नाशिक : जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत यश भंडारी याने 11 वर्षाखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत राघव महाले याचा 3-0 तर 13 वर्षाखालील मुलांच्या गटात यशने राघव महालेचाच 3-0 असा सहज पराभव करून दुहेरी मुकुट पटकावला.
15 वर्षाखालील मुलींच्या गटात अनन्या फडके हिने अंतिम फेरीत स्वरा करमरकरचा 3-1 असा पराभव केला. 17 वर्षाखालील मुलींच्या गटात अनन्याने मिताली पूरकरचा 3-2 असा पराभव करून दुहेरी मुकूट मिळविला. 15 व 17 वर्षाखालील गटात अर्चित रहाणे याने दुहेरी मुकूट मिळविताना अनुक्रमे 15 वर्षाखालील मुलांच्या गटात अजनिश भरडे याचा 3-0 तर 17 वर्षाखालील मुलांच्या गटात अर्चितने अन्वय पवारचा 3-1 असा पराभव करून दोन्ही गटातील विजेतेपद आपल्या नावावर जमा केले. 11 वर्षाखालील मुलींच्या गटात केशिका पुरकरचा अटीतटी लढतीत 3-2 असा पराभव करून अजिंक्यपद पटकावले. 13 वर्षाखालील मुलींच्या गटात स्वरा करमरकरने अपेक्षेप्रमाणे इरा गोगटे चा 3-0 असा पराभव करून विजेतेपद् मिळविले. पुरुष एकेरीत नुतांशु दायमा याने अंतिम फेरीत अजिंक्य शिंत्रे याचा 4-0 असा पराभव करून विजेतेपद मिळविले.
40 वर्षावरील वेटरन्स गटात अंतिम फेरीत अमोल सरोदे याने अंतिम फेरीत विनोद ठाकूर यांचेवर 3-0 अशी मात करून विजय मिळविला. 50 वर्षावरील वेटरन्स गटात ऑगस्टिन डिमेलो यांनी अंतिम फेरीत संदीप भागवत यांचा 3-0 असा पराभव करून विजेतेपद् मिळविले.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ नाशिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष शिव छत्रपति पुरस्कार विजेते नरेंद्र छाजेड यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी त्यांनी आपल्या मनोगतात खेळाडूंना अभ्यासा इतकेच खेळावर लक्ष केंद्रित करून मेहनत घेतली पाहिजे. भविष्यात नक्कीच त्याचा फायदा होइल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव शेखर भंडारी यांनी केले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजेश भरवीरकर, अभिषेक छाजेड, जय मोडक, पुरषोत्तम आहेर, अजिंक्य शिंत्रे, धनंजय बर्वे यांनी प्रयत्न केले. या प्रसंगी खेळाडू, पालक, प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.