छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं दैवत. जनतेचा राजा. त्यांनी अतिशय कठीण काळातही स्वराज्याची स्वप्नं रंगवली. त्यासाठी धडपड केली. आज वर्षानुवर्षे जनतेच्या मनात आपल्या नावाची आणि इतिहासावर आपल्या कामाची छाप सोडली. महाराजांइतकंच प्रकर्षाने त्यांच्या मातेचे म्हणजे जिजाऊ मातेचे नाव नेहमीच इतिहासात घेतले जाते. आपल्या मुलाला शूरवीर आणि मराठ्यांचा तेजस्वी राजा बनवण्याचे स्वप्न त्यांनी मनी बाळगले होते.
जिजामातांनी जणू ध्यास घेतला होता. आपल्या पुत्राला तेजस्वी, ओजस्वी घडवण्याचा. त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न अगदी प्रामाणिक आणि प्रखर होते. लहानपणापासूनच रामायण, महाभारताच्या कथा सांगून त्यांना आपल्या सनातन संस्कृतीविषयी जागरूक आणि तेजस्वी बनवले. तलवार, दांडपट्टा चालवण्याचे धडे दादोजी कोंडदेव यांच्याकडून देऊन तरबेज केले. स्वराज्याचा ध्यास आणि स्वराज्याची आस त्यांच्या मनात पेरली. या मातेच्या प्रयत्नांचे फळ जसजसे राजे मोठे झाले तसतसे दिसायला लागले. तो वटवृक्ष इतका पसरला की, आजही त्याच्या छायेत आपण छत्रपतींच्या राज्यात जगतोय, अशी अनुभूती प्रत्येक मराठी माणसाला येते. मातृत्व म्हणून जिजाऊ मातेचे नाव नेहमीच पुढे येते आणि त्यांचा एक उत्तम आदर्श प्रत्येक पिढीने घ्यावा, असे वाटते. फक्त ध्येयापर्यंत पोहोचवण्याचीच कास धरलेली नव्हती, तर महिलांचा सन्मान करणे आणि त्यांना सुरक्षित वातावरण कसे देता येईल, यासाठी लढण्याचे प्रशिक्षण शिवरायांना दिले होते. त्यामुळे शिवरायांच्या काळात महिला अगदी सुरक्षित होत्या. प्रामाणिक प्रयत्न, मेहनत व आपल्या मुलाला उत्तम घडविण्याची जिद्द असे स्वप्न प्रत्येक आईचे असते. त्यासाठी ती नेहमी तत्परही असते. पण जसा काळ बदलला तसेच पुरुषांबरोबरीने स्त्रियाही बाहेर पडायला लागल्या. जो पूर्णवेळ तिला आपल्या मुलांसाठी मिळायचा तो आता तिला देता येणे इच्छा असूनही शक्य नसते. कधीकधी मुलांना शिक्षणासाठी बाहेर ठेवावे लागते. त्याचे परिणाम काहीसे चांगले दिसत नाहीत, असे आता वाटायला लागले आहे. कोवळ्या वयाची मुले ड्रग्ज, ड्रिंक, सिगारेट अशा अनेक व्यसनांच्या आहारी जाताना दिसतात. ज्या गोष्टी आपल्या संस्कृतीला, परिवाराला आणि आपल्याला कधीतरी नुकसानकारक ठरतील अशा गोष्टींच्या आहारी मुले-मुली सहज जात आहेत. जसं जग बदलतंय तसं आपण बदललोय आणि या जगासोबत आपण वावरतोय, असे वाटते. पण तसं नाहीये. यातून कुठेतरी हळूच गुन्हेगारीचे मार्ग सुरू होतात. कळत नकळतपणे आपण यात अडकत जातो. ज्या ध्येयासाठी तुम्हाला बाहेर पाठवले ते लांब राहून तुम्ही नकोशा गोष्टींत अडकतात. आता या सर्व गोष्टींना बंधन घालण्यासाठी आणि यापासून सतर्क राहण्यासाठी एका मातेने काय करणं गरजेचे आहे? लहानपणापासूनच आपल्या संस्कृतीचे धडे मुलांना अवश्य द्यावेत. परिस्थितीची जाण मुलांना अवश्य द्यावी. ज्या गोष्टींच्या आहारी गेल्याने त्यांचे भविष्य उद्ध्वस्त होते त्या गोष्टींची मनात भीती नक्की असावी.जर एखादी गोष्ट समोर आली तर तिला खंबीरपणे तोंड देता येईल इतके त्यांना मजबूत बनवावे. विषय मुलींचा असेल तर त्यांची कशी आणि कुठे फसवणूक होऊ शकते, त्यापासून त्यांनी कसे सुरक्षित राहावे याची वेळोवेळी मुलींना माहिती देऊन जागृत ठेवावे. मुलींना कराटेचे प्रशिक्षण द्यावे जेणेकरून तिच्यासोबत कुठलाही चुकीचा प्रकार घडणार नाही. मुलं व्यसनाच्या आहारी गेल्याने त्यांचा वर्तमानच नाही, तर भविष्य कसे उद्ध्वस्त होईल याची त्यांना माहिती द्यावी. मेडिटेशन, योगा, रनिंग, विविध कलागुणांमध्ये त्यांना ज्या गोष्टीत रस आहे त्यात मुलांचे मन रमवा. त्याचे प्रशिक्षण मुलांना द्यावे.मुले बाहेरगावी शिकायला असली तर रोज एकदा तरी आवर्जून विचारपूस करून त्यांची काळजी घ्यावी. सोबत शक्य होईल तेवढे जास्तीत जास्त मैत्रीपूर्ण संबंध बनवून त्यांच्या अडीअडचणी, इच्छा जाणून घ्याव्यात. विशेषतः मुलींचा सन्मान करणे या गोष्टीची सवय एक माता म्हणून आपण अवश्य लावावी. जेव्हा घरातील वातावरण मुलांना उत्तम आणि सुखकारक मिळतं तेव्हा ते बाहेर प्रेम किंवा कुठलंही व्यसन शोधत नाहीत, असं विज्ञान सांगते. आजच्या आधुनिक जगातील आपण अतिशय जागरूक, स्वाभिमानी, खंबीर यशस्वी स्त्रीच नाही आहात तर मायेचा समुद्र आणि दुर्गेचे रूपदेखील आहात. त्यामुळे जिजाऊ मातेप्रमाणे खंबीर, कणखर, प्रेमळ अशी माता घडणे, त्यासाठी प्रयत्न करणे, हे आपलं कर्तव्य असलं पाहिजे. कोटी कोटी नमन त्या शिवरायांना अन् धन्य त्यांना घडवणार्या जिजाऊ मातेला!
Becoming a mother-in-law is the need of the hour.