शिंदे सेनेला मिळणार प्रबळ नेता, पुढच्या आठवड्यात शिवसेनेत प्रवेश
सिन्नर : भरत घोटेकर
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे शिवसेना उबाठा गटाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. येत्या आठवडाभरात त्यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील कार्यालयात किंवा मुंबईत पक्ष कार्यालयात प्रवेश होणार आहे.
माणिकराव कोकाटे आणि भारत कोकाटे यांच्यात राजकीय वैर सुरू झाल्यानंतर त्यांनी 2022 मध्ये खासदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे यांच्या सोबतीने शिवसेना उबाठा गटात प्रवेश करत त्यांनी शिवबंधन बांधले होते. माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात एकत्र आलेले वाजे, सांगळे आणि भारत कोकाटे तीनही नेते तीन वेगवेगळ्या पक्षात दिसणार असल्याने आगामी काळात सिन्नर तालुक्याचे राजकारणही वेगळ्या वळणावर जाण्याची चिन्हे आहेत.
कार्यकर्त्यांना न्याय्य देण्यासाठी सत्तेची आवश्यकता असल्याने शिंदेसेनेत जाण्याचा मार्ग निवडल्याचे नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक भारत कोकाटे यांनी स्पष्ट केले. उबाठा गटावर किंवा खासदार राजाभाऊ वाजे यांच्यावर नाराज नाही. आपल्या पक्षप्रवेशाला त्यांचा सपोर्ट किंवा विरोधही नसल्याचे भारत कोकाटे यांनी सूचित केले असले, तरी शिवसेना सोडण्यामागे नेमके कारण काय, असाही प्रश्न उपस्थित होतो.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची पद्धत, कार्यकर्त्यांना न्याय देण्याची क्षमता बघून त्यांनी शिवसेनेत जाण्याचे निश्चित केले आहे. देवपूर गटासह तालुक्यातून शंभर वाहनांमधून सुमारे एक हजारावर कार्यकर्ते पक्षप्रवेशाला उपस्थित ठेवण्याचे नियोजन हाती घेण्यात आले.
शिक्षणमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, माजी खासदार हेमंत गोडसे, शिवसेना नेते विजय करंजकर, अनिल ढिकले यांच्या माध्यमातून हा प्रवेश होत असल्याची चर्चा आहे.
रविवारी नाशिक शहरातील अनेक बलाढ्य नेते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मात्र, यावेळी प्रवेश करण्याऐवजी स्वतंत्र प्रवेश सोहळा करण्याचे नियोजन भारत कोकाटे यांच्या समर्थकांनी केले आहे.
सत्तेतही संघर्ष की राजकीय पॅचअप?
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासोबत राजकीय वैर असलेले बंधू भारत कोकाटे हे शिंदेसेनेत आल्यानंतर दोघेही सत्तेतील पक्षात सहभागी असतील. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युतीने एकत्र लढवल्यास भारत कोकाटे शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून पुतणी माजी जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांना देवपूर गटातून कसे आव्हान देणार, की दोन्ही भावांमध्ये सत्तेच्या माध्यमातून राजकीय पॅचअप होणार, हे येणारा काळच ठरवेल.
विधानसभा निवडणुकीने उलटफेर…
उबाठा शिवसेनेच्या माध्यमातून खासदार राजाभाऊ वाजे, युवा नेते उदय सांगळे आणि भारत कोकाटे या तिघांनी एकत्र येत माणिकराव कोकाटे यांच्यापुढे तगडे राजकीय आव्हान उभे केले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत माणिकराव कोकाटे यांनी राजकीय वैर सोडून राजाभाऊ वाजे यांना प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरीत्या मदत केली. तोच कित्ता राजाभाऊ वाजे गटाने विधानसभा निवडणुकीत गिरवून कोकाटे गटाच्या राजकीय उपकाराची परतफेड केली. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उदय सांगळे गटाने राजाभाऊ वाजे यांना गद्दारांच्या पंक्तीत जाऊन बसवले. साहजिकच वाजे-सांगळे या दोघांतच वितुष्ट आल्याने भारत कोकाटे यांचीही राजकीय फरपट झाली. त्यामुळेच त्यांनी आता या दोघांनाही टाळून शिंदे गटाची वाट धरल्याची चर्चा आहे.