भैरवनाथ यात्रोत्सवात 27 वर्षांपासून मोफत चरणसेवा

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर शहराचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या यात्रेच्या निमित्ताने शहरातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील भाविक व परगावी स्थायिक झालेले सिन्नरकर यात्रेच्या निमित्ताने आवर्जून भक्तिभावाने दर्शनाला येत असतात. भाविकांची अलोट गर्दी असल्यामुळे भाविकांना दर्शन सुलभ व सुकर व्हावा म्हणून शहरातील सिन्नर सांस्कृतिक मंडळ व सिन्नर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी भाविकांसाठी मोफत चरणसेवा उपक्रम राबवला जातो. गेल्या 27 वर्षांपासून उपक्रम नित्यक्रमाने सुरू आहे.
भाविकांचे विनामोबदला चपल, बूट सांभाळत त्यांना देवदर्शन व यात्रेचा निःसंकोच आनंद देण्याचे सेवाभावी कार्य मंडळाकडून सातत्याने 27 वर्षांपासून केले जात आहे.
या वर्षीही शुक्रवारी भैरवनाथ महाराज यात्रोत्सवात अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने भाविकांच्या चरणसेवेचा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या सामाजिक उपक्रमाची दखल घेत अनेक मान्यवर, भाविकांनी कौतुकाची थाप देत मंडळाचे आभार मानले. या उपक्रमात सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत, प्रकाश नवसे, प्रा. राजाराम मुंगसे, सिन्नर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. राजेंद्र पवार, प्रा. जावेद शेख, प्रा. आर. बी. गायकवाड, शाहिर स्वप्नील डुंबरे, सारंग इंगळे, चेतन धनगर, कृष्णा आहेर आदी सहभागी झाले होते.
नंदूशेठ मुत्रक, वीरेंद्र परदेशी, माजी नगरसेवक मनोज भगत, छायाचित्रकार दत्ता जोशी यांचे या उपक्रमास मोलाचे सहकार्य लाभले.

चरणसेवेचे समाधान लाखमोलाचे

ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या यात्रेच्या निमित्ताने भक्तिभावाने आलेल्या भाविकांची चरणसेवा करण्याचे समाधान लाखमोलाचे आहे. भैरवनाथ महाराजांचे दर्शन करून आलेल्या भाविकांच्या चेहर्‍यावरचे समाधान व कौतुकाची थाप हा आनंददायी अनुभव आहे.
कृष्णाजी भगत, अध्यक्ष, सिन्नर सांस्कृतिक मंडळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *