवत पूजा करण्यात आली.

आज दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन

गणपतीचे काल उत्साहात आगमन झाल्यानंतर बाप्पाचा पाहुणचार करण्यात आला. आज (दि. 28, गुरुवार) दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे. दीड दिवसाच्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप देण्यात येईल. गणपतीच्या विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीने विविध परिसरात कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे विसर्जनस्थळी गर्दी होणार असल्याने पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. नदीकिनारी भाविकांनी गर्दी करू नये यासाठी किनार्‍यावर पोलीस बंदोबस्त असेल. सामाजिक संस्थांकडून मूर्तिदान संकल्पना राबवण्यात येणार आहे.

खड्ड्यांमुळे गणरायाच्या स्वागताची वाट बिकट

दहा दिवसांच्या गणपतीचे उत्साहात आगमन झाले. पावसामुळे काही स्टॉलसमोर आणि रस्त्यांवर चिखल झाल्याने गणरायाच्या स्वागताची वाट बिकट झाली होती. स्टॉलपासून गणपतीची मूर्ती घेऊन चालणे चिखलामुळे गणेशभक्तांना कठीण जात होते. त्यातच शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यावर खडड्यांचे साम्राज्य पसरले आहे. खड्ड्यांमुळे गणेशमूर्ती घरी नेताना भाविकांना अडचणींचा सामना करावा लागला.

बच्चेकंपनीचा उत्साह शिगेला

गणरायाच्या स्वागतासाठी बच्चेकंपनीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. गणपती हे दैवत बच्चेकंपनीचे आवडीचे असल्याने त्यांच्या फ्रेंड गणेशाचे आगमन झाल्याने आणि मोदकाच्या प्रसादाने आनंद द्विगुणित झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *