भरवस येथे विहिरीत विवाहितेचा मृतदेह

सासरच्या छळास कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याची वडिलांची तक्रार

लासलगाव प्रतिनिधी

सासरच्या छळास कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना निफाड तालुक्यातील भरवस येथे घडली. वैष्णवी किरण वावधाने ( वय २१) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.या प्रकरणी लासलगाव पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे की,मयत वैष्णवी हिचे किरण प्रभाकर वावधाने यांच्याशी दि. ८ मे २०२० मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर काही महिने सुरळीत गेले.त्यानंतर मात्र सासरच्या मंडळींकडून वैष्णवी हिस शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यास सुरुवात झाली.लग्नात भांडे दिले नाहीत तर कधी स्वयंपाक करता येत नाही यावरून तिला सतत त्रास दिला जात असे.गरोदरपणात गोठ्यात कामास लावणे,जड काम करण्यास भाग पाडले जात होते. डोहाळे जेवण घाला या मागणीवरून नवऱ्याने तिला हाताने,चापटीने मारहाण केली व शिवीगाळ केली. याबाबत तिने वडिलांना देखील सांगितले होते.परंतु अपत्य प्राप्तीनंतर सर्व सुरळीत होईल अशी समजूत तिच्या आई वडिलांनी घातली.अपत्य प्राप्तीनंतर देखील त्रास कमी न झाल्याने वैष्णवी ही सहा महिने माहेरी होती.

वैष्णवीचे मामे सासरे कैलास कुयटे रा.दावचवडी यांनी मध्यस्थी करत जबाबदारी घेतल्याने वैष्णवीला सासरी पाठविले.नंतर त्याचे वाटप होऊन चुली वेगळ्या करण्यात आल्या,मात्र शेती एकत्र असल्याने वाद होतच होते. वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करून शिवीगाळ, मारहाण करत होते.त्यामुळे तीने सदर जाचाला कंटाळून माधव गणपत मानकर यांचे शेत गट नंबर ३९ मधील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली अशी वैष्णवीचे वडील भारत रामनाथ बोचरे रा.देवगाव यांनी फिर्याद दिली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून पती किरण प्रभाकर वावधाने, सासू जनाबाई प्रभाकर वावधाने,सासरा प्रभाकर गणपत वावधने,दिर सुनील प्रभाकर वावधाने,जाव प्रतीक्षा सुनील वावधाने या सासरच्या मंडळींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८ (अ), ३०६, ३२३, ५०४,५०६, ३४ या कलमान्वये लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील स.पो.नि.राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मारुती सुरासे करत आहेत.दि.२७ जुलै रात्री उशिरा पोलीस बंदोबस्त व तणावपूर्ण वातावरणात मयत वैष्णवी वर सासरच्या घरासमोर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *