भावना भार्गवे स्मृती व्याख्यानमालेत गुरूवारी डॉ. शंतनू अभ्यंकर यांचे मुक्तचिंतन

 

नाशिक :प्रतिनिधी

दवप्रभा फिल्म ॲण्ड प्रॉडक्शनच्या वतीने एक जून रोजी सायंकाळी सहा वाजता ज्येष्ठ लेखिका तथा शिक्षणतज्ज्ञ डॉ. भावना भार्गवे स्मृती व्याख्यानमाला २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे नववे पुष्प आहे ऐसा देव वदवावी वाणी… यावर लेखक अनुवादक व ब्लॉगर डॉ. शंतनू अभ्यंकर हे गुंफणार आहेत.

आशयपूर्ण कथा, कादंबरी आणि चरित्र याद्वारे लिखाणाची वेगळी शैली मांडणाऱ्या भावना भार्गवे या ३६ वर्षे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत होत्या. शासकीय कन्या शाळेतून त्या निवृत्त झाल्या. जून २०१५ मध्ये त्यांचे निधन झाले. १६ जुलै हा त्यांचा जन्मदिवस. या दिवसाचे औचित्य साधून भार्गवे कुटुंबिय दरवर्षी व्याख्यानमालेचे आयोजन करते. या वर्षीपासून व्याख्यानमालेच्या तारखेत बदल करून ती एक जून करण्यात आली आहे.

यंदा व्याख्यानमालेत डॉ. शंतनू अभ्यंकर यांचे ,
आहे ऐसा देव वदवावी वाणी… यावर मुक्त चिंतन होणार आहे. नास्तिकतेच्या चष्म्यातून आस्तिकतेकडे पाहताना.. या धाग्यावर ते गुंफलेले आहे.

स्त्री आरोग्य आणि प्रसुतीशास्त्र तज्ज्ञ डॉ. अभ्यंकर हे सातारा जिल्ह्यातील वाई येथे कार्यरत आहेत. त्यांनी आजवर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये निमंत्रित वक्ता म्हणून सहभाग नोंदवला आहे. भाषांतरकार, ब्लॉगर व नाटककार अशीही त्यांची वेगळी ओळख आहे. पाळी मिळी गुपचिळी (स्त्री आरोग्याचा शोध आणि बोध), उत्क्रांती जीवशास्त्राचे अभ्यासक, निरीश्वरवादाचे पुरस्कर्ते द गॉड डील्यूजनचे लेखक .रिचर्ड डॉकिन्स लिखित द मॅजिक ऑफ रिॲलिटी या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी भावानुवाद जादूई वास्तव, एका डॉक्टरला भेटलेली खुमासदार माणसं, फादर टेरेसा आणि इतर वल्ली.. , देवाघरची फुले नाटक लॉर्ड ऑफ द फ्लाईज या नोबेल विजेत्या कादंबरीचे नाट्य रुपांतर, पुष्प पठार कास डॉ संदीप श्रोत्री यांच्या पुस्तकाचा अनुवाद, माझा प्रवास – होमिओपॅथी ते ॲलोपॅथी, राधिका सांत्वनम या मुद्दुपलनी विरचित तेलगू दीर्घ काव्याचा मराठीत छंदबद्ध अनुवाद ही त्यांची पुस्तके विशेष गाजली. स्त्रियांच्या आरोग्याबाबत जागृती घडविण्यासाठी आरोग्यवती भव – स्त्री आरोग्याचा शोध आणि बोध, शंतनु उवाच हा ब्लॉग, यू ट्युबवर पौगंडावस्थेतील मुला-मुलींसाठी खास वाहिनी सुरू केली. त्यांच्या कामाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे. गुरुवारी सायंकाळी अगदी वेळेत ठीक सहा वाजता गंगापूर रस्त्यावरील कुर्तकोटी शंकराचार्य संकुलात होणाऱ्या या व्याख्यामालेस नाशिककरांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन भार्गवे कुटुंबीयांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *