फलंदाजांची हाराकिरी आणि स्वैर गोलंदाजी

भारतीय क्रिकेट संघ जगातील एक बलाढ्य क्रिकेट संघ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे भारतीय संघाला हरवणे ही तशी सोपी गोष्ट नसते. त्यात जर मालिका भारतात असेल तर भारतीय संघाला हरवणे ही जवळपास अशक्यप्राय गोष्ट. पण हा झाला भूतकाळ. आता भारतीय संघाला भारतात येऊन कोणीही सहज हरवू शकतो, हे न्यूझीलंड संघाने सिद्ध केले. न्यूझीलंड संघ सध्या भारताच्या दौर्‍यावर असून, भारतीय संघासोबत तो तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळला.
या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने सहज जिंकत मालिका आपणच घशात घालणार अशा आविर्भावात उरलेले दोन सामने खेळला आणि तिथेच घात झाला. पहिल्या सामन्यात पराभूत झालेल्या न्यूझीलंड संघाने उरलेल्या दोन सामन्यांत भारतीय संघाला सहज हरवले आणि मालिका 2-1 ने जिंकत इतिहास घडवला. न्यूझीलंड संघासाठी हा मालिका विजय ऐतिहासिकच आहे कारण न्यूझीलंडने पहिल्यांदाच भारताला भारतात हरवून मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. त्यांच्या डॅरिल मिचेल या फलंदाजाने सलग दोन सामन्यांत शतक झळकावले तसेच पहिल्या सामन्यात 85 धावांची खेळी करून भारतीय गोलंदाजांची पिसे काढली. त्यांच्या इतर फलंदाजांनीही त्याला चांगली साथ दिली. त्यांच्या गोलंदाजांनी आपल्या फलंदाजांना मोक्याच्या वेळी बाद करून न्यूझीलंड संघाला मालिका विजय मिळवून दिला.
न्यूझीलंडच्या या मालिका विजयाने क्रिकेटप्रेमींना धक्का बसला असला, तरी क्रिकेट जाणकारांसाठी मात्र भारताचा हा पराभव अपेक्षितच होता. कारण गेल्या काही वर्षांत कसोटी असो की एकदिवसीय मालिका, भारतीय संघ परदेशी संघापुढे लोटांगण घालत आहे. याआधी दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या संघाने भारताला भारतात येऊन कसोटी किंवा एकदिवसीय मालिकेत नमवले आहे. परदेशी संघ भारतात येऊन भारतीय संघाला धूळ चारत असतानाही भारतीय संघाच्या कामगिरीत कोणतीही सुधारणा होत नाही, हे विशेष. भारतीय संघाचा सातत्याने पराभव होत असतानाही निवड समिती असो की बीसीसीआय, खेळाडू असो की संघ व्यवस्थापन याचे विश्लेषण किंवा पराभवाचे आत्मचिंतन करत नाही.
न्यूझीलंडने भारतावर मिळविलेला विजय फलंदाजांची हाराकिरी आणि स्वैर गोलंदाजीमुळे झाला आहे, हे कोणीही सांगेल. न्यूझीलंड संघाने तीनही सामन्यांत जवळपास 300 च्या वर धावा काढल्या, याचाच अर्थ भारतीय गोलंदाजांची त्यांनी यथेच्छ धुलाई केली. भारतीय संघात हर्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णा या गोलंदाजांना का खेळवण्यात येत आहे, असा प्रश्न पडतो. कारण या दोन्ही गोलंदाजांची प्रत्येक सामन्यात यथेच्छ पिटाई होते. संपूर्ण मालिकेत या दोन्ही गोलंदाजांनी खूप धावा दिल्या. जवळपास एका षटकात सातच्या सरासरीने त्यांनी धावा दिल्या. हे फक्त न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतच घडले असे नाही, तर याआधीही त्यांना असाच मार पडला आहे, तरीही त्यांना खेळवण्याचा अट्टाहास केला जातो.
प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे ते लाडके असल्याने त्यांना संधी दिली जाते का? हा प्रश्न पडतो. एकीकडे खूप मार खाऊनही त्यांना संघात स्थान दिले जातेय, तर मोहम्मद शमीसारखा
दर्जेदार गोलंदाज सातत्याने चांगली गोलंदाजी करूनही त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते. मोहम्मद शमीला का डावलले जाते, याचे उत्तर निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने द्यायला हवे. रवींद्र जडेजा हा भारताचा अष्टपैलू खेळाडू, पण एकदिवसीय सामन्यात त्याने अपवादात्मक परिस्थितीच अष्टपैलू खेळ केला आहे. एकदिवसीय सामन्यात भारतात अर्धशतक झळकावून त्याला जमाना झाला. गोलंदाजीतही त्याची धार कमी झाली आहे. कुलदीप यादवच्या फॉर्मही हरवला आहे.
या मालिकेत जसप्रीत बुमरा आणि हार्दिक पांड्याची उणीव भारताला जाणवली. या मालिकेत कोहलीने अपेक्षित धावा काढल्या. मात्र, त्याला इतर फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. रोहित शर्माने सुरुवात धडाकेबाज केली, पण मोठी खेळी करण्यात त्याला अपयश आले. शुभमन गिलने दोन अर्धशतके झळकावली, पण त्याला अर्धशतकाचे रूपांतर शतकात करता आले नाही. के. एल. राहुलने पहिल्या सामन्यात शतक झळकावले, पण पुढच्या दोन सामन्यांत त्याला खास काही करता आले नाही. एकूणच विराट कोहली वगळता एकही खेळाडू आपल्या लौकिकास साजेसा खेळ करू शकला नाही. त्यामुळेच भारताला हा पराभव स्वीकारावा लागला आहे. भारतीय संघाला सातत्याने मिळत असलेल्या अपयशाचे आत्मचिंतन भारतीय संघाने, निवड समितीने आणि संघ व्यवस्थापनाने करायला हवे. जर पराभवाचे आत्मचिंतन केले नाही तर भविष्यातही या पराभवाची पुनरावृत्ती होऊ शकते, याचे भान भारतीय संघाने ठेवावे.

Batsmen’s hara-kiri and reckless bowling

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *