मारहाण करून मोबाइल, चेन, स्मार्ट वॉच लंपास
सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिकरोड पोलिस ठाणे हद्दीत शिवाजीनगर, म्हसोबा मंदिर, परेश अपार्टमेंट परिसरात 13 नोव्हेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास तब्बल नऊ जणांच्या टोळीने धुमाकूळ घालत एका युवकाला व त्याच्या मित्रांना मारहाण करून लूटमार करण्याची घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
धनंजय दीपक सागवान (वय 18, रा. शिवाजीनगर, नाशिकरोड) यांनी फिर्याद दिली की, दुपारी तिनू मोरे यांच्यासोबत झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून आरोपी राकेश ऊर्फ राका लोंढे, प्रज्वल ऊर्फ पजा गुंजाळ, प्रथमेश ऊर्फ नन्या शेलार यांच्यासह सहा जणांनी रात्री त्यांच्या घरी धुडगूस घातला. फिर्यादी व मित्रांना शिवीगाळ करून लोखंडी हत्यार, लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या मारहाणीत फिर्यादीच्या गळ्यातील पिवळ्या रंगाची सोन्यासारखी चेन, आठ हजार रुपयांचा जिओ कंपनीचा मोबाइल फोन, 3,500 रुपयांचे स्मार्ट वॉच असा एकूण 11,700 रुपयांचा माल जबरदस्तीने खेचून नेण्यात आला. मदतीला आलेल्या तजेरा ऊर्फ विकी यालाही मारहाण करून जखमी केले. याचदरम्यान आरोपींनी फिर्यादी व त्याचे मित्र वैभव यांच्या मोटारसायकल व मोपेडचीही लोखंडी हत्याराने तोडफोड केली. परिसरातील लोक आवाज ऐकून बाहेर येण्याचा प्रयत्न करताच आरोपींनी दहशत निर्माण केली. त्यामुळे नागरिकांनी दारे बंद करून घरात लपण्याची परिस्थिती निर्माण झाली. या गुन्ह्यातील आरोपी राका लोंढे, पजा गुंजाळ, प्रफुल्ल ऊर्फ बाबा शेजवळ, विशाल चाफळकर, सिद्धार्थ ऊर्फ रघू बनसोड, करण डोंगरे, किरण ऊर्फ किरण्या व इतरांवर पूर्वीही गंभीर गुन्हे, तसेच मोक्का व आर्म्स अॅक्टसह विविध कलमांखाली कारवाई झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर सहायक पोलिस निरीक्षक सूर्यवंशी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सपकाळे यांच्यासह पोलिस पथकाने तपास सुरू केला. याप्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.