सिंहस्थाच्या तयारीबाबत अनभिज्ञ होतो

ना. भुजबळ : पालकमंत्रिपदावर दावा कायम

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहरात 2027 मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीबाबत अनभिज्ञ होतो, मंत्री, आमदार आणि मी नाशिककर असल्याने मला माहिती जाणून घेण्याचा अधिकार असल्याने बैठक घेतल्याचे अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या सिंहस्थ आढावा बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. भुजबळ म्हणाले, पालकमंत्री म्हणून नाही मंत्री म्हणून बैठक घेतल्याचे सांगत माध्यमांमध्ये विनाकारण चर्चा करत वाद वाढवले जात असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले.
पालकमंत्रिपदाबाबत विचारलेल्या प्रश्नांवर भुजबळ म्हणाले, जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार, तीन मंत्री आहेत, मग राष्ट्रवादी काँग्रेसला पालकमंत्रिपद का नाही, याबाबतचे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणार असल्याचे भुजबळ म्हणाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा पालकमंत्रिपदावर दावा कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भुजबळ म्हणाले, मला आधीच्या कुंभमेळा नियोजनाचा अनुभव आहे, तो अनुभव संबंधित अधिकार्‍यांना सांगितला, तसेच सिंहस्थाची तयारी जाणून घेतली. बाह्य रिंगरोड आणि अंतर्गत रिंगरोड याविषयी जाणून घेतले. अंतर्गत रिंगरोडमध्ये रस्त्याच्या मिसिंग लिंक निर्मीती करण्यात येणार असून रस्त्याची दुरूस्ती करण्यात येणार असल्याचे भूजबळ यांनी सांगितले. तसेच गोदावरी प्रदुुषणाबाबत नाराजी व्यक्त करत पुराच्या पाण्यासोबत गोदावरीमध्ये प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडण्यात येत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. क्लब टेंडरिंगच्या आरोपाबाबत माहिती घेणार
सिंहस्थाच्या कामाचे क्लब टेंडरिंग होत असल्याचा आरोप ठेकेदारांकडून करण्यात येत आहेत. यासंदर्भात भुजबळ म्हणाले, याबाबत माहिती नाही, असे असेल तर त्याची चौकशी व्हायला हवी असे त्यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *