नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
गेल्या 11 दिवसांपासून घरोघरी आणि विविध मंडळांमध्ये भक्तिभावाने विराजमान असलेल्या लाडक्या गणपती बाप्पाला शनिवारी नाशिकरोड परिसरातील भाविकांनी जड अंतःकरणाने निरोप दिला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ आणि ‘अर्धा लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला’ अशा जयघोषांनी परिसर दणाणून गेला होता. पावसाची तमा न बाळगता मोठ्या संख्येने भाविक विसर्जनासाठी घराबाहेर पडले होते. नाशिकरोडमध्ये सुमारे दीडशे मोठे, लहान गणपती मंडळांनी लाडक्या बाप्पाची स्थापना केली होती. यंदा 11 दिवसांचा उत्सव पारंपरिक थाटात आणि भक्तिमय वातावरणात साजरा झाला.
नाशिकरोड व उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत यावर्षी तब्बल 140 लहान-मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची स्थापना झाली होती. यावर्षी गेल्या वर्षापेक्षा सार्वजनिक मंडळांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने उत्साह दिसून येत होता. अकरा दिवस गणेशभक्तांनी सार्वजनिक मंडळांनी उभारलेल्या देखाव्यांचा आनंद घेतला. हे देखावे बघण्यासाठी गणेशभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शनिवारी श्रीं विसर्जनाचा दिवस असल्याने नाशिकरोड परिसरात सकाळपासूनच लहान व मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी परिसरातील देवळालीगाव व वडनेर दुमाला येथील वालदेवी नदी तसेच दसक-पंचक येथील गोदावरी नदी, चेहेडी येथील दारणा नदी, एकलहरे गंगावाडी येथील गोदावरी नदी या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात गणेशभक्तांची गर्दी झाली होती. सर्वांत जास्त गर्दी ही जेलरोड परिसरातील दसक- पंचक येथील गोदावरी नदीवर होते. या ठिकाणी गोदावरी नदीच्या दोन्ही बाजूला मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गणेशभक्तांची रांग लागली होती. दिवसभर पावसाचे वातावरण असूनसुद्धा गणेशभक्तांमध्ये जल्लोष दिसून येत होता. त्याचप्रमाणे नाशिकरोड परिसरातील नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या वतीने विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत बँकेचे दत्ता गायकवाड, ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे तसेच मनोहर कोरडे, जगन आगळे, योगेश नागरे, विलास पेखळे आदींसह बँकेचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
मिरवणुकीत आदिवासी नृत्य ठेवण्यात आल्याने हे नृत्य बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. विहितगाव येथे वालदेवी नदीवर सोशल फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्ष विक्रम कोठुळे यांच्या वतीने डीजे लावण्यात आला होता. भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. त्याचप्रमाणे देवळालीगाव येथील ओंकार मित्रमंडळाच्या वतीनेसुद्धा मिरवणूक काढण्यात आली. घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी महापालिकेच्या वतीने ठिकठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने दत्त मंदिर रोडवर असलेल्या शाळा क्रमांक 125 च्या मैदानावर शिखरेवाडी येथील जॉगिंग ट्रॅकवर गाडेकर मळा येथील मैदानावर जय भवानी रोड व इतर परिसरात कृत्रिम तलाव उभारण्यात आले होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घरगुती गणपती मूर्तींचे दान करण्यात आले. यावर्षी गणेश मंडळांची सामूहिक मिरवणूक नसल्याने गणेशभक्तांचा हिरमोड झाला होता. रात्री उशिरापर्यंत गणेशमूर्ती विसर्जनासाठी नदीवर गर्दी दिसून येत होती.
दरम्यान, विसर्जनाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…