भारतात 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो. भारत सरकारने सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रमण यांच्या स्मरणार्थ दरवर्षी भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याची परंपरा सुरू केली आहे. यावर्षीही आपण हा दिवस साजरा करत आहोत. खरेतर मानवी जीवनाच्या विकासात व मानवाच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी विज्ञान कटिबद्ध आहे.विज्ञानाच्या जोरावर आणि शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे मानवी जीवन अतिशय सुखकर व गतिमान झाले आहे. आजच्या आधुनिक काळात विज्ञानाशिवाय मानवी जीवन अपूर्ण आहे. जर मानवी जीवनातून विज्ञानाला अलगद बाजूला केले तर माणूस एकदम निष्क्रिय होऊन जाईल.
आजच्या काळात सगळी माणसे विज्ञानाचा पुरेपूर वापर करून घेतात, पण अंधश्रद्धेला चिकटून राहतात. खेदाची बाब अशी की, सुशिक्षित माणसेच अंधश्रद्धेला खतपाणी घालतात. पदोपदी अंधश्रद्धा बाळगतात. भानामती, भुताटकी, हातचलाखी, गंडेदोरे, चारचाकी वाहनात लिंबू-मिरची बांधणे, बाहेरवसा, आसरा, देवी अंगात येणे, देवी कोपणे अशा खुळ्या समजुतीच्या अंधश्रद्धा आजही समाजात, गावात आणि लोकांच्या मनात खंबीरपणे पाय रोवून उभ्या आहेत. आजच्या घडीला प्रत्येकाकडे लेटेस्ट आणि ऑनड्रॉइड मोबाइल आहे. मोबाइल हे विज्ञानाने शोधलेले असे यंत्र आहे ज्याने संपूर्ण मानवजातीला हॅक केले आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांना मोबाइलने मोहित केले आहे. असे असले तरीही माणूस अगदी बिनधास्तपणे अंधश्रद्धेला जपत असतो.एकीकडे विज्ञाचे गोडवे गायले जातात आणि दुसरीकडे अंधश्रद्धेची मनोभावे पूजा केली जाते. हा दुटप्पीपणा काय कामाचा?
एकीकडे आपण भारतीय लोक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात अनेक यंत्रांच्या सहाय्याने दैनंदिन जीवन सुखाने व आनंदाने जगतो. औद्योगिक, आरोग्य, कृषी, सिंचन, क्रीडा, दळणवळण या क्षेत्रांबरोबर इतरही क्षेत्रांत विज्ञानाने क्रांती केली आहे. हे जग अतिशय वेगवान आणि आकर्षक झाले आहे. अनेक महान शास्त्रज्ञांनी संशोधन करून मानवी जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणले आहेत. एडिसनने बल्बचा शोध लावला आणि मानवी जीवनातील अंधार नाहीसा झाला. वेगवेगळ्या आजारांवर प्रभावी औषधे विज्ञानाने शोधली आणि मानवाचे आयुर्मान वाढले. कृषी संशोधनामुळे आज हरितक्रांती घडून आली आहे. त्यामुळे कृषी उत्पादन वाढले आहे. आता तर कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजे एआयने तर कमालच केली आहे. सी. व्ही. रमण यांनी रामण इफेक्टचा शोध लावला आणि जगातील थोर शास्त्रज्ञांमध्ये त्यांना स्थान मिळाले. त्यांच्या संशोधनाने भारताचे व त्यांचे नाव जगाच्या कानाकोपर्यांत पोहोचले. त्यांच्या सन्मानासाठी भारतात 28 फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा केला जातो.
राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करताना आपण विज्ञान तंत्रज्ञान व शास्त्रज्ञांचे तोंडभरून कौतुक करतो. त्याच दिवशी अनावधानाने अंधश्रद्धाही बाळगतो. कर्मकांडाला विशेष महत्त्व देतो. मुहूर्त पाहिल्याशिवाय कोणतेही शुभकार्य केले जात नाही. हे सगळं बंद करून विज्ञानाचा मानवतेसाठी उपयोग करून घेतला पाहिजे.अंधश्रद्धेला मूठमाती देऊन सापेक्ष व विज्ञानवादी जीवन जगण्याची शिकवण आत्मसात केली पाहिजे. म्हणून विज्ञानाची कास धरूया.विज्ञानवादी होणे काळाची गरज बनली आहे. सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
Becoming a scientist is the need of the hour.